धर्म जेव्हा लुप्त होतो... हिंदू देवतांना मुस्लीम कलाकुसरीचे गोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:57 PM2018-09-26T14:57:22+5:302018-09-26T14:59:15+5:30

शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील मुस्लीम कुटुंब, पटवी हिंदू देवतांसाठी लागणारे रेशमी गोंडे आणि अनंत - अनंती गुंफण्याचा वसा गेल्या दीडशे वर्षांपासून जपत आहे.

When religion ends ... Hindu goddesses Gonds of Muslim artwork | धर्म जेव्हा लुप्त होतो... हिंदू देवतांना मुस्लीम कलाकुसरीचे गोंडे

धर्म जेव्हा लुप्त होतो... हिंदू देवतांना मुस्लीम कलाकुसरीचे गोंडे

googlenewsNext
ठळक मुद्देहिंदू देवतांना मुस्लीम कलाकुसरीचे गोंडेवसा गेल्या दीडशे वर्षांपासून

शोभना कांबळे 

रत्नागिरी : पूर्वी जातीधर्माची बंधने कडक होती, तरी जातीय सलोखा राखला जात होता. परंतु काळानुरूप स्वार्थी राजकारणाचा शिरकाव होऊ लागल्याने आता जातीयतेची कीड फोफावू लागली आहे. मात्र, या परिस्थितीतही शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील मुस्लीम कुटुंब, पटवी हिंदू देवतांसाठी लागणारे रेशमी गोंडे आणि अनंत - अनंती गुंफण्याचा वसा गेल्या दीडशे वर्षांपासून जपत आहे.

जात - धर्माच्या नावाखाली सध्या गलिच्छ राजकारण खेळले जात असल्याने जाती - धर्मांमध्ये तेढ वाढायला लागले आहे. ईश्वरापुढे सर्व सारखेच आहेत, ही भावना लुप्त झाली आहे. मानवतावाद तर संपल्यातच जमा आहे. मात्र, यापलिकडे वर्षानुवर्षाची परंपरा सांभाळत पटवी कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे अल्ली अब्दुल रहीम पटवी (चाचा) आणि चौथ्या पिढीचा त्यांचा मुलगा अफझल हिंदू देवतांच्या पालखीसाठी, गणपतीसाठी लागणारे रेशमी गोंडे आणि विशेष म्हणजे अनंत चतुर्दशीसाठी लागणारे अनंत - अनंतीचा दोर गुंफण्याचे काम ईश्वरसेवेइतकेच पवित्र मानून करीत आहेत.

लग्नाच्या मुंडावळ्या, बाशिंग, मंगळसूत्र, देवाचे दागिने, पुतळ्या, गंथन, नेकलेसचा गोंडा, जपमाळ, रेशमी राख्या, काळ्या मण्यांची बारीक पोत गुंफण्याचे काम करणारे म्हणून त्यांचे आडनाव पटवी. आता तेच रूढ झालयं. रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे चाचांचे हे अगदी छोटेसे दुकान आहे.

चाचांचे आजोबा अब्दुला यांच्यापासून या व्यवसायाला सुरूवात झाल्याचे चाचा सांगतात. वडिलांचा व्यवसाय पुढे मुलाने म्हणजेच चाचांच्या वडिलांनीही तेवढ्याच श्रद्धेने सांभाळला. आता तो अफजलपर्यंतच्या चौथ्या पिढीपर्यंत सुरू आहे.

अफझल पटवी यांचेही शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. बारावीपर्यंत शिक्षण झाले असले तरी ही पारंपरिक कला शिकून घेत ते स्वत: आज या व्यवसायात वडिलांना मदत करीत आहेत. चाचांचे वय आता ८० वर्षे आहे, तरीही ते दुपारी १ ते रात्री सात - साडेसातपर्यंत आपल्या दुकानात मुलासोबत काम करीत असतात.

कधीही त्यांना या कामाचा कंटाळा आला नाही. चाचांनी लहानपणापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रपंच चालविला. अनंताचा दोर ते व्यवसाय म्हणून नाही तर परंपरा म्हणून करतात. हे काम खूप नाजूक असते. म्हणून ते एकाग्रपणे करण्यासाठी घरी घेऊन जातात.

अनंताचे व्रत करणारे सुमारे ४० किलोमीटरच्या परिसरातील बहुतांश लोक त्यांच्याकडून अनंत घेऊन जातात. ते तयार करून ठेवणार, ही खात्री त्यांना असते. पण इतरही कुणाला गरज लागेल, म्हणून चाचांचा घरचा सण असला तरीही ते तो बाजुला ठेवून दुकानात बसतात. चाचांच्या या व्रताला कुठल्याही धर्माचा लवलेश नाही. ही परंपरा जपत त्यांनी खऱ्या अर्थाने जातीय सालोखा राखलाय.

वडिलांची शिकवण

वडिलांनी चाचांना सांगून ठेवले आहे, बेटा रेशमी गोंडा बनविण्याचा हा आकडा तुझ्याजवळ आहे, तोपर्यंत तुला कशाचीच मोताद पडणार नाही. तुला काहीच कमी पडणार नाही. वडिलांचा हा आशीर्वाद आणि सल्ला आपल्या सोबत नेहमीच राहिला आहे. त्यामुळे आपण या व्यवसायात खूप समाधानी असल्याचे चाचा यावेळी आवर्जुन नमूद करतात.

१४ गाठी अनंताच्या

अनंत चतुर्दशीच्या पूजेसाठी बनवण्यात येणारा अनंत आणि अनंती अशी दोराची जोडी पूर्ण रेशमाच्या धाग्यापासून विणली जाते. एक अनंत करायला साधारण: २ तास लागतात. अनेक हिंदू घरांमध्ये चाचांनी केलेले हे अनंत श्रद्धेने पूजले जातात. आजकालच्या मुलांना माहीत नसल्याने अनंताला असलेल्या १४ गाठी चाचा स्वत: बांधून देताना प्रत्येकाला मोजून बघायला सांगतात.

त्यांचा मुलगा अफझल पटवी यांनाही त्यांच्या नातेवाईकांनी इतर व्यवसाय करण्याचा किंवा बोटीवर जाण्याचा, आखाती देशात नोकरी करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्याही मनात हा व्यवसाय सोडण्याचा विचार कधीच येत नसल्याचे अफझल सांगतात. त्यांची पत्नी सायनाही याला दुजोरा देते. आज हे पूर्ण कुटुंब अतिशय सुखी आहे. चाचांची ११ वर्षीय नात, अफझल यांची कन्या फायजा ही आपले आजोबा घरी काम करत असताना कुतुहलाने त्यांना न्याहाळीत असते. दुकानात आल्यानंतर ती ग्राहकांची आस्थेने चौकशी करते.

पटवी कुटुंबाच्या गेल्या चार पिढ्या कलेचा वारसा परंपरेने सांभाळत आहेत. आज या व्यवसायातून त्यांना फारसे काही उत्पन्न मिळत नसले तरी आपल्या चार पिढ्या या कलेची परंपरा जपत आहे. ही भावना त्यांना समाधान मिळवून देते. या व्यवसायाच्या जोडीला त्यांचा छत्री दुरूस्तीचाही व्यवसाय आहे. या दोन्हीसाठीही सूक्ष्म नजर लागते. पण ८० वर्षांचे चाचा अगदी तासनतास हे काम एकाग्रतेने करत बसतात.

Web Title: When religion ends ... Hindu goddesses Gonds of Muslim artwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.