सागरी वारे सुसाट; मासेमारीला पुन्हा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 05:23 PM2019-01-30T17:23:32+5:302019-01-30T17:25:08+5:30

आठवडाभरापूर्वीच खराब हवामानाचा फटका बसलेली सागरी मासेमारी सुरू होते न होते तोच पुन्हा एकदा सागरी वारे सुसाट वाहू लागले आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून मासेमारी करण्यापेक्षा बंदरातच नौका नांगरून ठेवणे अनेक मच्छीमारांनी पसंत केले आहे.

Sea Windsurf; Fishing break again | सागरी वारे सुसाट; मासेमारीला पुन्हा ब्रेक

सागरी वारे सुसाट; मासेमारीला पुन्हा ब्रेक

googlenewsNext
ठळक मुद्देसागरी वारे सुसाट; मासेमारीला पुन्हा ब्रेक मत्स्यदुष्काळाचे सावट

रत्नागिरी : आठवडाभरापूर्वीच खराब हवामानाचा फटका बसलेली सागरी मासेमारी सुरू होते न होते तोच पुन्हा एकदा सागरी वारे सुसाट वाहू लागले आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून मासेमारी करण्यापेक्षा बंदरातच नौका नांगरून ठेवणे अनेक मच्छीमारांनी पसंत केले आहे.

वाऱ्यातही काही नौका आव्हान पत्करून सागरात मासेमारीला जात आहेत. सुसाट वाऱ्यांमुळे सागरी मासेमारीला पुन्हा ब्रेक लागला आहे. महत्त्वाच्या मासळी बाजारपेठांमध्ये मासळीअभावी ग्राहकांचाही शुकशुकाट दिसून येत आहे. सागरात घोंगावणाऱ्या या वाऱ्यांचे संकट कधी दूर होणार याकडे मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात १ आॅगस्टपासून पारंपरिक मासेमारी सुरू झाली. त्यानंतर १ सप्टेंबरपासून चार महिन्यांची मुदत असलेली पर्ससीन मासेमारी सुरू झाली. परंतु नैसर्गिक संकटांच्या मालिकेमुळे मासेमारीचा बराच कालावधी वाया गेला आहे. त्यामुळे मत्स्योत्पादनात घट झाली असून, आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. पर्ससीन मासेमारीचा कालावधी ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपला आहे. चार महिन्यांच्या या पर्ससीन मासेमारी हंगामातील निम्मा कालावधी नैसर्गिक संकटांमुळे वाया गेला आहे.

१ जानेवारीपासून पुढे सुरू असलेली पारंपरिक मासेमारीही नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच प्रमाणात ठप्प आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यांना मासळी मिळेनाशी झाली असून, बेकायदा पर्ससीन मासेमारी सुरू असल्यानेच किनाऱ्यावर मासळी येत नसल्याचा आरोप पारंपरिक मच्छीमारांमधून केला जात आहे.

२०१७-१८ या वर्षी सागरी मासेमारीतून ८० हजार मेट्रिक टन मत्स्योत्पादन झाले होते. यंदा १ आॅगस्ट २०१८पासून सुरू झालेल्या हंगामात मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. मत्स्य व्यवसायातील आर्थिक आवक-जावक यावर अवलंबून असलेल्या रत्नागिरीच्या बाजारपेठेलाही मत्स्य दुष्काळाचा फटका बसला आहे.

मासळीचा हंगाम चांगला चालला तर बाजारपेठेतही तेजी असते. मात्र, यावेळी मत्स्योत्पादनात घट झाली आहे. मे २०१९ पर्यंतचा कालावधी पारंपरिक मासेमारीसाठी उपलब्ध असला तरी त्या चार सागरातील वातावरण कसे राहणार, मासळी किती प्रमाणात मिळणार याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

घुसखोरी रोखणार कशी?

परराज्यातील घुसखोर पर्ससीन तसेच एलईडी लाईटवर मासेमारी करणाºया नौकांचे आव्हान जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायासमोर आहे. तसेच जिल्ह्यातीलच सुमारे ५००पेक्षा अधिक विनापरवाना नौका बंदीकाळातही मासेमारी करीत आहेत. त्यामुळे किनाऱ्यापासून लगतच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांना मासळीच मिळेनाशी झाल्याचा आरोप पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे.

परजिल्ह्यातून मासळी आयात

रत्नागिरी शहर व परिसरातील बाजारपेठांमध्ये सध्या बांगडा, सुरमई, सौंदाळा, मोडोसा, खेकडे, चिंगूळ, यांसारखे मासे उपलब्ध असले तरी ते जिल्ह्याबाहेरून आणले जात आहेत. जिल्ह्यात मासळीचा दुष्काळ आहे. जिल्ह्यातील हर्णैमध्येही मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. परंतु यावेळी तेथील मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. दुसरीकडे परवानाधारक पर्ससीन नौकांकडून मात्र मासेमारी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जी काही बेकायदा मासेमारी सुरू आहे ती विनापरवाना नौकांकडून सुरू असल्याचा दावाही केला जात आहे.

अत्यल्प मासळी

हवामान खराब असल्याने किती काळ नौका किनाऱ्यावर ठेवायच्या, असा सवाल करीत काही नौका मात्र मासे मिळू देत किवा नको पण वाऱ्यातही लाटांवर हेलकावे खात मासेमारीला सागरात जात आहेत. मात्र, त्यांना अत्यल्प मासे मिळत असल्याची माहितीही काही मच्छीमारांनी दिली.

मत्स्यदुष्काळाचे सावट

  1.  जिल्ह्यात सागरी मासेमारीवर आलेल्या अनेक संकटांमुळे आता शासनाने मत्स्य दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
  2.  मिरकरवाडा जेटी, रत्नागिरीचे मासळी मार्केट, मारुती मंदिर मासळी मार्केट तसेच जिल्ह्यातील अन्य मासळी बाजारांमध्ये मत्स्य टंचाई जाणवत आहे.
  3. सागरातील वादळी वाऱ्यामुळे मासेमारी नौका किनाऱ्यावरच बंदरांमध्ये नांगरून ठेवाव्या लागत आहेत.
  4. मासेच मिळत नसल्याने व सागरी वाऱ्यामुळे पाण्याचे करंट्स वाढल्याने मासेमारीला जाणे धोकादायक बनले आहे.
  5.  नौका बंदरात असल्याने इंधनावर खर्च होत नसला तरी खलाशांना मात्र त्यांचे वेतन द्यावे लागत असल्याने नौका मालकांना आर्थिक झळ सोेसावी लागत आहे.
  6. डिझेलवर मच्छीमारांना मिळणारा परतावा वेळीच मिळत नसल्याने मच्छीमारी नौकाधारक त्रस्त आहेत. कोट्यवधींचा परतावा येणे बाकी आहे.
  7. मासळीच मिळत नसल्याने सागरात न जाणाºया काही नौकांवरील नेपाळी खलाशांना परत पाठवण्यात आले आहे.

Web Title: Sea Windsurf; Fishing break again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.