गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु, यावर्षीही महागाईचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 02:28 PM2018-07-11T14:28:40+5:302018-07-11T14:31:45+5:30

वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे.

The sculpture started for Ganeshotsav, this year also witnessed inflation | गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु, यावर्षीही महागाईचा फटका

गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु, यावर्षीही महागाईचा फटका

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु, यावर्षीही महागाईचा फटका शाडूच्या मातीच्या दरात वाढ, सर्वच मूर्तिशाळांमध्ये कुशल कारागिरांची उणीव

रत्नागिरी : वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे.

कोकणात घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. बहुतांश मूर्तिकारांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर माती भिजवून कामाचा शुभारंभ केला आहे. प्रामुख्याने शाडूच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. शाडूची माती गुजरात राज्यातील भावनगर येथून मागविली जाते. भावनगरहून पेण येथे माती आयात केल्यानंतर महाराष्ट्रभर मातीचे वितरण केले जाते.

इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढत असल्याने शाडूच्या मातीच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी शाडूच्या मातीचे पोते ३५० ते ३६० रूपये दराने विकण्यात येत होते. यावर्षी याच पोत्याची विक्री ३८० ते ४०० रूपये दराने सुरू आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे माती, रंगाच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तींच्या किंमतीही वाढणार आहेत.

भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेश मूर्तीचा आकार देण्यात येतो. मूर्तिवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात सध्या कारागिरांची उणीव भासत आहे. शेतीची कामे सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. मजुरीच्या दरात वाढ तसेच रंगाच्या दरातही वाढ झाल्याने बाप्पाच्या मूर्तीच्या दरावर परिणाम होणार आहे. यावर्षी बाप्पाच्या मूर्तीचे दर १० ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

गणपती बाप्पा सर्वांचा लाडका देव असल्याने भक्त त्याला विविध रूपामध्ये पाहणे पसंत करतात. मुंबईतला गणेशोत्सव सर्वांना भुरळ घालत असल्याने तेथील विविध आकारातील, रूपातील आकर्षक मूर्ती फोटोच्या स्वरूपात किंवा व्हाट्सअ‍ॅप, मोबाईलव्दारे फोटो पाठवून मूर्ती तयार करण्यास सांगण्यात येत आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या मूर्तींसाठी हट्ट धरत आहेत.
 

गणेशोत्सवाला अजून दोन महिने असले तरी मूर्ती रेखाटण्याचे काम सुरू आहे. मूर्ती वाळल्यानंतरच रंगकाम करावे लागत असल्यामुळे मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. ग्राहक आपल्या आवडीनुसार मूर्ती रेखाटण्यास सांगतात. त्यामुळे मूर्ती तयार करण्यास अवधी लागतो. इंधन दरवाढीचा परिणाम माती, रंग दरावर झाला आहे. शिवाय मजुरीचे दरही वाढले असल्यामुळे साहजिकच मूर्तीच्या दरात वाढ होणार आहे.
- सुशील कोतवडेकर, मूर्तिकार, रत्नागिरी.
 

Web Title: The sculpture started for Ganeshotsav, this year also witnessed inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.