रत्नागिरी : आध्यात्मिक राष्ट्रभक्त, योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला : आफळेबुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:19 PM2018-01-04T16:19:44+5:302018-01-04T16:23:54+5:30

जागतिक धर्मसभेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी फक्त तीन मिनीटे भाषण केले. माझ्या बंधू-भगिनींनी हे शब्द आधीच्या वक्त्यांनीही म्हटले होते. परंतु स्वामींनी हे शब्द उच्चारताच भाव पोहोचवणारा अनुभव सार्‍यांनी घेतला व वीजेची लाट गेल्यासारखे वाटून सारे थरथरत होते. अनेकांचे डोळे डबडबले, हा सार्वत्रिक अनुभव असल्याने टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात आध्यात्मिक राष्ट्रभक्त आणि योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

Ratnagiri: Spiritual patriot, warrior sannyasin famously named Vivekananda: Aflebuwa | रत्नागिरी : आध्यात्मिक राष्ट्रभक्त, योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला : आफळेबुवा

रत्नागिरी : आध्यात्मिक राष्ट्रभक्त, योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला : आफळेबुवा

Next
ठळक मुद्देगीतारहस्याने देशभक्ती वाढलीसद्गुरु-सत्शिष्य व लोकजागरण करणारी गुरु-शिष्याची जोडीटिळक-स्वामी विवेकानंद भेटीनंतर गणेशोत्सव सुरू झालाआरती व राष्ट्रगीताने सांगता

रत्नागिरी : जागतिक धर्मसभेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी फक्त तीन मिनीटे भाषण केले. माझ्या बंधू-भगिनींनी हे शब्द आधीच्या वक्त्यांनीही म्हटले होते. परंतु स्वामींनी हे शब्द उच्चारताच भाव पोहोचवणारा अनुभव सार्‍यांनी घेतला व वीजेची लाट गेल्यासारखे वाटून सारे थरथरत होते. अनेकांचे डोळे डबडबले, हा सार्वत्रिक अनुभव असल्याने टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात आध्यात्मिक राष्ट्रभक्त आणि योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

कीर्तनसंध्याह्णतर्फे महाजन क्रीडासंकुलात गुरुवारपासून सुरू झालेल्या कीर्तन महोत्सवात बोलत होते. स्वामींनी अमेरिकेत ११ सप्टेंबरला धर्मसभेत जे भाषण दिले त्यानंतर जगभरातील लोक त्यांच्या प्रेमात पडले. अमेरिकेत हेल्पलाईनचा नंबर ९११ त्यावरून दिला गेला. हे खोडून काढण्यासाठी याच तारखेला भ्याड हल्ला करण्यात आला होता.

अमेरिकेतून परत येताना बोटीमध्ये हिंदू धर्माची व ग्रंथांची निंदा करणार्‍या व्यक्तीला स्वामींनी दोन हातांत उचलले आणि माझ्या हिंदुस्थानची निंदा करणार्‍याला समुद्रात फेकून देईन, असे ताडकन सांगितले. ब्रिटनमध्येही स्वामींनी हिंदू धर्मसंस्कृती कशी श्रेष्ठ आहे याची भाषणे दिली. स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरिता दुसर्‍याला वाईट म्हणण्याची गरज नाही, असे सांगणारे स्वामी होते. यामुळेच स्वामींची सार्धशती जगभरातील ५१ देशांनी विविध कार्यक्रमांनी साजरी केल्याचा दाखला आफळेबुवांनी दिला.

गीतारहस्याने देशभक्ती वाढली

बुवांनी पूर्वरंगात गीतारहस्य या अवघड ग्रंथावर भाष्य केले. हा ग्रंथ ६५० पानांचा असून तो समजण्यास खूप कठीण आहे. मात्र लोकमान्य टिळकांनी तो स्वातंत्र्यपूर्व काळात लिहून देशभक्ती वाढवण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान दिले. समाजात मूर्ख, अविचारी व इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे हिंदू धर्माला ग्रंथाला नावे ठेवणार्‍या लोकांवर टीका केली. मुस्लीम, ख्रिस्ती लोकांचा रोजा, फास्ट म्हणजे उपवास कसा कडक असतो, हे हिंदू सांगतात. पण एकादशीचा उपाससुद्धा करता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी आसूड ओढला. हे सारे इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे घडत आहे. रविवारी किंवा मे महिन्याची सुट्टी इंग्रजांनी सुरू केली. कारण त्यांना चर्चमध्ये जायचे असते आणि उन्हाळा ते सहनच करू शकत नाहीत. हिंदूंनी स्वतःच्या संस्कृतीचा आणि हिंदुस्थानचा आदर केलाच पाहिजे, असे ठामपणे सांगितले.

सद्गुरु-सत्शिष्य व लोकजागरण करणारी गुरु-शिष्याची जोडी

योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंदांचा जीवनपट छोट्या छोट्या गोष्टी, गीते, पोवाड्यातून उलगडला. स्वामी लहानपणी जत्रेत गेले असता घोडागाडीखाली येणार्‍या लहान बालकाला वाचवताना हातातील शंकराची पिंडी फेकली होती. त्यामुळे ते घाबरले परंतु आईने तू माणसात श्री शंकर पाहिलास असे सांगितले. मोठेपणे ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे साधना शिकत होते. पाच वर्षांची साधना झाली. आता मला निर्विकल्प समाधी द्या, असे स्वामींनी गुरुंना सांगितले. त्या वेळी गुरुंनी त्यांना हिंदुस्थानातील गरिबी, बेकारी आणि भरकटलेली जनता यांना मार्ग दाखव अशी सूचना केली. मी या देहात नसलो तरी तुझ्यासोबत आहे, असे मार्गदर्शन केले. ही जोडी सद्गुरु-सत्शिष्याची व लोकप्रबोधन करणारी एकमेव होती.

टिळक-स्वामी विवेकानंद भेटीनंतर गणेशोत्सव सुरू झाला

रामकृष्ण परमहंसांच्या आदेशाप्रमाणे स्वामी विवेकानंद भारतभ्रमणास निघाले. महाराष्ट्रात आल्यावर लोकमान्य टिळकांची भेट घेतली. समाजहिताची काळजी करणार्‍या या दोन सुधारकांची बहुदा हिंदूंना एकत्रित आणणारा विराट उत्सव सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली असावी. या भेटीनंतरच टिळकांनी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला.

आरती व राष्ट्रगीताने सांगता

आफळेबुवांच्या कीर्तनाची सांगता सत्राणे उड्डाणे ही मारुतीची आरती व राष्ट्रगीताने झाली. या कीर्तनात बुवांनी कृष्ण माझी माता, विश्‍वनाथ हे नाव पित्याचे, पद्मनाभा नारायणा, अनादि निर्गुण, देव नाही देव्हार्‍यात, परिषदेचा तो दिन आला आदी पदे सुरेखपणे ऐकवली. त्यांना अजिंक्य पोंक्षे याने संगीतसाथ केली. तालवाद्यसाथ महेश सरदेसाई यांनी केली. तसेच मधुसूदन लेले, हेरंब जोगळेकर, उदय गोखले व प्रथमेश तारळकर यांची वाद्यसाथ मिळाली. दुचाकी, चारचाकी पार्किंगसाठी सुयोग्य नियोजन केले होते.
 

Web Title: Ratnagiri: Spiritual patriot, warrior sannyasin famously named Vivekananda: Aflebuwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.