रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या ११ हजार अर्जांची पुनर्तपासणी, यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 05:00 PM2018-02-05T17:00:25+5:302018-02-05T17:04:25+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ग्रीन लीस्टमध्ये ३२ हजार २६ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, ११ हजार ४ शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने पूर्ततेसाठी परत पाठवण्यात आले आहेत. या अर्जांची सध्या पुनर्तपासणी सुरू आहे. आता सर्व बँकांमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

Ratnagiri: The reconstitution of 11 thousand applications of farmers and work to complete the list of Yellow List will be started | रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या ११ हजार अर्जांची पुनर्तपासणी, यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या ११ हजार अर्जांची पुनर्तपासणी, यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ११ हजार अर्जांची पुनर्तपासणी यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ग्रीन लीस्टमध्ये ३२ हजार २६ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, ११ हजार ४ शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने पूर्ततेसाठी परत पाठवण्यात आले आहेत. या अर्जांची सध्या पुनर्तपासणी सुरू आहे. आता सर्व बँकांमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत यलो लीस्टचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

अपुऱ्या पावसामुळे खरीप - रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे उत्पादकता घटली. परिणामी नैसर्गिक आपत्तीचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला, अनेक शेतकरी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करु शकले नव्हते.

शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे बँकेकडून नव्याने पीक कर्ज घेता आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील २७ हजार ६४ शेतकऱ्यांना ७२ कोटी ८७ लाख ६० हजार ६६ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान जाहीर करताना या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाखावरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली.

शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील १६ हजार २९८ शेतकऱ्यांना २७ कोटी ५७ लाख ८६ हजार ६६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.

तसेच राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज घेतलेल्या १० हजार ७६६ शेतकऱ्यांना ४५ कोटी २९ लाख ८० हजार रुपये कर्जमाफी मिळाली आहे. जिल्ह्यातील एकूण २७ हजार ६४ एवढ्या लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेंतर्गत ७२ कोटी ८७ लाख ६० हजार ६६ रूपये इतकी रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ९ हजार ६६ शेतकऱ्यांना १९ कोटी ७९ लाख ४२ हजार ४३३ रूपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या एकूण ७ हजार २३२ शेतकऱ्यांना ७ कोटी ७८ लाख ४३ हजार ६३३ रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे.
 

निकषात बसणारे शेतकरी वंचित राहू नयेत
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ११ हजार ४ शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटींच्या पूर्ततेसाठी परत पाठवण्यात आले आहेत. निकषात बसणारे अर्जदार शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, म्हणून अशा शेतकऱ्यांच्या अर्जातील माहितीची बँकेकडील असलेल्या माहितीच्या आधारे तपासणी सध्या सर्व बँकामध्ये सुरू झाली आहे. ५ फेब्रुवारीपर्यत अर्ज तपासणीचे काम पूर्ण करून शासनाकडे पाठविले जाणार आहेत.
- बकुळा माळी,
जिल्हा उपनिबंधक, रत्नागिरी.

 

जबाबदारी समितीकडे
निकषात बसणारे अर्जदार शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी अशा शेतकऱ्यांच्या अर्जातील माहितीची शहानिशा करून त्याची पात्रता / अपात्रता निश्चित करण्याची जबाबदारी समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारीपर्यंत पिवळी यादीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

अर्जामध्ये अपुरी माहिती
बँकांनी पुरवलेल्या कर्जखात्यांच्या माहितीतील त्रुटी तसेच शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे ताळमेळ बसू शकला नाही, अशा प्रकरणातील शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम निर्णय घेणे शक्य होत नाही.

आवश्यक दुरूस्ती करणार
शेतकऱ्यांसंबधी माहितीची शहानिशा करून त्यामध्ये आवश्यक ती दुरूस्ती बँकेमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर तालुकास्तरीय समितीतर्फे तपासणीअंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करून लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

Web Title: Ratnagiri: The reconstitution of 11 thousand applications of farmers and work to complete the list of Yellow List will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.