रत्नागिरी : आता रक्तदात्यांच्या वाहतुकीसाठी मोफत वाहन,  बॉम्बे ब्लड ग्रुपचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:32 PM2018-01-01T15:32:19+5:302018-01-01T15:36:41+5:30

कुणाला आयत्यावेळी रक्त हवे असल्यास बिचारा रक्तदाता सामाजिक कार्याच्या भावनेने असेल तेथे, मिळेल त्या वाहनाने रुग्णालयापर्यंत पोहोचतो, त्याच्या धावपळीमागे एकच कारण असते, रक्त हवे असलेल्या माणसाचा जीव स्वत:च्या रक्ताने वाचवणे.

Ratnagiri: Now a free vehicle for donor transport, Bombay Blood Group's initiative | रत्नागिरी : आता रक्तदात्यांच्या वाहतुकीसाठी मोफत वाहन,  बॉम्बे ब्लड ग्रुपचा उपक्रम

रत्नागिरी : आता रक्तदात्यांच्या वाहतुकीसाठी मोफत वाहन,  बॉम्बे ब्लड ग्रुपचा उपक्रम

Next
ठळक मुद्देसोलापूर, सांगलीत उपक्रम सुरु.लवकरच सातारा, रत्नागिरीतही होणार

विहार तेंडुलकर 

रत्नागिरी : कुणाला आयत्यावेळी रक्त हवे असल्यास बिचारा रक्तदाता सामाजिक कार्याच्या भावनेने असेल तेथे, मिळेल त्या वाहनाने रुग्णालयापर्यंत पोहोचतो, त्याच्या धावपळीमागे एकच कारण असते, रक्त हवे असलेल्या माणसाचा जीव स्वत:च्या रक्ताने वाचवणे.

अशावेळी रक्तदात्याची निदान रुग्णालयापर्यंत तरी परवड होऊ नये, यासाठी आता मोफत वाहनाची लवकरच व्यवस्था होणार आहे. बॉम्बे ब्लड ग्रुपने सामाजिक भावनेतून हा उपक्रम सुरु केला असून लवकरच चिपळूण आणि रत्नागिरी येथे हे मोफत वाहन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

रक्तदात्याची गरज भासेल तेव्हा रुग्णालयातून त्याला फोन येतो, मग त्याची धावाधाव होते. अगदी रक्त दुसऱ्याला द्यायचे असेल तरी रुग्णालयात पोहोचण्यासाठी जीवाचा आटापिटाही त्याचा त्यालाच करावा लागतो.

निदान अशा सेवाभावी दात्याला निदान रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि रक्तदान केल्यानंतर घरी पोहोचवण्यासाठी एखादे वाहन असावे, या हेतूने बॉम्बे ब्लड ग्रुप या संस्थेचे संस्थापक विक्रम यादव यांनीच वाहनाची व्यवस्था करण्याचे ठरवले अन् ही संकल्पना आता सत्यात उतरत आहे.

सांगली आणि सोलापूर येथे ही वाहन व्यवस्था दोन दिवसांपूर्वी पासूनच सुरु झाली आहे, त्यानंतर लवकरच ही सेवा सातारा जिल्ह्यात सुरु होईल, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे व शेवटी रत्नागिरीत ही सेवा सुरु होईल.

ही सेवा सुरु झाल्यानंतर यापुढे रक्तदात्यांना विनात्रास रुग्णालयापर्यंत जाणे शक्य होणार आहे. रक्तदान केल्यानंतर लगेचच हे वाहन त्यांना घरी पोहोचवेल. कोणताही रुग्ण वाहन नाही म्हणून तडफडता कामा नये, ही आपली प्रामाणिक इच्छा असल्याचे विक्रम यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ही सेवा पुरवताना कोणत्याही सीमेचे बंधन घातलेले नाही. एखाद्या रक्तदात्याला अन्य जिल्ह्यात जाऊन रक्तदान करायचे असेल तर तोही या वाहनाचा लाभ घेऊ शकेल. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. फक्त या सर्व बाबींचा हिशोब संबंधित वाहनचालकाला द्यावा लागणार आहे.

सध्या ही मोफत वाहनसेवा काही शहरांमध्येच सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर ती टप्प्याटप्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार असल्याचे विक्रम यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
 

केवळ दहा रुपयांची कमाल..

बॉम्बे ब्लड ग्रुप विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. रक्तदात्यांसाठी मोफत वाहनसुविधा हाही त्यातीलच एक उपक्रम. आतापर्यंत संपूर्ण भारतात विक्रम यादव यांनी व्हॉटस्अ‍ॅपचे ५८३ ग्रुप तयार केले आहेत. त्यामधून या ग्रुपचे १५ हजार ७३० सभासद झाले आहेत. ज्यावेळी एखादा उपक्रम राबवायचा असेल, त्यावेळी प्रत्येकाने दहा दहा रुपये या उपक्रमासाठी द्यायचे. त्यातूनच जवळपास दीड लाखांची रक्कम काही क्षणात उभी राहते. मोफत वाहन सुविधेचा निर्णयही अशाच छोट्या रकमेतून हळूहळू फळास जात आहे.

आमचा बॉम्बे ब्लड ग्रुप सामाजिक कार्यात अग्रेसर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आजपर्यंत आम्ही रक्ताची आवश्यकता असणाºया सर्व रुग्णांची काळजी घेत होतो, त्यांना रक्तपुरवठा तातडीने कसा होईल, हे राज्यभर आणि राज्याबाहेरही पाहत होतो. आता रक्तदात्यांचीही आम्ही काळजी घेणार आहोत. त्यामुळेच त्यांच्यासाठी मोफत वाहन सुविधा आम्ही सुरु केली आहेत. सांगली, सोलापूर येथे ही वाहने सुरु झाली आहेत.
-विक्रम यादव,
अध्यक्ष, बॉम्बे ब्लड ग्रुप

Web Title: Ratnagiri: Now a free vehicle for donor transport, Bombay Blood Group's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.