रत्नागिरीत नगराध्यक्ष निवडणुकीची तयारी ! - अनेकजण स्पर्धेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 02:29 PM2019-05-22T14:29:11+5:302019-05-22T14:29:56+5:30

लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी

Ratnagiri municipal elections ready! - Many in the competition | रत्नागिरीत नगराध्यक्ष निवडणुकीची तयारी ! - अनेकजण स्पर्धेत 

रत्नागिरीत नगराध्यक्ष निवडणुकीची तयारी ! - अनेकजण स्पर्धेत 

Next
ठळक मुद्दे- लोकसभा निकालानंतर राहुल पंडित देणार राजीनामा ?

प्रकाश वराडकर । 
रत्नागिरी : लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी नगराध्यक्षपद स्वीकारले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा असून, थेट निवडणूकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

रत्नागिरीचे नगराध्यक्षपद सेनेचे राहुल पंडित यांना पक्षाने दोन वर्षांसाठी दिल्याची व त्यानंतरच्या कालावधीत बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली जाणार अशी कुजबूज गेल्या दोन वर्षांपासून होती. मात्र, त्याबाबत सेनेच्या नेत्यांनी मौन पाळले होते. पंंडित यांची दोन वर्षे पूर्ण होताच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचदरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने पंडित यांनी रजेवर जाण्याचा मार्ग पक्षाने काढला. रजा संपून आता पंडित यांनी पदभार स्वीकारला. मात्र, ते प्रत्यक्ष काम करीत नसल्याने नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षातूनच सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ आहे. 

या पार्श्वभूमीवर थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले उपनगराध्यक्ष बंड्या साळवी यांचे नाव सेनेतर्फे पुढे येत आहे. शिवसेनेतून त्यांच्या नावाची चर्चा असल्याने सध्या शहरात या थेट निवडणुकीसाठी सेनेतर्फेही तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख म्हणून गेली अनेक वर्षे काम पाहणारे बंड्या साळवी हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी तालुक्यात आपल्या संघटन कौशल्याने शिवसेनेची चांगली बांधणी केली आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी धडाडीने निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सेनेतर्फे साळवी यांनाच थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सेनेतील ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्मितल पावसकर यांचीही नावे चर्चेत आहेत.

थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार याची कल्पना राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांना होती. त्यामुळे उमेश शेट्ये निवडणूक लढविणार होते. मात्र, त्यांचे अकाली निधन  झाले. त्यामुळे आता शेट्ये यांची सून नगरसेविका कौसल्या शेट्ये  तसेच  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांची नावे चर्चेत आहेत. रत्नागिरीच्या थेट नगराध्यपद निवडणुकीबाबतचा निर्णय लोकसभा निवडणूक निकालावर अवलंबून राहणार आहे. 

कुवारबाव पॅटर्न वापरणार!
रत्नागिरीत थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक  होणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच त्यावेळी सेना-भाजपची युती असेल का, हा मुद्दाही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी शिवसेना विरूद्ध इतर सर्व पक्ष असा फॉर्म्युला कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आला. तेथे सेनेचा पराभव झाला. तसाच फॉर्म्युला रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राबविला जाईल का, याचीही चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाली आहे.  

Web Title: Ratnagiri municipal elections ready! - Many in the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.