Ratnagiri district flooded tourists, this year, increased enthusiasm, due to frequent vacations, crowds, hotels and lodge crowd | रत्नागिरी जिल्हा पर्यटकांनी फुलला, यंदा उत्साह वाढला, सलग सुट्ट्यांमुळे किनारे, हॉटेल्स, लॉजमध्ये गर्दीच गर्दी

ठळक मुद्देसलग सुट्ट्यांमुळे किनारे, हॉटेल्स, लॉजमध्ये गर्दीच गर्दीओखीच्या अडथळ्यानंतर कोकण पॅक

शोभना कांबळे

रत्नागिरी : चौथा शनिवार, रविवार आणि त्याला जोडून आलेली ख्रिसमसची सुटी अशा सलग सुट्ट्यांची पर्वणी साधून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांसह गणपतीपुळे येथील गणेश मंदिर आणि तेथील किनारा पर्यटकांनी फुलला आहे.

थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर या दोन दिवसांचा जल्लोष साजरा करण्यासाठी यावर्षी पर्यटकांनी सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. येथील काही लॉज १० जानेवारीपर्यंत हाऊस फुल्ल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सिंधुदुर्गप्रमाणेच आता रत्नागिरी जिल्ह्याकडे पर्यटक वर्ग आकर्षित होऊ लागला आहे. दरवर्षी गणपतीपुळे हे धार्मिक ठिकाण असल्याने याठिकाणी पूर्वीपासूनच गर्दी होत होती. मात्र, आता येथील किनाऱ्यांचेही आकर्षण पर्यटकांना वाटू लागल्याने देवदर्शनाबरोबरच पर्यटन करणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे.

रत्नागिरीतील भाट्ये, मांडवी येथील किनाऱ्याबरोबरच आता रत्नागिरीतून आरे-वारेमार्गे गणपतीपुळेला जाणाऱ्यांना आरे-वारे बीच आकर्षित करू लागला आहे. यापूर्वी कोल्हापूरकडून येणारे पर्यटक हातखंबा मार्गे ये - जा करत. मात्र, आता येताना किंवा जाताना आरे-वारे बीचवर थांबू लागले आहेत.

याचबरोबर जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या दापोलीतील सर्व पर्यटनस्थळे, गुहागर समुद्र किनारा, वेळणेश्वर किनारा तसेच जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळे पर्यटकांना भुरळ घालू लागली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हिवाळी हंगामात सुटी घालवण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे.

यावर्षी चौथा शनिवार, रविवार आणि त्याला जोडून आलेली ख्रिसमसची सुटी नोकरदार मंडळींसाठी पर्वणी ठरली आहे. त्यामुळे १ जानेवारीपर्यंत गणपतीपुळेतील सर्व लॉज फुल्ल झालेली आहेत. हिवाळी हंगामात त्यानंतरही सुटीचा आनंद घेण्यासाठी काहींनी पुढे अगदी १० जानेवारीपर्यंत लॉजचे आरक्षण करून ठेवले असल्याचे काही लॉजमालकांनी सांगितले.
 

रत्नागिरी शहराबरोबरच दापोली, गुहागर या तालुक्यांतील पर्यटन स्थळांकडेही पर्यटक यावर्षी मोठ्या प्रमाणात वळले असल्याने सध्या पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेसह गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर आदी ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्ट आहेत. मात्र, या तीन दिवसांच्या सुटीच्या कालावधीत तीही भरलेली आहेत.

लॉजचे, रेस्ट हाऊसचे आरक्षण या तीन दिवसांमध्ये फुल्ल झाल्याने काही पर्यटकांना निवासाची सोय करताना तारांबळ उडत आहे. ही गर्दी आता अगदी १ जानेवारीपर्यंत कायम राहील, असा विश्वास अनेक लॉजधारकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.


पूर्वी गणपतीपुळे येथे ठराविक लॉज होते. त्यामुळे पर्यटक वाढले की, त्यांच्या राहण्याची सोय होणे अडचणीचे होत असे. मात्र, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने रिसॉर्टची सुविधा देतानाच येथील स्थानिक लोकांसाठी निवास व न्याहरी योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता मोठ्या लॉजमध्ये राहाणे ज्यांना परवडणारे नाही किंवा ज्यांना लॉज उपलब्ध होत नाहीत, असे पर्यटक निवास व न्याहरी योजनेचा आधार घेत आहेत.
 

यावर्षी रत्नागिरीत गुलाबी थंडीचा प्रत्यय येत आहे. त्याचबरोबर चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी ख्रिसमस अशी तीन दिवस सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे या सुट्टीत रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. सध्या आमच्या लॉजमध्ये १०० टक्के आरक्षण झाले आहे, तर काहींनी आताच ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीचेही आरक्षण करून ठेवले आहे. त्यापुढेही आरक्षण सध्या होत आहे.
रवींद्र तथा मुन्ना सुर्वे,
हॉटेल प्रभा, रत्नागिरी
 

गेल्या तीन दिवसात हॉटेल विवेकमध्ये १०० टक्के आरक्षण झाले आहे. सायंकाळच्या वेळीही काही फॅमिलीज येतात. पण, लॉजमधील सर्व खोल्या भरलेल्या असल्याने त्यांना नकार द्यावा लागतो. आमच्या येथे सात दिवसांपासूनच आगाऊ आरक्षण करण्यात आले. यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
- व्यवस्थापक,
हॉटेल विवेक, रत्नागिरी
 

गणपतीपुळे तसेच वेळणेश्वर आदी ठिकाणी पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्ट आहेत, तर काही हॉटेल एमटीडीसीच्या माध्यमातून सेवा देत आहेत. जिल्ह्यात २९६ ठिकाणी स्थानिक व्यावसायिक निवास व न्याहरी योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना अधिकाधिक सुविधा व उत्तम जेवणाची सोय उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे ही ठिकाणेही आता पर्यटकांनी भरलेली आहेत. जिल्ह्यात आतापासूनच पर्यटकांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे.
- जगदीश चव्हाण,
प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.
 

आता पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. या शनिवारपासून सोमवारपर्यंत सलग सुट्टी आल्याने नोकरदारवर्गाला या सुट्टीचा अधिक फायदा मिळाला आहे. काहींनी या सुट्टीला धरून नाताळच्या सुट्टीचा आनंद घेता यावा, सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अगदी ४ जानेवारीपर्यंत आरक्षण केले आहे.
- चेतन केळकर,
दुर्वांकूर, गणपतीपुळे

२३ ते २५ डिसेंबर या कालावधीत लॉज फुल्ल आहेतच. पण ३१ डिसेंबरला शनिवार आणि १ जानेवारीला रविवार असल्याने या दोन दिवसांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. आमच्याकडे तर सलग ५ जानेवारीपर्यंत आरक्षण झालेले आहे.
- ऋषिकेश गांधी,
हॉटेल सदानंद, हातखंबा

गतवर्षीपेक्षा यावर्षी पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ झाली आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत भाट्ये येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असून, २३ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत हॉटेलचे आरक्षण झालेले आहे.
- व्यवस्थापक,
हॉटेल रत्नसागर, भाट्ये, रत्नागिरी

दरवर्षी नाताळची सुट्टी धरून अगदी २१ डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत गणतीपुळेत पर्यटक गर्दी करीत असतात. यावर्षी २३ ते २५ डिसेंबर अशी सलग सुट्टी आल्याने गणपतीपुळे पर्यटकांनी फुलले आहे. या ठिकाणच्या सर्व लॉजचे आधीच आरक्षण झाल्याने काहींना राहण्याची सोय करण्यासाठी रत्नागिरीत जावे लागत आहे.
- संजय पुनसकर,
गणेश कृपा, गणपतीपुळे

२३ ते २६ डिसेंबर या कालावधीत सर्व खोल्यांचे आरक्षण झाले आहे. काहींनी तर अगदी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीचेही आरक्षण आतापासूनच केले आहे. यावर्षी पर्यटकांची गर्दी अधिक वाटते. कारण सलग सुट्ट्या आल्यामुळे गर्दी वाढली आहेच; यंदा वातावरणही स्वच्छ आणि थंड आहे.
- व्यवस्थापक,
हॉटेल सफारी एशिया, रत्नागिरी
 


Web Title: Ratnagiri district flooded tourists, this year, increased enthusiasm, due to frequent vacations, crowds, hotels and lodge crowd
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.