रत्नागिरी : चौदाव्या वित्त आयोगातील कामाचा अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 04:57 PM2018-04-28T16:57:10+5:302018-04-28T16:57:10+5:30

चिपळूण पंचायत समितीमध्ये शुक्रवारी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पंचायत राज समितीच्या आलेल्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची व पदाधिकाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली.

Ratnagiri: Demand for the rights of work in the 14th Finance Commission to the development developers | रत्नागिरी : चौदाव्या वित्त आयोगातील कामाचा अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्याची मागणी

रत्नागिरी : चौदाव्या वित्त आयोगातील कामाचा अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्याची मागणी

Next
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींनी मांडली गाऱ्हाणी, पदाधिकारी यांच्याशी संवाद प्रादेशिक नळपाणी योजनेचा मुद्दा

चिपळूण : चिपळूण पंचायत समितीमध्ये शुक्रवारी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पंचायत राज समितीच्या आलेल्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची व पदाधिकाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली.

चिपळूण पंचायत समितीत पंचायत राज समितीचे आगमन झाले असता सभापती पूजा निकम, गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी स्वागत केले. चिपळूण येथे आमदार पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अशोक कदम यांनी प्रादेशिक नळपाणी योजनेबाबतचा विषय मांडला. ओवळी, नांदिवसे या योजनेबाबत महावितरण कंपनीच्या बिलातील फरकावरून तीन महिने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे, याकडे लक्ष वेधले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी ग्रामीण भागात घरबांधणीचे अधिकार ग्रामपंचायतीला नसल्याने जिल्हाधिकारी किंवा प्रांत कार्यालयाकडून मंजुरी काढली जाते. याचा आधार घेत अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.

ही बांधकामे हटवण्यासाठी ग्रामपंचायतीला साधे पोलीस संरक्षणही मिळत नाही. त्यामुळे कारवाई करणे अवघड होते. अनेकवेळा ज्या घरांना मंजुरी मिळाली आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीला काहीही माहीत नसते. शिवाय खेर्डी, पिंपळी गावच्या नळपाणी योजनेचा प्रश्नही त्यांनी मांडला.

दहीवली सरपंच रुपेश घाग यांनी चौदाव्या वित्त आयोगातील कामात बदल करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अडचणी होतात. तरी हा अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना मिळावा, असे सूचविले. समाजकल्याण योजनेतून आपण सूचवल्यापैकी एकही काम गेले वर्षभर झाले नसल्याची खंत जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर यांनी व्यक्त केली.

पंचायत समिती सदस्य विश्वनाथ उर्फ बाबू साळवी यांनी पोफळी येथे रस्ता अडविल्याचा प्रश्न उपस्थित केला. हा रस्ता खुला करून मिळावा, अशी मागणी केली. पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनी सेस फंड व उपकराचा निधी मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली व आरोग्य विभागाच्या कारभाराकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

सभापती पूजा निकम यांनी आपण आपल्या मागण्यांचे निवेदन लेखी स्वरुपात देणार असल्याचे सांगून सदस्यांनी व्यक्त केलेल्या समस्यांना दुजोरा दिला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष खताते व माजी विरोधी पक्षनेते कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन समितीचे स्वागत केले.

समितीचे सदस्य आमदार देशपांडे, आमदार सावंत तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. विस्तार अधिकारी बी. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पंचायत समितीचे सर्व सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, सरपंच उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर सभाशास्त्रानुसार पंचायत राज समितीची सभा आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चिपळूणमधील मांडण्यात आलेल्या समस्यांबाबत लवकरच तोडगा निधण्याची आशा आहे.

पंचायत समितीच्या आवाराची सजावट

पंचायत राज समितीचे आगमन होणार असल्याने सुमारे दीड महिन्यापासून चिपळूण पंचायत समितीची प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली होती. पंचायत समितीच्या आवाराची सजावट करण्यात आली असून, रंगरंगोटी केल्यामुळे इमारतीचे रूपडे पालटले आहे. रांगोळी काढल्याने परिसर अधिकच खुलून दिसत होता.

गेटवरील उपोषणाची तीटवगळता पंचायत समितीतील पंचायत राज समितीचे उत्साही स्वागत झाले आणि बैठकही यशस्वी झाली. पंचायत राज समितीमधील त्रुटी उघड व्हाव्यात, त्यावर चर्चा व्हावी, योग्य ती उपाययोजना व्हावी, अशी अपेक्षा असते. परंतु, पंचायत राज समितीसमोर आपले हसू होऊ नये, यासाठी अधिकारी पुरेशी खबरदारी घेतो. कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन समिती पदाधिकाऱ्यांचे चोचले पुरवतो, अशा काही गोष्टी यानिमित्ताने निदर्शनास आल्याने काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Ratnagiri: Demand for the rights of work in the 14th Finance Commission to the development developers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.