पावणेपाच तास पोलीस मोजत होते पैसे, चार कोटी ४८ लाख रूपये ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 02:29 PM2018-06-20T14:29:08+5:302018-06-20T14:29:08+5:30

कऱ्हाड येथे व्यापाऱ्यांचे अपहरण करून पळालेल्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम मोजायला पोलिसांना तब्बल पावणेपाच तास लागले. या तिघांकडून ४ कोटी ४८ लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत.

Police 4 crore 48 lakhs seized | पावणेपाच तास पोलीस मोजत होते पैसे, चार कोटी ४८ लाख रूपये ताब्यात

पावणेपाच तास पोलीस मोजत होते पैसे, चार कोटी ४८ लाख रूपये ताब्यात

Next

- सचिन मोहिते
देवरूख -  कऱ्हाड येथे व्यापाऱ्यांचे अपहरण करून पळालेल्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम मोजायला पोलिसांना तब्बल पावणेपाच तास लागले. या तिघांकडून ४ कोटी ४८ लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेले तिघे संशयित, दोन गाड्या आणि रोख रक्कम सातारा गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

दोन कारमधून आलेल्या लुटारूंनी क-हाड येथे चार व्यापा-यांकडील रोख साडेचार कोटी रूपये घेऊन पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी सगळीकडे नाकाबंदी केली. क-हाडहून पळालेले हे लुटारू रत्नागिरी जिल्ह्यात आले. चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र तेथून पळण्यात लुटारूंना यश आले. संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथे त्यांनी महामार्ग सोडला. आतील गावांमधून ते संगमेश्वरकडे जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि एक गाडी, तीन व्यक्ती आणि रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागली.

गजानन सहदेव सदडीकर (४५, बदलापूर, ठाणे), विकासकुमार मिश्रा (३0, जोगेश्वरी मुंबई) आणि महेश कृष्णा भांडारकर (५३, ठाणे) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. सात वाजता सर्वजण संगमेश्वर पोलीस स्थानकात दाखल झाले. तेथे पोलिसांनी पैसे मोजण्याचे यंत्र घेत गाडीतून ताब्यात घेतलेली रक्कम मोजायला सुरूवात केली. पावणेबारा वाजेपर्यंत पैसे मोजण्याचे काम सुरू होते. ही रक्कम एकूण ४ कोटी ४८ लाख रूपये इतकी होती.

मध्यरात्री सातारा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस संगमेश्वरमध्ये आले. तेथे त्यांनी तीन संशयित, गाडी आणि पैसे ताब्यात घेतले. यावेळी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनिल विभुते आणि संगमेश्वरचे निरीक्षक महेश थिटे उपस्थित होते.

Web Title: Police 4 crore 48 lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.