गुहागरात रंगणार मसापचे साहित्य संमेलन
गुहागरात रंगणार मसापचे साहित्य संमेलन

असगोली : मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगती व विकासासाठी कार्यरत असणाऱ्या तसेच मराठी कवी व साहित्यिक यांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरच्यावतीने शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २९ व ३० नोव्हेंबर रोजी उर्विमाला साहित्य नगरी पोलीस परेड मैदान गुहागर येथे संपन्न होणाऱ्या या दोन दिवसीय दिमाखदार साहित्य संमेलनात गुहागरच्या साहित्यिक, ऐतिहासिक व सांस्कृ तिक चळवळीला अधिकाधिक चालना देण्याचा मानस संयोजकांनी ठेवला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्ष राजेंद्र आरेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर, कार्यवाह ईश्वरचंद्र हलगरे, सल्लागार अ‍ॅड. संकेत साळवी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. शिवाजी चौकातील शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ग्रंथदिंडी व शोभायात्रेस सुरुवात होईल. शोभायात्रा सकाळी ११ वा. साहित्य नगरीत पोहोचेल. नंतर ११ ते १ वा. प्रा. अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या संमेलनाचा सुप्रसिद्ध साहित्यिक व ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यावेळी अनेक क्षेत्रातील साहित्यिक व मान्यवरांची उपस्थितीत सागरगाज या साहित्य संमेलन स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न होईल. दुपारी १ ते ३ वा. मध्यंतर व भोजन, दु. ३ ते ४ वा. पुस्तक प्रकाशन सोहळा, सायंकाळी ४ ते ५ वा. या वेळेत सागरगाज हे स्थानिक कवींचे कवी संमेलन रंगणार आहे. सायंकाळी ५ ते ६ वा. कवी प्रशांत मोरे (मुंबई) यांच्या आईच्या कविता हा राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री ७ वा. नंतर कोकणची लोकपरंपरा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम साहित्य नगरीत संपन्न होईल.
दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १०.३० वा. शालेय विद्यार्थी, पालक शिक्षक यांना केंद्रीय भूत मानून पाठ्यपुस्तकातील कवी लेखक विद्यार्थ्यांचे भेटीला हा कार्यक्रम होईल. सकाळी १०.३० ते ११.३० वा. गुहागरचा सांस्कृतिक व ऐतीहासिक वारसा या विषयावर परिसंवाद रंगणार आहे.
सकाळी ११.३० ते १२.३० वा. सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांची प्रकट मुलाखत अरुण इंगवले हे घेतील. दुपारी १२.३० ते २ वा. मध्यंतर व भोजन, दुपारी २ ते ३.३० वा. वेळेत कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर ३.३० ते ५ या वेळेत निमंत्रीत कवींचे कवीसंमेलन होईल.
सायंकाळी ५ नंतर समारोप व पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे. (वार्ताहर)


Web Title: Masap's literature gathering will be held in Guhagar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.