उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:36 PM2018-05-22T16:36:07+5:302018-05-22T16:36:07+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी उंबर्ले आठगाव पंचक्रोशीतील जनतेने उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उपोषण सुरु केले आहे.

The hunger strike of Panchkrashi in the Umbreli Primary Health Center | उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे उपोषण

उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे उपोषण

Next
ठळक मुद्दे कामचुकार कर्मचाऱ्यांची बदली करा भोंगळ कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक

दापोली : दापोली तालुक्यातील उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामचुकार आरोग्य कर्मचाऱ्यांची बदली व्हावी, आरोग्य केंद्रात इमानेइतबारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हेतूपुरस्सर केलेली बदली रद्द व्हावी, रूग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी उंबर्ले आठगाव पंचक्रोशीतील जनतेने उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर उपोषण सुरु केले आहे.

या उपोषणाकरिता आठ गाव पंचक्रोशीचे अध्यक्ष सुरेश माने, माजी सभापती वसंत पाते, उंबर्ले सरपंच सुनीता आग्रे, अशोक शिगवण, सुभाष शिगवण, किसन भाताडे, डी. एल. कोलंबे, रामचंद्र पांगत, लक्ष्मण पांगत, लक्ष्मण कासेकर, प्रकाश जोशी, मंगेश पवार, शैलेश पाते, मनोज माने यांच्यासह उंबर्ले, ओळगाव, किन्हळ, नानटे, माथेगुजर, गावरई, तेरेवायंगणी, निगडे या गावांतील शेकडो लोकांनी या उपोषणात सहभाग घेतला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोदे हे चांगले काम करत आहेत. परंतु काही कामचुकार कर्मचाऱ्यांनी त्यांची पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली आहे. या डॉक्टरांविरोधात पंचायत समितीने चौकशी समिती नेमली.

चौकशी समितीच्या अहवालानुसार त्यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथीलच काही कामचुकार कर्मचाऱ्यांना ते नको आहेत, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेला चांगला अधिकारी गमवायचा का? कामचुकार कर्मचाऱ्यांची बदली करून त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना अभय दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ज्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम ६० टक्यावरुन १०० टक्क्यावर नेवून ठेवले, या अधिकाऱ्याविरोधात जनतेची कोणतीही तक्रार नाही. परंतु काही कामचुकार कर्मचाऱ्यांना ते अडचणीचे ठरत असल्यामुळे दबाव आणून त्यांची बदली करण्याचा घाट कोणी घालत असेल तर जनता गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
 

 

ग्रामस्थ व रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल तक्रार नाही. परंतु डॉ. सरोदे यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याने नवजात शिशूला मृत्यूला सामोरे जावे लागले, अशी खोटी तक्रार याच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केली. मात्र, त्या बाळाच्या आईची कोणतीही तक्रार नाही.
- वसंत पाते,
माजी सभापती
 

जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्यमंत्री, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे गेले ६ महिने पत्रव्यवहार सुरु आहे. परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. जे चांगले काम करतात, त्यांची बदली करून स्थानिक जनतेवर अन्याय केला जात आहे.
- सुरेश माने,
अध्यक्ष, आठगाव विकास मंडळ


जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नियमित उत्तम सेवा बजावणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. डॉ. सरोदे येथील जनतेला उत्तम सेवा देत असून, कामचुकारपणा करून डॉ. सरोदेंना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच येथून बदली करावी, तरच येथील वातावरण शांत होईल.
- सुनीता आग्रे,
उंबर्ले सरपंच

Web Title: The hunger strike of Panchkrashi in the Umbreli Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.