रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:41 PM2018-04-13T16:41:08+5:302018-04-13T16:41:08+5:30

हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत २०१७ - १८साठी जिल्ह्यातील १४ हजार २७८ शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ६७३.११ हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख ६२ हजार ८८४ रूपये शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला असून, जिल्ह्यासाठी एकूण १३३ कोटी ९६ लाख ७९ हजार ९०० रूपयांचा विमा आहे.

Fruit Pepper Insurance for 14,000 farmers in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा

रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा१०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख रूपयांचा परतावा स्वयंचलित हवामान केंद्रामुळे निराशा टळणार

रत्नागिरी : हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत २०१७ - १८साठी जिल्ह्यातील १४ हजार २७८ शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ६७३.११ हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख ६२ हजार ८८४ रूपये शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला असून, जिल्ह्यासाठी एकूण १३३ कोटी ९६ लाख ७९ हजार ९०० रूपयांचा विमा आहे.

महाराष्ट्र शासनाने २०१७-१८साठी फळपीक विमा योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत सरासरीपेक्षा कमी - अधिक पाऊस, पावसाचा खंड, सोसाट्याचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण जाहीर केले.

जिल्ह्यातील १३ हजार ११ शेतकऱ्यांनी १२ हजार ४३९.०२ हेक्टर क्षेत्रासाठी आंबा पिकाकरिता फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. १२४ कोटी ३८ लाख ५९ हजार ८ रूपयांचा विमा असून, त्याकरिता शेतकऱ्यांनी ७ कोटी ९ लाख २ हजार ९७५ रूपयांचा प्रीमियम भरला आहे. १२६७ शेतकऱ्यांनी काजू पिकासाठी फळपीक विमा घेतला होता. १२३४.०९ हेक्टर क्षेत्रासाठी ९ कोटी ५८ लाख २० हजार ८९२ रूपयांचा विमा असून, शेतकऱ्यांनी ४९ लाख ५९ हजार ९१० रूपये इतके प्रीमियमचे पैसे भरले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबापीक लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे.

शासनाने प्रायोगिक तत्त्वावर हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०१२ साली जाहीर केली होती. यावर्षी बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.

उत्पादन घसरले. शिवाय दर्जावरही परिणाम झाला आहे. एकाच हंगामात तीन ऋतूंचा प्रत्यय जिल्हावासीयांनी घेतला आहे. अवेळचा पाऊस, शिवाय गारपिटीचाही अनुभव शेतकऱ्यांनी फेब्रुवारीत घेतला आहे. मार्चमध्ये ४० अंश सेल्सियस इतक्या उच्चत्तम तापमानाची नोंद झाली होती. या शिवाय नीचांक तापामानाचा परिणाम पिकावर झाला आहे.

दि. १ जानेवारी ते दि. १५ एप्रिलअखेर अवेळचा पाऊस, दि. १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीअखेर नीचांक तापमान, दि. १५ मार्च ते ३१ मेपर्यंत उच्चांक तापमान, तर गारपिटीसाठी दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल आदी निकष निश्चित केले होते. या निकषाच्या आधारावर विमा देण्यात आला आहे.

१०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख रूपयांचा परतावा

२०१२-१३ या आर्थिक वर्षात १५०० शेतकऱ्यांना विमा योजनेंतर्गत २ कोटी ३२ लाख रूपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली होती. २०१३-१४ या आर्थिक वर्षात १०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख रूपयांचा परतावा देण्यात आला होता. २०१४ - १५मध्ये १७७६ शेतकऱ्यांना ४ कोटी ८८ लाख १८ हजार ६२९, तर २०१५ - १६मध्ये ३,०१२ शेतकऱ्यांना १२ कोटी १७ लाख २३२ रूपये, तसेच २०१६ - १७मध्ये जिल्ह्यातील १० हजार ६०३ लाभार्थी शेतकऱ्यांना १६ कोटी २७ लाखांचा परतावा देण्यात आला होता.

स्वयंचलित हवामान केंद्रामुळे निराशा टळणार

सरासरीपेक्षा कमी अधिक पाऊस, पावसाचा खंड, सोसाट्याचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. दरवर्षी जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेत सहभागी होतात. मात्र, चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी येणारी निराशा आता स्वयंचलित हवामान केंद्रामुळे टळणार आहे. जिल्ह्यात एकूण ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत.

Web Title: Fruit Pepper Insurance for 14,000 farmers in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.