ठळक मुद्देपंचायत समिती सभापती मेघना पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाली सभा अधिकारी उपस्थितीवरून आजची सभा जोरदार गाजली़२३ साकवांना मंजुरी असतानाही निविदा काढलेल्या नसल्याचे निदर्शनास

रत्नागिरी  ,दि. १० :  पंचायत समिती सभेसाठी प्रत्येक खातेप्रमुखाने हजर राहणे आवश्यक आहे. आपण येथे गोट्या खेळायला येतो का, अशा तीव्र शब्दात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती सुनील नावले यांनी भरसभेत खडे बोल सुनावले़. गुरुवारी झालेल्या सभेला पहिल्यांदाच उपस्थित राहिलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांचा खोटेपणा यावेळी उघड झाला.


पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आजची सभा जोरदार गाजली़. पंचायत समितीच्या एकाही सभेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहात नसत. आजच्या सभेत या विभागाचे उपअभियंता एम़ आऱ सावर्डेकर हे उपस्थित होते. 

मागील सभेत भाट्ये, कोळंबे, निरुळ आणि पावस विभागातील रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ती तत्काळ तोडून टाकावीत, अशी मागणी करण्यात आली होती़.

त्यानंतर महिना उलटला तरीही रस्त्याकडेची झाडेझुडपे तोडण्यात आलेली नाहीत़ त्याबाबत उपसभापती नावलेंसह इतर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत उपअभियंता सावर्डेकर यांना विचारणा केली. त्यावर सावर्डेकर यांनी या रस्त्यांच्या कडेची साफसफाई करण्यात आल्याचे सांगताच सदस्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले़


ग्रामीण भागातील नादुरुस्त साकव, रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न उपसभापतींसह सदस्य शंकर सोनवडकर, उत्तम सावंत यांनी उपस्थित केला़ निधी येऊनही तो खर्च होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़ तालुक्यात २३ साकवांना मंजुरी मिळालेली असतानाही त्यांच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत, हे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.


सदस्या साक्षी रावणंग यांनी तालुका शिक्षण विभागाचे कार्यालय नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बामणे यांनी दुसरीकडे नेण्याची सूचना दिल्याबाबत विचारणा केली़ त्यावर गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांनी सध्याचे कार्यालय हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निवासस्थान असल्याने ते तेथून हटवण्याच्या सूचना दिल्याचे स्पष्ट केले़ यावेळी सदस्यांची उपस्थिती होती.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.