कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका; चंद्रकांत पाटील यांनी कंत्राटदारांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:41 PM2019-07-15T12:41:52+5:302019-07-15T12:42:38+5:30

कोकणातील रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवणे, तसेच पावसाचा जोर पाहता अपघात टाळण्यासाठी अधिकार्‍यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे आदेश दिले.

Do not see the end of the temperament of the Konkan people; Chandrakant Patil conveyed to the contractors | कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका; चंद्रकांत पाटील यांनी कंत्राटदारांना सुनावले

कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका; चंद्रकांत पाटील यांनी कंत्राटदारांना सुनावले

Next

रत्नागिरी - मुंबई-गोवामहामार्गाच्या कामात आणखी गती आणून कामाचा दर्जा सुधारावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. कोणाच्याही चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास शासन अतिशय कडक कारवाई करेल, असे खडेबोल पाटील यांनी यावेळी कंत्राटदार व अधिकार्‍यांना सुनावले. 

गेले दोन दिवस मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रत्नागिरी व रायगड येथील रस्त्यांची आणि चिपळूण ते वडखळ या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी केली. यानंतर कंत्राटदारांच्या काही ठिकाणी अवलंबलेल्या ढिसाळ कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, महामार्ग अधिकारी वर्गाने अधिक परिणामकारक व जातीने देखरेख करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी कोकणातील रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवणे, तसेच पावसाचा जोर पाहता अपघात टाळण्यासाठी अधिकार्‍यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे आदेश दिले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात उभारण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण बोगद्याच्या कामाची देखील यावेळी मंत्री पाटील यांनी पाहणी केली. 

यावेळी महामार्गाच्या बांधकामाची कामाची गती वाढवून डिसेंबर २०१९ पर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर किमान दोन मार्गिका वाहतूक सूरू करण्यासाठी नियोजनबध्द कार्यवाही करावी, अशा सक्त सूचना कंत्राटदारांना व महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कोकणातील जनतेच्या संयमाचा अंत न पाहता, चौपदरीकरणाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले. 

कोकणवासियांनी सहकार्य करावे
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग हे सर्व कोकणवासियांचे कित्येक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात येत असून  कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास जलद आणि सुरक्षित करण्यासाठी या कामात आतापर्यंत कोकणवासियांनी संयम दर्शवून चांगले सहकार्य केले आहे, याबद्दल आम्ही आभारी आहोत. सदर महामार्ग चौपदरीकरणासाठी सर्व यंत्रणा अहोरात्र कष्ट करत असून, असेच सहकार्य यापुढे ही कोकणवासियांनी करण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले. 

तसेच, अधिकार्‍यांनी देखील जबाबदारीचे भान राखून व कोकणवासियांना विश्वासात घेऊन अतिशय संवेदनशीलपणे काम करावे, अन्  चाकरमान्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश दिले. अधिकारी, कंत्राटदार आणि कोकणवासियांच्या परस्पर सहकार्य व सामंजस्याने हा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी मला पक्की खात्री आहे असे मंत्री पाटील यांनी सांगितले. 

वडखळ बायपास पूल लवकर पूर्ण करण्याचे निर्देश
पेण-वडखळ-अलिबाग या मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते, ही समस्या दूर करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाअंतर्गत बायपास पूल उभारण्यात येत असून, यापैकी पूर्ण झालेल्या पुलाच्या एका मार्गिकेची मंत्री पाटील यांनी आज NHAI अभियंत्यासमवेत पाहणी केली. सुमारे ३.५० किमी अंतराच्या या बायपास पुलामुळे पेण-वडखळ-अलिबाग दरम्यानच्या वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार असून, कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या पुलाच्या पाहाणीनंतर दुसरी मार्गिका देखील जलदगतीने पूर्ण करुन हा पूल लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुला करा, असे निर्देश मंत्री पाटील यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले.

कशेडी घाटातील प्रवास होणार जलद व सुरक्षित 
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या घाटातील धोकादायक वळणांमुळे अनेक जीवघेण्या अपघाताच्या घटना घडतात. या दुर्घटना टाळण्यासाठी आणि चाकरमान्यांचा प्रवास कमी वेळात, सुखकर व सुरक्षित करण्यासाठी १.८० आणि १.९० किमीचे दोन स्वतंत्र बोगदे बनविण्याचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. 

Web Title: Do not see the end of the temperament of the Konkan people; Chandrakant Patil conveyed to the contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.