ठळक मुद्देचिपळूण वाहतूक पोलिसांनी कारवाई करूनही दुचाकीस्वारांचे दुर्लक्षदुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांवरही कारवाईचा बडगा

चिपळूण ,दि. ०७ :  गेले काही दिवस चिपळूण शहरात धूमस्टाईल दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातला असून, हे दुचाकीस्वार विविध अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वाहतूक पोलिसांनी सातत्याने अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करुनही हे दुचाकीस्वार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेरीस वाहतूक शाखेने अशा दुचाकीस्वारांवर धडक कारवाई सुरु केली आहे. अनेक दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.


मुंबई - गोवा महामार्ग व चिपळूण - कराड मार्गावर सध्या महाविद्यालयीन तरुण-तरुणी अतिवेगाने वाहन चालवत असल्याचे दिसून येते. शहरातील शिवाजी चौक येथे एका महिलेचे दुचाकीने दिलेल्या धडकेत निधन झाले. त्यामुळे धूमस्टाईल दुचाकीस्वारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. वाहतूक शाखेचे पोलीस सातत्याने शहरातील नाक्यानाक्यावर कारवाई करताना दिसतात. परंतु, अनेक तरुण-तरुणी या कारवाईकडे दुर्लक्ष करुन वाहने वेगाने चालवत असतात. त्यामुळे किरकोळ अपघातही झाले आहेत. यामुळे काहीवेळा वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो.

चिपळूण वाहतूक पोलिसांकडे याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई सुरु केली. शहरातील युनायटेड स्कूलजवळ महाविद्यालयात जाणारे धूमस्टाईल विद्यार्थी व बाजारपेठेत जाणाऱ्या अन्य काही धूमस्टाईल स्वारांसह चारचाकी वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे हवालदार शांताराम साप्ते, सुनील साळुंखे, अविनाश विचारे, प्रदीप भंडारी, सुभाष भुवड, शांताराम झोरे, सुमेधा पांचाळ यांनी ही कारवाई केली.