आंबेनळी बस दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्याच -: तिथीनुसार एक वर्ष पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:59 PM2019-07-17T23:59:11+5:302019-07-18T00:00:58+5:30

बस दरीत कोसळून ३० कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना २८ जुलै रोजी घडली होती. या मृत्यूने कोकण कृषी विद्यापीठाने ३० कर्मचारी गमावले होते तर ३० कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

All-weather bus accident memories today | आंबेनळी बस दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्याच -: तिथीनुसार एक वर्ष पूर्ण

आंबेनळी बस दुर्घटनेच्या आठवणी आजही ताज्याच -: तिथीनुसार एक वर्ष पूर्ण

Next
ठळक मुद्दे३० कुटुंबियांनी वर्षश्राद्धनिमित्त वाहिली श्रद्धांजली, वर्षश्राध्दाला अनेकांना अश्रू झाले अनावर

शिवाजी गोरे ।
दापोली : आंबेनळी बस अपघात दुर्घटनेला बुधवारी तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले आणि मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या आठवणी ताज्या झाल्या. यावेळी अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे ३१ कर्मचारी अभ्यास दौºयासाठी जात असताना आंबेनळी घाटात त्यांची बस दरीत कोसळून ३० कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना २८ जुलै रोजी घडली होती. या मृत्यूने कोकण कृषी विद्यापीठाने ३० कर्मचारी गमावले होते तर ३० कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या जाण्याने ३० कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे.

बुधवार, १७ जुलै रोजी ३० कुटुंबियांच्या नातेवाईकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. वर्षश्राद्ध करताना डोंगराएवढे दु:ख व जुन्या आठवणी ताज्या झाल्या. प्रत्येक कुटुंबात मृतांच्या आठवणी होत्या. नातेवाईक तर एक वर्ष होऊनही या दुर्दैवी दुर्घटनेतून बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या चेहºयावर सुखाचा लवलेश सुद्धा दिसला नाही. डोंगराएवढे दु:ख घेऊन दु:खी अंत:करणाने यावेळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला खरा. परंतु, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी अजून या कुटुंबांना न्यायाची प्रतीक्षा आहे. दु:ख सहन करताना, त्यांच्या मनात चीड व असंतोष आहे. हा अपघात नसून घातपात आहे, असा निष्कर्ष प्रत्येक नातेवाईकाने काढला आहे. त्यामुळे त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे. खरा गुन्हेगार पुढे येण्याची गरज ते बोलून दाखवत आहेत.

आंबेनळी बस दुर्घटनेपासून आजपर्यंत मृत कर्मचाºयांचे नातेवाईक एक-एक दिवस त्यांच्या आठवणींना उजाळा देत जगत आहेत. आंबेनळी घाटातील बस अपघातात कोणी आपले वडील, कोणी पती तर कोणी आपला मुलगा गमावला आहे. मृत कर्मचारी हे सगळे ३० ते ४५ दरम्यानचे होते. कुटुंबातील कर्ती कमावती व्यक्तीच निघून गेल्याने सगळे कुटुंबच पोरके झाले आहे. या कुटुंबांना आधार देण्याची गरज आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाने मृत कर्मचाºयांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर अजूनही घेतलेले नाही. पोलिसांकडून त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या कुटुंबांच्या पदरात वर्षभरात वेदनेशिवाय काहीही पडलेले नाही.

कोकण कृषी विद्यापीठ कर्मचारी अपघाताच्या दुर्घटनेला एक वर्ष होऊनसुद्धा मृतांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार? या आंबेनळी बस अपघात दुर्घटनेत प्रकाश सावंतदेसाई दोषी असतील तर त्यांना शिक्षा होणार की नाही, असे अनेक प्रश्न वर्षभरानंतरही अनुत्तरीत आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून, यातून काय निष्कर्ष निघाला याचीही कल्पना या कुटुंबियांना नाही. त्यामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांना दोन ते तीनवेळा भेटून कैफियत मांडूनसुद्धा आम्हाला न्याय मिळत नसेल तर दाद कोणाकडे मागायची, असा सवाल मृतांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे.

प्रकाश सावंतदेसाई खरा गुन्हेगार आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी. पोलादपूर पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने केला नाही. महाड कोर्टात तपास थांबवण्यासंदर्भात व तपास पूर्ण झाल्याचे लेखी दिले आहे. ही बस प्रशांत भांबीड चालवत होता, असा खोटा दावा करण्यात आला आहे. प्रकाश सावंतदेसाई यांनीच ही बस दरीत सोडून दिली असावी. त्याची नार्को टेस्ट करावी. तपास थांबवू नये.
- हरिश्चंद्र कदम
 


२८ जुलै २०१८ रोजी आंबेनळी बस अपघातात ३० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातातून प्रकाश सावंतदेसाई एकमेव वाचले आहेत. त्यामुळे सावंतदेसाईच बस चालवत असावेत, असा निष्कर्ष नातेवाईक व्यक्त करत आहेत. पोलीस प्रशासन व सरकार सावंतदेसार्इंना वाचवत आहे. प्रकाश सावंतदेसाई निर्दोष असतील तर त्यांची नार्को टेस्ट का केली जात नाही.
- पी. एन. चौगुले, हर्णै

Web Title: All-weather bus accident memories today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.