रत्नागिरीत ५३ शाळा गुरुजींविनाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 03:38 AM2018-08-12T03:38:06+5:302018-08-12T03:38:26+5:30

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे गुरुजींना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

 53 schools without Teacher | रत्नागिरीत ५३ शाळा गुरुजींविनाच

रत्नागिरीत ५३ शाळा गुरुजींविनाच

Next

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे गुरुजींना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ही बाब जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही डोकेदुखी ठरत आहे. त्यातच काही शिक्षकांची जिल्हाबदली तर काही शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता ५३ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २,६८८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २,५२४, तर उर्दू माध्यमाच्या १६४ शाळांचा समावेश आहे़ या शाळांमध्ये एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी अध्यापनाचे धडे गिरवत आहेत़ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येत असतानाही खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ ही चिंतेची बाब आहे.
जिल्हा परिषदेच्या ७०० प्राथमिक शाळांची स्थिती सध्या फार बिकट असून, त्या कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १ ते ५ पटसंख्या असलेल्या २६७ शाळा, तर ५ ते १० पटसंख्या असलेल्या ४३३ शाळांचा समावेश आहे. ही पटसंख्या प्रत्येक शैक्षणिक वर्षात घटत चालल्याने शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़
जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही अन्य शाळांमधील शिक्षकांची नेमणूक या ठिकाणी करावी लागत आहे़ या वेळी एका शाळेतून दुसºया शाळेत जाण्यास शिक्षकही सहजासहजी तयार होत नाहीत़ मात्र, तरीही शून्य शिक्षकी शाळांमध्ये एखाद्या शिक्षकाला काही दिवस नियुक्ती देण्यात येते़ त्यामुळे शिक्षकांनाही या शाळेतून त्या शाळेत कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे़

वादामुळे बदल्या रखडल्या

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शून्य शिक्षकी शाळेबाबत शासनाला माहिती पाठवली आहे. सुगम, दुर्गम शाळांच्या वादामध्ये शिक्षकांच्या बदल्या रखडल्याने शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला आहे. शिक्षकांच्या बदल्यांनंतर शिक्षण विभागाकडून शून्य शिक्षकी शाळांमध्ये कायम शिक्षक देण्यात येणार होते. मात्र, बदल्यांची समस्या अद्याप न सुटल्याने शाळांवर शिक्षक मिळणे कठीण झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

Web Title:  53 schools without Teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.