शहापूर-धेरंड कांदळवन क्षेत्रात चुकीचे भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:27 AM2018-01-17T01:27:43+5:302018-01-17T01:27:43+5:30

शहापूर-धेरंड परिसरात टाटा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याकरिता एमआयडीसीकरिता महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या भूमिसंपादनाच्या चुकीच्या प्रक्रियेमुळे

Wrong land acquisition in the Shahpur-Dhirend Kandalvan area | शहापूर-धेरंड कांदळवन क्षेत्रात चुकीचे भूसंपादन

शहापूर-धेरंड कांदळवन क्षेत्रात चुकीचे भूसंपादन

googlenewsNext

जयंत धुळप
अलिबाग : शहापूर-धेरंड परिसरात टाटा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्याकरिता एमआयडीसीकरिता महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या भूमिसंपादनाच्या चुकीच्या प्रक्रियेमुळे, अतिसंरक्षित म्हणून केंद्र सरकारकडून घोषित कांदळवने (मॅन्ग्रोज) संपादित क्षेत्रात आले. या चुकीच्या ठरलेल्या भूमिसंपादनाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तत्कालीन कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगड जिल्हा प्रशासनास दिले होते. त्यास अनुसरून मंगळवारी अलिबाग उपविभागीय महसूल (प्रांत) अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या संपूर्ण क्षेत्राची पाहणी केली. संपादित क्षेत्र आणि संपादित क्षेत्राच्या शेजारी कंदळवने नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
टाटा पॉवर कंपनीच्या औष्णिक वीज प्रकल्पास जागा उपलब्ध करून देण्याकरिता एमआयडीसीद्वारे शहापूर-धेरंड पसिरातील भूमी संपादनाकरिता संयुक्त मोजणी ८ जून २०१० रोजी करण्यात आली होती; परंतु ही मोजणी करताना अलिबाग तालुका भूमी अभिलेख निरीक्षकांनी त्या वेळी वन अधिकारी वा वनखात्याच्या प्रतिनिधीस निमंत्रित केले नव्हते. परिणामी, या संपादन क्षेत्रातील कांदळवनांची नोंद होऊ शकली नाही. परिणामी, कांदळवने प्रत्यक्षात अस्तित्वात असूनदेखील ५० मीटरची ‘ना विकास क्षेत्र हद्द’ कायम होऊ शकली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवनाच्या ५० मीटर परीघ क्षेत्रात कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नाही, ही बाब तत्कालीन विभागीय आयुक्त देशमुख यांच्या समवेत ३ मे २०१७ रोजी कोकणभवन येथे झालेल्या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाने लक्षात आणून दिली.
संपादन क्षेत्रातील कांदळवने ही बाब तत्कालीन विभागीय आयुक्त देशमुख यांनी अत्यंत गांभीर्याने विचारात घेऊन, या संपादन क्षेत्राची पाहणी अलिबाग उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख विभाग, एमआयडीसी आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे करून शासनास अहवाल द्यावा, असे आदेश दिले होते. त्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासही तब्बल सात महिन्यांचा कालावधी लागला आणि अखेर मंगळवार, १६ जानेवारी या चरीच्या ऐतिहासिक शेतकरी संपाचे प्रणेते नारायण नागू पाटील यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच संपादन क्षेत्राची पाहणी धेरंड-शहापूर गावांच्या हद्दीत करण्यात आली.
अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्या समवेत एमआयडीसीचे अभियंता एस. एस. खाडे, भूमिअभिलेख खात्याचे ए. एस. वैद्य, वनविभागाचे अधिकारी आर. के. पाटील, शहापूर सजाचे तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी यांचा या संयुक्त पाहणी पथकात समावेश होता. या वेळी शहापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र पाटील, माजी सरपंच सुधीर थळे श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी राजन भगत, नंदन पाटील व शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी शहापूर ग्रामपंचायत कार्यालयात अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी उपस्थितांना पाहणी संदर्भात माहिती दिली. संपादन क्षेत्रात कांदळवन असल्याचे सर्व अधिकाºयांनी मान्य केल्याची माहिती राजन भगत यांनी दिली.

Web Title: Wrong land acquisition in the Shahpur-Dhirend Kandalvan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.