धबधबे बनले मृत्यूचा सापळा, निष्काळजीपणामुळे अपघातांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:42 AM2018-07-03T03:42:13+5:302018-07-03T03:53:12+5:30

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांकडून पावसाळी पर्यटनासाठी पनवेलमधील गाढी नदी परिसराला प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये नदीमध्ये वाहून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

Waterfall became the death trap, and increased accidents due to negligence | धबधबे बनले मृत्यूचा सापळा, निष्काळजीपणामुळे अपघातांमध्ये वाढ

धबधबे बनले मृत्यूचा सापळा, निष्काळजीपणामुळे अपघातांमध्ये वाढ

Next

- मयूर तांबडे

पनवेल : मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांकडून पावसाळी पर्यटनासाठी पनवेलमधील गाढी नदी परिसराला प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये नदीमध्ये वाहून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. २०११ पासून तब्बल १७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पर्यटनाच्या नावाखाली मद्यपींचा गोंधळ वाढू लागला असल्यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
पावसाळा सुरू झाला की पनवेल तालुक्यातील नद्या व धबधबे पर्यटकांना खुणावू लागतात. गाढी नदीच्या परिसरामध्ये शनिवार व रविवारी हजारो पर्यटक गर्दी करत असतात. गाढेश्वर धरण, गाढी नदी, मोरबे धरण, नदी परिसराला प्रथम पसंती दिली जाते. परंतु या परिसरातील पर्यटनस्थळाकडे रायगड जिल्हा प्रशासन व वनविभागाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. धबधबे व नदीपात्रामध्ये नागरिक गर्दी करत असलेल्या ठिकाणी कोणत्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पर्यटक मनमानीपणे धबधब्यामध्ये व नदीमध्ये उतरतात व अपघात होवून अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. पहिल्याच पावसामध्ये गाढेश्वर धरण हाऊसफुल्ल होते. पाऊस वाढला की नदीचा प्रवाह अचानक वाढतो. पर्यटकांना पाण्याच्या वेगाचा अंदाज येत नाही व पाण्यात उतरलेले अनेकजण वाहून जातात. प्रत्येक वर्षी तीन ते चार जणांना जीव गमवावा लागत आहे. पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून २०११ पासून तब्बल १६ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बहुतांश अपघात सुरक्षेविषयीच्या निष्काळजीपणामुळे झाले असल्याचे उघड झाले आहे.
पावसाळी पर्यटनासाठी पनवेल परिसरामध्ये कौटुंबिक सहलीचे प्रमाण जास्त आहे. परंतु काही वर्षांमध्ये मद्यपी तरुणांचा वावर या परिसरामध्ये वाढला आहे. नदी व धबधब्याच्या परिसरामध्ये उघड्यावर मद्यपान करून गोंधळ घालत असल्याने कुटुंबीयांसह येणाऱ्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली होती. यामुळे पोलिसांनी परिसरामध्ये धोकादायक ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असला तरी पोलिसांची नजर चुकवून नदी व धबधबा परिसराकडे प्रत्येक रविवारी हजारो पर्यटक जात आहेत. अपघात होवून कोणाचा मृत्यू होवू नये यासाठी पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही केले जात आहे. पर्यटकांना सूचना देण्यासाठीचे फलक विविध ठिकाणी लावले आहेत.

गाढेश्वरसह नेरे परिसरामध्ये लावलेल्या सूचना
माथेरान परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे नदीमधील पाण्याचा प्रवाह कमी जास्त होत असून बुडून मृत्यू होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे पर्यटकांनी योग्य काळजी घ्यावी.
गाढेश्वर धरणातून पनवेल शहरास पाणीपुरवठा होत असतो यामुळे धरणात खाद्यपदार्थ व इतर वस्तू टाकून पात्र दूषित करू नये
लहान मुले व स्त्रियांसह ज्यांना पोहता येत नाही त्यांनी नदीपात्रामध्ये उतरू नये
अमली पदार्थ, दारू व तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई असून मद्यपान किंवा मादक पदार्थांचे सेवन करताना कोणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.
हा परिसर डोंगराळ असून रस्ते अरुंद आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका जाण्यास खुला असणे आवश्यक असल्यामुळे रोडच्या कडेला वाहने उभी करू नयेत.
वर्षा सहलीसाठी येणाºया पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, नशा करून वाहन चालवू नये
गाढेश्वर धरण, मोरबे धरण, बढी कुंडी धरण परिसर कलम १४४ प्रमाणे पावसाळी पर्यटनासाठी प्रतिबंधित करण्यात आला असून या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यात येईल

पनवेल परिसरामध्ये बुडून मृत्यू झालेल्यांचा तपशील
दिनांक नाव ठिकाण
१३ जून २०११ श्याम वानखेडे (अमरावती) बढीकुंडी धबधबा
१३ जून २०११ रणजीत गावकर - चेंबूर गाढी नदी
४ जुलै २०११ अनोळखी व्यक्ती -
२५ जुलै २०१२ किरण कानू जाडे - ठाणा नाका बढीकुंडी धबधबा
२७ जून २०१३ खगेंद्र सिंग बुढाल- नवी मुंबई गाढी नदी
१४ जुलै २०१३ विश्वास घरत - उरण गाढी नदी
२८ जुलै २०१३ सुलक्षण सोनावणे - नेरूळ शांतीवन नेरे
१९ सप्टेंबर २०१३ दत्तात्रय पाठक - विहिघर गाढी नदी, कोप्रोली
१९ सप्टेंबर २०१४ अनोळखी व्यक्ती कासाडी नदी
३१ जुलै २०१६ राहुल डोंबले- कामोठे धोदाणी धबधबा
१६ सप्टेंबर २०१६ विजय सुदाम गायकवाड- नेरे हलडोली, गाढी नदी
२४ सप्टेंबर २०१६ प्रेमाबाई चांगा पाटील गाढी नदी
३ डिसेंबर २०१६ गणेश बारकू देशेकर - चिंध्रण कासाडी नदी
२६ जून २०१६ दीपक मोहन खडूू - खार, मुंबई गाढी नदी
२६ जून २०१६ किशोर मोतीराम चामुट गाढी नदी

नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी व महिलांच्या छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी या परिसरात मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी देखील या परिसरात येणे टाळावे.
- अशोक राजपूत,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
तालुका पोलीस ठाणे

Web Title: Waterfall became the death trap, and increased accidents due to negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड