पनवेलमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:17 PM2018-08-20T23:17:58+5:302018-08-20T23:20:07+5:30

रक्तचाचणी अहवाल देताना मार्गदर्शक सूचनांना हरताळ; महापालिकेच्या नोंदणी आवाहनाकडे दुर्लक्ष

Violation of rules governing the pathology lab in Panvel | पनवेलमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन

पनवेलमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन

googlenewsNext

- वैभव गायकर 

पनवेल : राज्यभरात विविध ठिकाणी बोगस पॅथॉलॉजी लॅबद्वारे रक्त चाचण्यांच्या माध्यमातून रुग्णांची लूट केली जाते. वेळोवेळी हे उघड झाले आहे. आता हे लोण पनवेल महापालिका क्षेत्रातही फोफावू लागले आहे. प्रशिक्षित मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्ट नसताना देखील आरोग्य चाचणी अहवाल दिले जातात. सर्रासपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे पुरावे ‘लोकमत’च्या हाती लागले आहेत.
पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून रक्तचाचणी करीत असताना सर्वप्रथम रक्ताचे नमुने घेणाऱ्यांनी पॅथॉलॉजिस्टचे कपडे (ड्रेस कोड) परिधान करणे गरजेचे आहे. मात्र हा नियम तर पायदळी तुडवला जात आहे. तसेच रक्ताचे नमुने घेणारी व्यक्ती कोण आहे ? याची काहीच माहिती संबंधित पॅथॉलॉजीमध्ये उपलब्ध नसते. महापालिका क्षेत्रात बोगस पॅथॉलॉजी असल्याचा गंभीर आरोप शेकापच्या नगरसेविका कमल कदम यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला होता. रायगड जिल्हा शल्य चिकित्सक अजित गवळी यांनी देखील अशाप्रकारे डीएमएलटीधारकाला अहवाल देण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल महापालिकेने मे महिन्यात शहरातील पॅथॉलॉजी चालकांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. तशा आशयाच्या नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या नोटीसमध्ये कोणत्याही अहवालावर पॅथॉलॉजिस्टने स्वत: स्वाक्षरी केलेली असावी, इलेक्ट्रिकल स्वाक्षरी किंवा शिक्का नसावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परंतु अनेक पॅथॉलॉजिस्ट इलेक्ट्रिकल स्वाक्षरीचाच वापर करीत असल्याचे उघड झाले आहे. मात्र पॅरामेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार रक्तचाचणी अहवाल देण्याचा आम्हाला अधिकार असल्याचे डीएमएलटी तत्सम पदवीधर असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद यादव यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पालिकेने केलेल्या आवाहनाला पालिका क्षेत्रातील २२ पॅथॉलॉजीने प्रतिसाद दिला आहे, परंतु डीएमएलटी तत्सम पदवीधर असोसिएशनने महापालिकेला पत्र लिहून शासनाच्या डीएमएलडीधारकासंदर्भात धोरणांची माहिती पत्राद्वारे दिली आहे. या पत्रात पनवेल महानगर पालिकेने सुरू केलेली नोंदणी प्रक्रि या थांबविण्याची विनंती केली आहे. जोपर्यंत महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेची नोंदणी होत नाही तोपर्यंत ही नोंदणी न करण्याची विनंती केली आहे.

लातूर पॅटर्न पनवेलमध्ये राबविणार का?
नियमांचे उल्लंघन करणाºया पॅथॉलॉजी लॅबवर सर्वप्रथम लातूर शहरात कारवाई करण्यात आली होती. लातूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनीच ही मोहीम राबविली होती.
योगायोगाने गणेश देशमुख यांची बदली पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी झाल्याने पनवेलमध्ये अशाप्रकारची मोहीम राबविली जाणार आहे का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पनवेल महानगर पालिकेच्या महासभेत शेकाप नगरसेविका कमल कदम यांनी पालिका क्षेत्रातील बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाईची मागणी केली होती. पालिका क्षेत्रातील पॅथॉलॉजी लॅबच्या संख्येची माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी आयुक्तांना केले होते.

‘लोकमत’चे स्टिंग
पॅथॉलॉजी लॅबमधून नियमांचे कशाप्रकारे उल्लंघन होते याचा पुरावा गोळा करण्यासाठी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने १३ आॅगस्ट रोजी दुपारी २.१५ वाजता खांदा कॉलनीतील पूजा क्लिनिकल लॅबोरॅटरीजमध्ये जाऊन शुगर चाचणी करण्यास सांगितले. त्यानुसार तेथील कर्मचाºयाने २.२४ मिनिटांनी या प्रतिनिधीच्या रक्ताचे नमुने घेऊन तासाभरानंतर अहवाल नेण्यास सांगितले.
एक तासानंतर या प्रतिनिधीने आपल्या रक्त चाचणीचा अहवालही घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीएमएलटीधारकाला अशाप्रकारचा अहवाल देता येत नाही. ही वस्तुस्थिती असतानाही पूजा लॅबोरॅटेरीजमधील डीएमएलटीधारकाने अहवाल दिला. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने उघडकीस आणलेले हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी पनवेल परिसरात अशा अनेक पॅथॉलॉजी लॅबमधून नियमांची पायमल्ली सुरू असल्याचे दिसून आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ एमडी पदवीधारकांनाच रक्त चाचण्यांच्या अहवालावर सही करण्याचे अधिकार आहेत. डीएमएलटीधारकांना अशाप्रकारचे अधिकार नाहीत.
- अजित गवळी, रायगड जिल्हा शल्य चिकित्सक, महाराष्ट्र शासन

महिनाभरापूर्वी आयुक्तांनी काढली नोटीस
पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यापूर्वीच पालिका क्षेत्रातील पॅथॉलाजी लॅबधारकांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया लॅबवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Violation of rules governing the pathology lab in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.