उमटे धरणामुळे गावांना धोका; ग्रामस्थांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:22 AM2018-06-04T03:22:08+5:302018-06-04T03:22:08+5:30

तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाऱ्या उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढल्यास धरणाच्या भिंतीला भगदाड पडून मोठ्या आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Villages risk due to common damages; Neglect in the administration of the villagers | उमटे धरणामुळे गावांना धोका; ग्रामस्थांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उमटे धरणामुळे गावांना धोका; ग्रामस्थांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाऱ्या उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढल्यास धरणाच्या भिंतीला भगदाड पडून मोठ्या आपत्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांकडून याबाबत तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याने धरणाची परिस्थिती जैसे थे आहे. हजारो नागरिकांचा जीव धोक्यात घालणाºया प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने उमटे धरणाबाबत उपाययोजना करून हजारो नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरामध्ये १९७८ साली उमटे धरणाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर १९९५ साली हे धरण प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आले होते. धरण हस्तांतरित करण्यात आल्याने धरणाची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. उमटे धरणाची उंची ५६.४० मीटर असल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. धरणाचा निव्वळ पाणीसाठा हा ८१ दशलक्ष घनफूट आहे. याच धरणातून सुमारे ५२ हजार लोकसंख्येला पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणामुळे येथील परिसर चांगलाच सुजलाम सुफलाम झाला आहे. कडक उन्हाळ््यात सुध्दा या धरणातील पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतो.
रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गावे पाणीटंचाईच्या गर्तेत असताना, उमटे धरण परिसरातील गावांना नळपाणी योजनांमधून चोवीस तास पाणीपुरवठा सुरू असतो. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत नाही. गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने, तसेच धरणातील गाळ न काढल्यामुळे नागरिकांना याच धरणातील अशुध्द पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे.
धरण नागरिकांच्या सुविधेसाठी बांधले असले तरी, आता नागरिकांनाच या धरणाची भीती वाटत आहे.
उमटे धरणाला तब्बल ४० वर्षे झाली आहेत. धरणाची योग्य तशी देखभाल दुरुस्ती न केल्याने धरणाची दुरवस्था होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येते. धरणाच्या आतील बाजूकडील दगडी भिंतीचे दगड मोठ्या संख्येने निखळले आहेत. त्यामुळे तेथील भिंतीला भगदाड पडल्याचे दिसून येते. अशीच स्थिती धरणाच्या भिंतीच्या ठरावीक अंतरावर दिसून येते. काही ठिकाणी धरणाच्या पायाजवळील दगड मोठ्या प्रमाणात खचलेले दिसून येतात.

अतिवृष्टीमुळे धरणाला धोका
तालुक्यात दरवर्षी चांगला पाऊस पडतो. त्यामुळे धरणात पाणी मोठ्या संख्येने साठते, परंतु कित्येक वर्षे धरणातील गाळ काढला नसल्यामुळे पाणीसाठा कमी झाला आहे.
धरणाच्या भिंतींना मोठमोठी भगदाडे पडलेली आहेत, तर काही ठिकाणी धरणाच्या पायाखालील दगड खचलेले आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचा जोर त्या भिंतीवर येऊन भिंतीला खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसे झाले तर, धरणाची भिंत फुटून गावात जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात माहिती घेण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला उमटे धरणाची दुरवस्था व लवकरात लवकर डागडुजी करण्याबाबत वेळोवेळी कल्पना दिलेली आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. तक्रारीनंतर उपअभियंत्यांसह अन्य अधिकारी येऊन फक्त पाहणी करून जातात. लवकरच सुधारणा करण्यात येईल, असे मोघम उत्तर देतात.
- अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर, ग्रामपंचायत सदस्य, बोरघर

धरणाची अवस्था अतिशय खराब आहे. यंदाच्या पावसाळ््यात धरणामुळे परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून भविष्यात उद्भवणारी आपत्ती रोखावी.
- अजय गायकर, ग्रामस्थ

Web Title: Villages risk due to common damages; Neglect in the administration of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड