Uri - The Surgical Strike: The Historical War of the Indian Army | उरी - द सर्जिकल स्ट्राइक : भारतीय सैन्याची ऐतिहासिक शौर्यगाथा
उरी - द सर्जिकल स्ट्राइक : भारतीय सैन्याची ऐतिहासिक शौर्यगाथा

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने या हल्ल्याचे चोख उत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा सिनेमा आहे. हा सिनेमा पाहताना तुम्हाला देशभक्तीचा कुठेही अतिरेक झालेला जाणवणार नाही. हा सिनेमा पाहताना आपण भारतीय असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल.

‘‘आज तक हमारी सहनशीलता को हमारी कमजोरी समझा जाता था, मगर अब नहीं... ये नया हिन्दुस्तान है. ये हिन्दुस्तान घर में घुसेगा भी.. और मारेगा भी..’’ अशा प्रकारच्या दमदार डायलॉगने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धाला सुरुवात होते. मेजर विहान शेरगिल (विकी कौशल) आणि कॅप्टन करण कश्यप यांच्या मणिपूरमधील कॅम्पवर दहशतवादी हल्ला करतात. त्याला ते चोख उत्तरदेखील देतात. विहानची आई (स्वरूप संपत) अल्झायमरने ग्रस्त असते. त्यामुळे तो बॉर्डरवरून दिल्लीत पोस्टिंग घेतो. त्याच दरम्यान उरीमध्ये दहशतवादी भ्याड हल्ला करतात. या हल्ल्यात विहानचा जिवलग मित्र आणि बहिणीचा पती करण कश्यप शहीद होतो. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत ‘सर्जिकल स्ट्राइक’ करायचे ठरवतो. या मोहिमेची आखणी आणि नेतृत्व विहान करतो. ही मोहीम तो कशा प्रकारे यशस्वी करतो हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.
दिग्दर्शक आदित्य धारने सर्जिकल स्ट्राइकच्या १० दिवसांतील चित्तथरारक घटना मोठ्या पडद्यावर उत्तमरीत्या रेखाटल्या असून, हे प्रसंग पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सिनेमात विकी कौशलने आर्मी आॅफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतल्याचे सिनेमा पाहताना जाणवते. तर यामी गौतमच्या वाटेला
छोटी भूमिका आली आहे; तिने मात्र या भूमिकेला योग्य न्याय दिला
आहे.
परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या भूमिका छोट्या - छोट्या असल्या तरी त्यांनी त्या सक्षमपणे साकारल्या आहेत. आतापर्यंत आपण अनेकवेळा सर्जिकल स्ट्राइकबाबत वाचलेय किंवा ऐकलेय; मात्र ही संपूर्ण घटना रुपेरी पडद्यावर पाहणे रोमांचकारी ठरते. हा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी हा सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच पाहावा लागेल.

हिंदी चित्रपट
गीतांजली आंब्रे


Web Title: Uri - The Surgical Strike: The Historical War of the Indian Army
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.