उमटे धरणाच्या भिंतीची पडझड, प्रवाह वाढल्यास ग्रामस्थांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 04:20 AM2018-07-14T04:20:08+5:302018-07-14T04:20:19+5:30

पावसाने काही कालावधीसाठी विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी रायगड जिल्ह्याला पुन्हा झोडपून काढले आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणही बऱ्यापैकी भरले आहे; परंतु धरणाची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने धरणात पूर्ण पाणीसाठा होईल की नाही, याबाबत ग्रामस्थ साशंक आहेत.

Umate dam wall collapse, Fear in village | उमटे धरणाच्या भिंतीची पडझड, प्रवाह वाढल्यास ग्रामस्थांचा जीव टांगणीला

उमटे धरणाच्या भिंतीची पडझड, प्रवाह वाढल्यास ग्रामस्थांचा जीव टांगणीला

googlenewsNext

- आविष्कार देसाई
अलिबाग : पावसाने काही कालावधीसाठी विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी रायगड जिल्ह्याला पुन्हा झोडपून काढले आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणही बऱ्यापैकी भरले आहे; परंतु धरणाची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने धरणात पूर्ण पाणीसाठा होईल की नाही, याबाबत ग्रामस्थ साशंक आहेत.
रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने धरणाची डागडुजी केल्याचा दावा केला असला, तरी प्रशासनाची मलमपट्टी ग्रामस्थांसाठी जीवघेणी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणाच्या भिंतीची पडझड झाल्याने ग्रामस्थांनी या धरण परिसरात जाणेच टाळले आहे. प्रशासनाने धरणाची डागडुजी केल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. धरण फुटण्याच्या उंबरठ्यावर असताना एकमेकांना दोष देण्यातच धन्यता मानत आहेत.
तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाºया
उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाळ्यात प्रवाह प्रचंड वाढत असल्याने धरणाच्या भिंतीला भगदाड पडून मोठ्या आपत्तीला सामोरे जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ जून रोजीही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेत धरणाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात केली होती. धरणाच्या भिंतीतील दगडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने भगदाड पडले होते. जिल्हा परिषदेने यातील काही भिंतीची दुरुस्ती केली; परंतु केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

उमटे धरण प्रचंड मोठे आहे, त्यामध्ये ८७ द.ल.घ.मी. पाणीसाठा राहू शकतो. पावसाचा जोर वाढल्याने धरण लवकरच भरेल, असे ग्रामस्थ मनीष पुनकर यांनी सांगितले. धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यास धरणाच्या सुरक्षा भिंती ढासळण्याची शक्यता आहे. धरण फुटण्याच्या भीतीपोटी ग्रामस्थांनी धरण परिसराकडे जाण्याचे टाळले आहे, असेही पुनकर यांनी सांगितले.

प्रशासनाने केलेली मलमपट्टी ही ग्रामस्थांची दिशाभूल करणारी आहे. धरण फुटून उद्भवणाºया समस्येला सर्वस्वी जिल्हा परिषद जबाबदार राहणार असल्याचे सिद्धेश भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पावसाचा जोर वाढला की गावातील तरुण एकत्र येऊन धरणाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जातो. कमी-जास्त काही झालेच, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस यांची मदत घेण्याची सूचना देण्यात आल्याचेही भगत यांनी सांगितले.

उमटे धरणाची उंची ५६.४० मीटर असल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता ८७ द.श.ल.मी. आहे. या धरणाचा निव्वळ पाणीसाठा हा ८१ द.श.ल.मी. आहे. याच घरणातून सुमारे ५२ हजार लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. धरण नागरिकांच्या सुविधेसाठी बांधण्यात आले असले, तरी आता नागरिकांनाच या धरणाची भीती वाटत आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरामध्ये १९७८ साली उमटे धरणाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर १९९५ साली हे धरण प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आले होते. धरण हस्तांतरित करण्यात आल्याने धरणाची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे.

उमटे घरणाला तब्बल ४० वर्षे झाली आहेत. योग्य देखभाल दुरुस्ती न केल्याने, धरणाची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या आतील बाजूकडील भिंतीचे दगड मोठ्या संख्येने निखळले आहेत. त्यामुळे तेथील भिंतीला भले मोठे भगदाड पडल्याचे दिसून येते. अशीच स्थिती धरणाच्या भिंतीच्या ठरावीक अंतरावर दिसून येते. काही ठिकाणी धरणाच्या पायाजवळील दगड मोठ्या प्रमाणात खचलेले दिसून येतात.

उमटे धरणाची डागडुजी करण्याची जबाबदारी साइड इनचार्ज कुदळे आणि खैरे यांच्याकडे होती. त्यांना काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काम व्यवस्थित झाले नसल्यास त्याचा आढावा घेण्यात येईल. याबाबतचा अहवाल त्यांनी वरिष्ठांकडे सादर केलेला नाही. संबंधित ठिकाणी पाहणी करण्याचे अधिकार वरिष्ठांना आहेत, ते लवकरच पाहणी करतील.
- सुरेश इंगळे, शाखा अभियंता

‘लोकमत’ने या बाबतचे वृत्त दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यांनी उमटे धरणाची डागडुजी केली; परंतु धरणाच्या भिंतीतून सुटलेले दगड नव्याने न बसवता फक्त सिमेंट आणि रेतीचा मुलामा भगदाड पडलेल्या भिंतीवर देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाढल्यास धरणाच्या भिंतीवर ताण येऊन ती फुटू शकते. धरणाच्या डागडुजीचे काम ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या देखरेखीखाली करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने असे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. आता सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीच आहे.
-अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर, सदस्य, बोरघर

Web Title: Umate dam wall collapse, Fear in village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.