तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:03 AM2019-04-19T06:03:39+5:302019-04-19T06:03:55+5:30

अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे (रा. सावर, गौळ आळी, ता. म्हसळा, जि. रायगड) आणि सुनील पांडुरंग तटकरे (मु. पोयनार, अलाटी वाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे दोघे ११ एप्रिलपासून बेपत्ता आहेत.

Two independent candidates missing from Tatkare's name | तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता

तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता

googlenewsNext

जयंत धुळप 

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे (रा. सावर, गौळ आळी, ता. म्हसळा, जि. रायगड) आणि सुनील पांडुरंग तटकरे (मु. पोयनार, अलाटी वाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे दोघे ११ एप्रिलपासून बेपत्ता आहेत.
निवडणूक कायद्याप्रमाणे उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून त्याच्या खर्चाचा दैनंदिन हिशेब देणे बंधनकारक आहे. रायगड लोकसभा निवडणूक रिंगणातील सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या उमेदवारांनी अद्याप त्यांच्या खर्चाचा कोणताही हिशेब दिलेला नाही. तसेच ते खर्च ताळमेळ बैठकांनाही उपस्थित राहिलेले नाहीत. परिणामी, या दोन्ही उमेदवारांना रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी त्यांना नोटिसा बजावल्या.
११ एप्रिल व १६ एप्रिल या तारखांना झालेल्या खर्च ताळमेळ बैठकांना अनुपस्थित राहून व कुठलाही निवडणूकविषयक खर्च सादर न केल्याने या उमेदवारांनी निवडणूक कायद्याचा भंग केला आहे. याबाबत दोन दिवसांत त्यांनी खुलासा दिला नाही, तर निवडणूक कायद्यान्वये पुढील कडक कारवाई करण्यात येईल, असे रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नोटीशीत नमूद केले आहे.
११ एप्रिलपासून या उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाइल नंबर्सवर संपर्क साधण्याचा प्रयत्न निवडणूक यंत्रणेने केला; परंतु तो होऊ शकला नाही. त्यांच्या घरच्या पत्त्यावरही संपर्क झाला नाही. परिणामी, अखेर गुरुवारी त्या दोन्ही उमेदवारांना या नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती सूर्यवंशी
यांनी दिली.
>दोन दिवसांची मुदत अन्यथा कारवाई
दोन दिवसांत सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या दोन्ही उमेदवारांनी खर्च सादर केला नाही, तर निवडणूक कायद्यान्वये या दोन्ही उमेदवारांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते, अशीही माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणूक रिंगणातील असलेल्या १६ पैकी १४ उमेदवारांनी खर्च ताळमेळ बैठकीस उपस्थित राहून आपले खर्चलेखे सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Two independent candidates missing from Tatkare's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.