मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:12 AM2019-05-04T00:12:17+5:302019-05-04T06:22:35+5:30

पर्यटकांची गर्दी : महामार्ग रुंदीकरणाचे काम संथ गतीने ; काम वेळेत न झाल्यास वाहतूक कोंडी वाढणार

Traffic on the Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल

Next

पेण : सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाला असून दररोज लाखो वाहने मुंबई, ठाणे, कल्याणकडून कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर ये-जा करू लागली आहेत. रायगडातील लोकसभेची निवडणूक संपली असून सध्या पर्यटकांनी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीची मजा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र पेण ते वडखळ मार्गावर बायपास पूल रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. मात्र हा रस्ता तयार न झाल्यामुळे जुन्या रस्त्यावरूनच वाहने ये -जा करीत आहेत. त्यातच रामवाडी येथील उड्डाणपुलाचे काम, उचेडे येथील पुलाचे काम संथ गतीने सुरू असून सिंगल सर्व्हिस रोडवरून वाहनांची ये -जा सुरू असल्याने वडखळ ते पेण महामार्गावर दररोज वाहतूककोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.

नेहमीच्या वाहतूककोंडीत शनिवार, रविवारचा जर वार असेल तर अधिक भर पडत आहे. ज्यांना अधिकची सुट्टी मिळाली नाही ते वीकेण्डचा पर्याय म्हणून शनिवार, रविवार हे हक्काचे सुट्टीचे वार म्हणून अलिबाग, मुरुड-जंजिरा, किहीम बीच, नागाच बीच, काशिद बीच तसेच श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगर बीच, महाबळेश्वरकडे जाण्यासाठी एक दिवस निवासी किंवा त्याच दिवशी परत जावून येवून करण्यासाठी कुटुंबीयांसह स्वत:च्या गाडीने प्रवास करतात.

वडखळ -पेण महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने, जागोजागी पुलांची अर्धवट कामे, रस्ता रुंदीकरणाची अर्धवट कामे व रस्त्यातच खोदकामात माती दगड तसेच ठेवून ठिकठिकाणी वळणदार मार्ग तसेच ठेवल्याने सुट्टीनिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो वाहनांना या वाहतूककोंडीत अडकून राहावे लागत आहे. 

दररोज लागतात वाहनांच्या रांगा
पेण ते वडखळ हे ६ किमीचे अंतर असले तरी अजूनही या प्रवासाला २० ते २५ मिनिटे वेळ जात आहे. पेण रेल्वे स्टेशनपासून रामवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वे उड्डाण ब्रीजचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्याचबरोबर पुढे उचेडे येथे पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. या दोन्ही कामामुळे एकेरी सर्व्हिस मार्ग शिल्लक ठेवला आहे. या ठिकाणी दररोज वाहनांच्या रांगा लागत आहेत. पुढील महिन्यात अधिक वाहने या मार्गावरून जाणार असून हे काम पूर्ण न झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होईल.

Web Title: Traffic on the Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.