हजारो बंधारे बांधूनही पाणीटंचाई कायम,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 03:04 AM2018-01-21T03:04:35+5:302018-01-21T03:04:42+5:30

रायगड जिल्ह्यात यंदा तब्बल दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ४२ हजार ७० लोकांनी सहभाग नोंदवला. श्रमदानातून बांधलेल्या बंधाºयामुळे १२६.१८ घनमीटर वाहून जाणारे पाणी अडविण्यात यश आले.

Thousands of bunds have remained suspended due to water shortage, | हजारो बंधारे बांधूनही पाणीटंचाई कायम,

हजारो बंधारे बांधूनही पाणीटंचाई कायम,

Next

- जयंत धुळप 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात यंदा तब्बल दोन हजार ९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ४२ हजार ७० लोकांनी सहभाग नोंदवला. श्रमदानातून बांधलेल्या बंधाºयामुळे १२६.१८ घनमीटर वाहून जाणारे पाणी अडविण्यात यश आले. त्यामुळे १५ कोटी ४२ लाख ५ हजार रुपयांची बचतही झाली. इतके सर्व सुरळीत असले, तरी येत्या उन्हाळ््यात जिल्ह्याला भीषण पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने आठ कोटी ६३ लाख रुपये खर्चाचा ‘उन्हाळी पाणीटंचाई कृती आराखडा’ तयार करून रायगडच्या जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मंजुरीकरिता पाठविला आहे.
गतवर्षी २०१६-१७ च्या आराखड्यात तीव्र पाणीटंचाईग्रस्त असणारे पेण, महाड आणि पोलादपूर हे तीन तालुके यंदाच्या आराखड्यातही तीव्र टंचाईग्रस्त राहाणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकसहभागातून पेण तालुक्यात यंदा १२७ वनराई बंधारे बांधून पाणी अडविले असले, तरी या तालुक्यांत ७७ गावे आणि २१४ वाड्या, महाड तालुक्यात २१४ वनराई बंधारे बांधून पाणी अडविले, तरी या तालुक्यात ७८ गावे आणि ३१२ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यात यंदा २२६ वनराई बंधारे बांधून पाणी अडविले असले तरी या तालुक्यात ४५ गावे आणि १९४ वाड्या यंदा संभाव्य तीव्र पाणीटंचाईग्रस्त आहेत.
पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांना पारंपरिक पद्धतीनुसार टँकरने जिल्ह्यातील १२३१ गावे व वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन यंदाही करण्यात येत असून, त्यासाठी पाच कोटी ३२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर ५७९ ठिकाणी बोअरवेल्स (विंधण विहिरी) खोदण्यात येणार असून, यासाठी ३ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, बोअरवेल्स खोदण्याचे काम दरवर्षी उशिरा सुरू होत असल्याने पाऊस सुरू झाल्यामुळे या विहिरींचे खादकाम अनेकदा अपूर्णच राहिल्याचा अनुभव आहे.
भूजलपातळी खालावण्यास बोअरवेल्स (विंधण विहिरी) हे एक अत्यंत गंभीर कारण आहे. बोअरवेल्स खोदून आणि भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जातो, त्या प्रमाणात वनराई बंधारे वा अन्य कोणत्याही प्रयत्नांतून भूजल पुनर्भरणाचे काम होत नाही, हे गांभीर्याने विचारात घेणे अत्यावश्यक आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये वाढ होत असलयाचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
बोअरवेल्समुळे प्रासंगिक पाणीटंचाईवर मात करणे शक्य होते; परंतु त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत संपुष्टात येत आहेत. भूगर्भजलपातळी वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न आणि उपाय बोअरवेल्स पुढे थिटे पडत आहेत. भूजलपातळी वृद्धिंगत करण्याकरिता गावांजवळच्या वन विभागाच्या जागेतून येणाºया ओढे, नाले, धबधबे यांच्या मार्गात बंधारे बांधून वनतळ््याची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे मत प्रयोगशील शेतकरी महेश्वर देशमुख यांनी व्यक्त केले.
महाड तालुक्यातील वाकी-दहिवड या गावांच्या परिसरात तब्बल १०० च्यावर बोअरवेल्स खोदल्या गेल्या आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजलपातळी वृद्धिंगत होण्यास किमान ६० ते ७० वर्षांचा कालावधी लागतो; परंतु सततच्या बोरवेल खोदाईमुळे पाणी जिरण्याची नैसर्गिक प्रक्रियाच खंडित केली जात आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नसल्याचे भूगोलतज्ज्ञ तथा पोलादपूर कॉलेज प्राचार्य डॉ. समीर बुटाला यांनी स्पष्ट केले.

वाकी-दहिवड या गावांत भूकंपासारखे हादरे बसण्याचा अनुभव गतवर्षी आला. त्यांचाही अभ्यास केला असता, उन्हाळ््यात कोरड्या आणि तप्त झालेल्या बोअरवेल्समध्ये पहिल्या पावसाचे पाणी घुसल्यावर त्या पाण्याची वाफ होते आणि ती बोरवेल्सच्या आत सामावू न शकल्याने, वेगाने बाहेर पडू लागली. त्या वेळी जमिनीतून आवाज आणि भूकंपासारखे धक्के बसले. ही सारी निरीक्षणे शासनाच्या भूवैज्ञानिक आणि भूकंपतज्ज्ञांच्या लक्षात आणून दिली होती; परंतु शासनस्तरावर त्याचे पुढे काय झाले काही कळले नाही. भूगर्भातील जलपातळी वृद्धिंगत करण्याकरिता सत्वर बोअरवेल्स खोदाई थांबविणे अत्यावश्यक आहे.
- डॉ. समीर बुटाला, भूगोलतज्ज्ञ

Web Title: Thousands of bunds have remained suspended due to water shortage,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड