पेणमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:23 AM2018-08-17T02:23:37+5:302018-08-17T02:24:36+5:30

पेणच्या वरसई येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यक्रमाच्या अखत्यारीतील आश्रमशाळेतील १७ विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी दीड वाजता पेणच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

The students of the ashram school in Pen are infected with flu | पेणमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण

पेणमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण

Next

पेण - पेणच्या वरसई येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यक्रमाच्या अखत्यारीतील आश्रमशाळेतील १७ विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी दीड वाजता पेणच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये १३ मुली व ४ मुले असून या सर्वांना तापाची लागण झाली आहे. शालेय परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधी, पिण्याच्या शुद्घ पाण्याचा अभाव, वाहतुकीच्या रस्त्यांची गैरसोय या सर्व बाबींमुळे परिसरात डासांची उत्पत्ती झाल्याने विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी १७ रुग्णवाहिकेद्वारे आणून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या वेळी विद्यार्थ्यांचे रक्ताचे नमुने अलिबाग येथे पाठवण्यात आले असून, तपासाअंती तापामुळे पेशी कमी झाल्याचे उघड झाले आहे.
विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून तापामुळे त्यांना भोवळ येणे, उलटी होणे असे प्रकार सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकंदरीत वरसई आश्रमशाळेतील या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नावर पेण येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय प्रकल्प अधिकारी यांनी त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.
रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेल्या विद्यार्थ्यांनी रात्रीचे भात, भाजी, आमटीचे जेवण घेतले. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर दूध घेतल्यानंतर उलटी होणे, पोटात मळमळणे असे प्रकार जाणवले. यापैकी सर्व विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वीच बारीक ताप येत होता. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजित पाटील व त्यांच्या परिचारिकांनी तातडीने उपचार सुरू केले. त्यांचे रक्ताचे नमुने पेण येथील रक्त तपासणी सेंटर व अलिबाग येथे तातडीने पाठविण्यात आले. मात्र, ताप कोणत्या प्रकारचा आहे याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
घटनेची माहिती मिळताच पेणचे नगरसेवक व बांधकाम सभापती दर्शन कीर्तीकुमार बाफना यांनी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले. याचबरोबर पेण पं.स. सभापती स्मिता पेणकर, नगरसेवक शोमेर पेणकर यांनीही प्रकल्प अधिकाºयांची भेट घेऊन विद्यार्थ्यांसाठी सर्वोतोपरी उपाययोजना राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. पेण तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनीही रुग्णालयास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती घेतली.

उपचारार्थ दाखल केलेले विद्यार्थी
शर्मिला वामन वाघे (१२) , चित्रा लहू ठोंबरा (८ ), मानसी नारायण दरवडा (११), प्रियंका जयेश ठोंबरा (१३) , अस्मिता बाळू वाघ (७ ), महेश तुकाराम वीर (१३), रोशनी भक्ता (१०), हर्षदा कमळाकर वाघ (१०), दिव्या पांडू दोरे (१७), भारती रामा सुतक (१०), करीना जयेश ठोंबरा (११), विद्या बाळू आवारे (१३), गीता रमेश वाघ (१३), रसिका नाग्या सुतक (१०), जयश्री पांडू माडे (११), मंगळ््या राघ्या जाधव (१०), रोशन नारायण दरवडा (१५).

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, रुग्णालयातील आरोग्य पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे डॉ. अभिजित पाटील यांनी सांगितले. वरसई आश्रमशाळेचा परिसर तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश या घटनेमुळे देण्यात आल्याचे एकात्मिक प्रकल्प विभाग सूत्रांनी सांगितले.
शाळेचे प्र. मुख्याध्यापक बी. बी. निवडुंगे व अधीक्षिका याच्यावर प्रकल्प अधिकारी कोणती भूमिका घेतात व विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांबाबत काय उपाययोजना शालेय स्तरावर केल्या जातात याची माहिती मागविण्यात आलेली आहे.
प्रकल्प कार्यालयाचे आनंद पाटील हे या सर्व परिस्थितीची माहिती मुख्याध्यापक बी. बी. निवडुंगे यांच्याकडून घेत असून यापुढे स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्थापन, आरोग्य तपासणीसाठी प्रकल्प कार्यालयाकडून संबंधितांना कडक सूचना दिल्या गेल्या आहेत.

विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत लागल्यास पेणचे लहान मुलांचे डॉक्टर तत्काळ मदतीसाठी उपलब्ध होतील, असे आश्वासन दर्शन बाफना यांनी प्रकल्प अधिकारी आनंद पाटील यांना दिले आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदतीसाठी बरेच स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते, नगरसेवक, सभापती व आदिवासी समाजबांधव संस्थेचे, पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The students of the ashram school in Pen are infected with flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.