Small girl wrote letter to Prime Minister | माथेरानच्या चिमुकलीचे पंतप्रधानांना पत्र!
माथेरानच्या चिमुकलीचे पंतप्रधानांना पत्र!

माथेरान : माथेरानची मुख्य वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी आजवर इथल्या राजकीय पक्षांच्या अनेकांनी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे; परंतु त्याकडे शासनाने नेहमीच डोळेझाक केली आहे. गावाची ही महत्त्वपूर्ण व्यथा कायमस्वरूपी संपुष्टात यावी, यासाठी चक्क इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या कुमारी कार्तिकी भास्कर शिंदे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहिले आहे.
कार्तिकी शिंदे ही येथील सेंट झेव्हियर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत आहे. ही शाळा गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. तिथेपर्यंत पायी जाणे त्रासदायक आहे. ऐन पावसाळ्यात तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माथेरान हे अतिसंवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आल्यामुळेही शासनाच्या जाचक अटींचा मुकाबला ग्रामस्थांना करावा लागत आहे. आमच्या शाळेत जाण्यासाठी पाच वर्षांच्या मुलांना इथल्या दगडामातीच्या रस्त्यातून चालणे म्हणजे अग्निदिव्य आहे. इथे पावसाचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे शासनाने निदान आम्हा शालेय विद्यार्थ्यांना तसेच आबालवृद्ध मंडळींना सोयीस्कर अशी बॅटरीवर चालणारी प्रदूषणमुक्त ई-रिक्षा सुरू करावी. यासाठी पंतप्रधानजी तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या, अशा आशयाचे पत्र कार्तिकीने ८ जुलैला पंतप्रधानांना पाठवले आहे. या चिमुकलीच्या पत्राची पंतप्रधान काय दखल घेतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.


Web Title: Small girl wrote letter to Prime Minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.