होळीचा जल्लोष सुरु असताना ‘त्या’ सहा जणांनी वाचवले गाव !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 07:26 PM2018-03-02T19:26:17+5:302018-03-02T19:26:17+5:30

फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी. सर्वत्र होळीचा जल्लोष चालू होता, मात्र अलिबाग तालुक्याच्या खारेपाटीतील शहापूर गावातील अमरनाथ भगत, रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील हे बहाद्दर ग्रामस्थ शेतकरी मध्यरात्री अडीच वाजता गावाजवळच्या भंगारकोठा समुद्र संरक्षक बंधा-यास समुद्र उधाणामुळे पडत असलेली भगदाडे बुजवण्यासाठी किर्र अंधारात बॅटरीच्या प्रकाशात धडपडत होते.

Six people saved the village while Holi celebrations | होळीचा जल्लोष सुरु असताना ‘त्या’ सहा जणांनी वाचवले गाव !

होळीचा जल्लोष सुरु असताना ‘त्या’ सहा जणांनी वाचवले गाव !

Next

- जयंत धुळप

अलिबाग : फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी. सर्वत्र होळीचा जल्लोष चालू होता, मात्र अलिबाग तालुक्याच्या खारेपाटीतील शहापूर गावातील अमरनाथ भगत, रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील हे बहाद्दर ग्रामस्थ शेतकरी मध्यरात्री अडीच वाजता गावाजवळच्या भंगारकोठा समुद्र संरक्षक बंधा-यास समुद्र उधाणामुळे पडत असलेली भगदाडे बुजवण्यासाठी किर्र अंधारात बॅटरीच्या प्रकाशात धडपडत होते. त्यांचे लक्ष एकच होते, शांतपणे झोपलेल्या गावात समुद्राच्या लाटांचे पाणी घुसू द्यायचे नाही आणि गाव वाचवायचे. रात्री अडीच ते पहाटे साडेपाच अशा तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांना शेवटी यश आले. उगवत्या सूर्याच्या किरणांबरोबर गावात या सहा जणांच्या धाडसाचे वृत्त पसरले आणि काहींनी त्यांना डोक्यावर घेतले तर काहींच्या डोळ्यात अश्रू तराळले.

...ग्रामस्थ झोपी गेले होते
शुक्रवारी रात्री होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीच्या होमात जुन्या अविचारांना भस्मसात करुन शाहापूरकर ग्रामस्थ आपापल्या घरी झोपी गेले होते. तसे हे बहाद्दर सहा जण देखील रात्री एक वाजण्याच्या सुमारास आपापल्या घरी पोहोचले होते. गेल्या सहा ते आठ अमावास्या आणि पौर्णिमेला गावाच्या किना-यावरील समुद्र संरक्षक बंधा-यांना उधाणाच्या भरतीमुळे मोठी भगदाडे पडून समुद्र भरतीचे पाणी गावाच्या वस्तीपर्यंत पोहोचले होते. त्यावर मात करण्याकरीता हे सर्व समुद्र संरक्षक बंधारे श्रमदानातून दुरुस्त करण्याचा निर्णय गावकीने घेतला. सलग पाच दिवस गावांतील किमान 600 ग्रामस्थ स्त्री-पुरुष शेतक-यांनी दररोज अथक श्रमदान करुन हे बंधारे बांधून काढून आपले गाव सुरक्षित केले होते. 

.. .यांना लागली कुणकुण बंधारा फुटीची
होळी पौर्णिमेच्या दिवशी विशेषत: रात्री येणारे समुद्राचे उधाण मोठे असते, असा शहापूर मधील वयोवृद्ध जाणकार शेतक-यांचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरनाथ भगत गुरुवारी रात्री अत्यंत जागृक होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरा मागील शेताच्या खाचरात(नाल्यात) पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याची शंका त्यांना आली. त्यांनी त्याची खातरजमा केली तर भंगारकोठा संरक्षक बंधा-यास मोठ्या उघाडी जवळ समुद्र भरतीच्या उधाणाच्या लाटांनी भगदाड(खांड) पडत असल्याचे लक्षात आले. भगदाड शेजारील उपलब्ध चिखलमातीतून बुजवण्याशिवाय पर्याय नव्हता. 
अखेर अमरनाथ भगत यांनी आपले शेजारी रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील यांना हाक दिली. त्यांनीही तत्काळ प्रतिसाद दिला.  बॅटरी, फावडे, घमेले घेवून हे सहा शेतकरी गावाच्या स्मशानाशेजारच्या पायवाटेने भंगारकोठा संरक्षक बंधा-या जवळच्या मोठय़ा उघाडीवर पोहोचले आणि त्यांनी भगदाड बुजवण्यास प्रारंभ केला. समुद्रालाच थोपवण्याचे हे काम होते, परंतू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा अथक सामना करुन तीन तासांच्या कष्टाअंती त्यांना हे भगदाड बुजवण्यात यश आले. पाच वाजण्याच्या सुमारास भरतीच्या उधाणाचा जोर देखील कमी झाला आणि या बहाद्दर सहा शेतक-यांना आपले गाव वाचविण्यात यश आले आहे.

शासनाच्या आपत्ती निवारण यंत्रणोची गंभीर शोकांतिका
केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन ते गांव अशी आपत्ती निवारण यंत्रणा अस्तीत्वात आहे. पंरतू गेल्या दोन तिन वर्षापासून अमावास्या-पौर्णिमेला येणा:या समुद्राच्या मोठय़ा उधाणाच्या भरती आणि त्यामुळे संमुद्र संरक्षक बंधारे फूटून गावांत समुद्राचे पाणी घुसण्याच्या संभाव्य धोक्यांची पूर्व कल्पना देणारी कोणतीही आपत्ती निवार यंत्रणा अद्याप अस्तीत्वातच आली नसल्याने खारेपाटातील या शेतकरी बांधवांना आपल्या गावांच्या सुरक्षेसाठी स्वत: सक्रीय कार्यरत व्हावे लागते आहे. गुरुवारी मध्यरात्री भंगारकोठा समुद्र संरक्षक बंधा-यास भगदाड पडून  आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती शुक्रवारी धुळवडीची सुट्टी असल्याने रायगड जिल्हा प्रशासनास शनिवार दि.3 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता, तब्बल 30 ते 33 तासांनी पोहोचणार आहे. आपत्ती निवारण यंत्रणोची ही गंभीर शोकांतीका असल्याची भावना अमरनाथ भगत यांनी व्यक्त केली आहे. 

रोजगार हमी योजनेत कशी बसवणार बंधारे फूटीची आपत्ती
जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी समुद्र संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचे जाहीर केले आहे. त्याचे आम्ही देखील स्वागत केले आहे. गुरुवारी मध्यरात्री उद्भवलेली ही आपत्कालीन परिस्थिती आणि त्यावर आम्ही ग्रामस्थांनी गांव वाचवण्यासाठी केलेली तत्काळ उपाययोजना हे सारे सरकारच्या रोजगार हमी योजनेत कसे बसवणार असा सवाल या निमीत्ताने रात्रभर धाडसी श्रमदान केलेल्या या सहा शेतक-यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Six people saved the village while Holi celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड