उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ लावण्यासाठी शॅडो रजिस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 01:03 AM2019-04-14T01:03:16+5:302019-04-14T01:03:44+5:30

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून पैशाचा सर्रास वापर केला जातो.

Shadow Register for matching candidate's expenditure | उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ लावण्यासाठी शॅडो रजिस्टर

उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ लावण्यासाठी शॅडो रजिस्टर

Next

अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून पैशाचा सर्रास वापर केला जातो. या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली असताना याचाच एक भाग म्हणून उमेदवारांकडून जाहीर केला जाणारा खर्च आणि प्रत्यक्षात झालेला खर्च याचा ताळमेळ लावण्यासाठी ‘शॅडो रजिस्टर’ (अभिरूप खर्च नोंदवही) तयार केले आहे. परिणामी उमेदवाराने दिलेल्या माहितीची शहानिशा करणे निवडणूक यंत्रणेस सोपे जात आहे तर दुसरीकडे उमेदवारांना आपल्या खर्चाची नोंद बिनचूक ठेवण्याकरिता अधिक काळजी घ्यावी लागत आहे.
मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी पैशांचा गैरवापर रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च देखरेख विभाग लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र स्थापन केला असून लोकसभा मतदारसंघात खर्चावर देखरेख ठेवण्यासाठीस्वतंत्र निरीक्षकही नियुक्त केले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ७० लाख रुपयांची खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने घातली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघाकरिता रायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवार निवडणूक खर्च संनियंत्रण समिती कार्यरत आहे. खर्च देखरेख कक्ष स्वतंत्रपणे कार्यरत आहे. बेकायदेशीर निधीला आळा घालण्यासाठी प्राप्तिकर विभाग, परकीय चलनाचा गैरवापर रोखण्यासाठी सक्तवसुली संचालनालय आणि राजकीय पक्षांकडून होणारा पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची देखील मदत घेण्यात आली आहे.
निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठीचा सर्व प्रमुख खर्च धनादेश किंवा ड्राफ्ट यांच्या माध्यमातून केवळ याच एका बँक खात्यामधून करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांना रोजच्या रोज आपला खर्च तपशील सादर करावा लागत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अभिरूप नोंदवही (शॅडो रजिस्टर)मध्ये नोंदविण्यात आलेल्या उमेदवारांच्या खर्चाचा तपशील व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी नोंदविलेला खर्चाचा तपशील याचा ताळमेळ घेण्यातकरिता सर्व उमेदवार वा त्यांच्या प्रतिनिधींची पहिली बैठक ११ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे. आता मंगळवार, १६ एप्रिल व शनिवार, २० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवार वा त्याच्या अधिकृत प्रतिनिधींनी आपल्या खर्च नोंदवहीसह उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष उमेदवार निवडणूक खर्च संनियंत्रण समिती डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली आहे. निवडणुकांसाठी प्रशासकीय अधिकारी सज्ज झाले आहेत.
>काय आहे शॅडो रजिस्टर ?
निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून सभा, मेळावे, बैठका, पदयात्रा, दुचाकी रॅली, प्रचाराची वाहने, प्रसिद्धीपत्रके यावर खर्च करण्यात येतो. या खर्चाचे आकडे प्रत्यक्षाहून अत्यंत कमी दाखविले जाण्याचे प्रकार घडल्याचे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये निदर्शनास आले आहे. उमेदवार आपल्या खर्चाचे रजिस्टर जसे त्याच्याकडे ठेवतात, तसेच त्या खर्चाचे समांतर रजिस्टर लोकसभा मतदार संघातील खर्च रेखरेख कक्षात ठेवले आहे, त्यालाच ‘शॅडो रजिस्टर’ म्हटले जाते.
>उमेदवारांचे खर्च रजिस्टर आणि
शॅडो रजिस्टर संयुक्त पडताळणी
उमेदवारच्या प्रचारा दरम्यान निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास येणाºया खर्चाच्या बाबी ‘शॅडो रजिस्टर’मध्ये नमूद केल्या जातात. ज्या वेळी उमेदवार वा त्यांचा प्रतिनिधी उमेदवार खर्च रजिस्टर घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात येतात, त्या वेळी उमेदवारांचे खर्च रजिस्टर आणि शॅडो रजिस्टर यांची पडताळणी करण्यात येते. एखादी खर्चांची बाब उमेदवाराने नमूद केली नसेल आणि शॅडो रजिस्टरमध्ये असेल तर त्याचा खुलासा उमेदवारास द्यावा लागतो. खुलाशा नंतर तो खर्च उमेदवाराने केला असल्यास शॅडो रजिस्टरमधील त्या खर्च बाबाची नोंद उमेदवारांच्या खर्च रजिस्टरमध्ये घ्यावी लागते.
>विधानसभा मतदारसंघात
लेखा पथके तैनात
प्रत्येक उमेदवारांचा हा नेमका खर्च ग्राह्य धरण्याचे काम ‘शॅडो रजिस्टर’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या काळात कुठल्याही बँक खात्यामधून संशयास्पदरीत्या पैसे काढून घेणाºयावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यात येत आहे, तसेच मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने निवडणूक काळात केलेल्या खर्चासाठी ‘शॅडो रजिस्टर’ ठेवण्यात आले असून, यासाठी विधानसभा मतदारसंघात लेखा पथकही नेमण्यात आले आहे.

Web Title: Shadow Register for matching candidate's expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.