रायगडमध्ये मतदारांनी घेतला आखडता हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:18 AM2019-04-24T00:18:02+5:302019-04-24T00:18:19+5:30

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानाची आकडेवारी तब्बल चार टक्क्यांनी घसरली

Raigad voters took a hand in hand | रायगडमध्ये मतदारांनी घेतला आखडता हात

रायगडमध्ये मतदारांनी घेतला आखडता हात

Next

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांनी अतिशय गाजावाजा करून आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला होता, तर दुसरीकडे निवडणूक विभागानेही मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जोरदार कँपेनिंग केले होते. मात्र, मतदानाच्या दिवशी मतांचे दान टाकण्यामध्ये मतदारांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानाची आकडेवारी तब्बल चार टक्क्यांनी घसरली आहे, त्यामुळे या ट्रेंडचा फायदा कोणाला होणार हे मतपेट्या उघडल्यावर समोर येणार आहे. काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरू होते, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदानाला येणाऱ्या मतदारांची तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली होती. मतदारांमध्ये मतदानासाठी असलेला उत्साह दिसून आला नाही. त्यानंतर हळूहळू उन्हाच्या झळा वाढल्याने मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्यांची गर्दी रोडावल्याचे चित्र होते. नेहमीप्रमाणे लांबच लांब रांगा लागलेल्याचे दृश्य नेहमीच निवडणुकीत अनुभवास मिळत होते. या वेळी तसे दिसून आले नाही. मतदारांना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी विनंती करत होते. मात्र, बाहेर पडण्याची मानसिकता दिसून येत नव्हती. असे चित्र अलिबाग विधानसभा मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रांवर दिसून आले.

रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक : मतदानाची आकडेवारी तब्बल चार टक्क्यांनी घसरली

अलिबागमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प नव्हता
निवडणूक विभागाने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर सर्व सुविधा सज्ज ठेवल्याचा केलेला दावा फोल ठरला. अलिबाग तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक-२१ वैजाळी-२ येथे दिव्यांगांसाठी रॅम्प उभारण्यात आला नव्हता, त्यामुळे पायºया चढून मतदान केंद्रात जावे लागत होते. त्या ठिकाणी व्हीलचेअर होते. मात्र, तेथील कर्मचाºयांनी मतदारांना ते उपलब्ध करून दिले नाही. पत्रकारांनी ही बाब लक्षात आणून देताच व्हीलचेअर सज्ज केली.
केंद्राबाहेर लहान मुलांना सांभाळण्यासाठी आशा सेविका
प्रत्येक मतदान केंद्राबाहेर लहान मुलांना सांभाळण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी आणि आशा सेविका तत्पर असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे लहान मुलांना देऊन मतदार मतदान करण्यासाठी जात होते. पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आल्याने मतदारांनी निवडणूक विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
मतदान केंद्रावर शुकशुकाट
नवगावमधील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. येथील मतदान केंद्रांवर दोन हजार ९३२ मतदार संख्या होती. दिवसभरात फक्त १९७ मतदारांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला, त्यामध्ये प्रामुख्याने काही नवमतदारांचा समावेश होता. सकाळपासून दुपारपर्यंत या मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. याच मतदान केंद्रांवर नेहमीच ८५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची नोंद झाल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय नाही
मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या राजकीय बूथवरही कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत नव्हते. कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली नव्हती. मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने सूचना दिल्या जात होत्या. निवडणूक विभागाने आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केल्याने कारवाईच्या भीतीपोटी बूथवर उमेदवारांचा प्रचार कटाक्षाने टाळण्यात आला होता. मात्र, रेवस कोळीवाडा येथील बूथवर विवेक पेरेकर (२१ वर्षे) याने बूथ लावला होता. तेथे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा फोटो असलेल्या ६५६ मतदार चिठ्ठी सापडल्या. भरारी पथकातील अधिकारी प्रदीप पगारे यांना सीव्हीजल अ‍ॅपवर ही तक्रार मिळाली होती. त्यांनी पंचनामा करून पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

Web Title: Raigad voters took a hand in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.