रोहा : ब्रिटिश काळापासून भारतात केवळ दोनच देवस्थानांना पोलीस मानवंदना देण्यात येत आहे आणि आजही त्यात खंड पडलेला नाही. यापैकी एक कोलकात्यात असून, दुसरे रायगड जिल्ह्यातील रोहा येथील श्री धावीर महाराज देवस्थान आहे. विजयदशमीच्या दुसºया दिवशी श्री धावीर महाराजांच्या नवरात्रोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने होते. या वेळी पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ होतो. पहाटे आल्हाददायक वातावरणात आणि उत्साहात पार पडणारा हा सोहळा पाहण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने येतात.
रायगड जिल्ह्यातील कळसगिरीच्या पायथ्याशी कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा शहर वसले आहे. थोर अर्थतज्ज्ञ म्हणून नावलौकिक मिळवलेले देशाचे पहिले अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांची कर्मभूमी तर स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडूरंगशास्त्री आठवले यांची जन्मभूमी, अशा जागतिक स्तरावरील दोन व्यक्ती रोहा शहरातील आहेत.
कोकण रेल्वेचे प्रवेशद्वार, तर पूर्वी ‘भातशेतीचे कोठार’ म्हणूनही रोह्याची ओळख होती. श्री धावीर देवस्थान हे महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत, तर रोहेकरांचे ग्रामदैवत आहे.
शहराच्या पश्चिमेस सुंदर व भव्य धावीर मंदिर आहे. या मंदिराबाबत आख्यायिका आहे. रोहा येथील एक गृहस्थ बळवंतराव विठोजी मोरे यांचा लहानपणापासून वराठी येथील धावीर देवदर्शनाला जाण्याचा नेम होता. धावीर महाराजांचे दर्शन झाल्याशिवाय ते अन्न ग्रहण करीत नसत. मात्र, वृद्धापकाळामुळे पुढे त्यांना वराठीला जाणे तेही दोन मैल डोंगर चढून धावीर दर्शन घेणे अशक्य आणि अवघड होऊ लागले.
देवाचे दर्शन न घेतल्यामुळे त्यांच्यावर उपवास घडू लागले. अखेर भक्तांची श्रद्धा पाहून धावीर महाराजांनी त्यांना दृष्टान्त दिला की, शहराच्या पश्चिमेस वराठीमध्ये नजर पोहोचेल असा कातळ आहे. त्या जागेवरून माझे दर्शन घ्यावे. हा दृष्टान्त होताच मोरे यांनी पाच भावांच्या साहाय्याने १७६९मध्ये माघ शुद्ध १३ रोजी मंदिर बांधण्यात सुरू केले. शके १७७० म्हणजे १८४९मध्ये फाल्गुन वद्य ८ रोजी पूजा-अर्चा करून देवळात आज असलेल्या मूर्तीची स्थापना केली; परंतु हे देऊळ पूर्णपणे इंजायली लाकडापासून बांधल्यामुळे त्याला वाळवी लागली. त्यानंतर आठ वर्षांनी हे मंदिर ग्रामस्थांनी वर्गणीतून बांधले, तर त्याचे १४ मार्च १९९४ रोजी स्वाध्यायी प्रणेते व जागतिक कीर्तीचे थोर विचारवंत पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या हस्ते नूतनीकरणाचे काम सुरू केले.
आमदार सुनील तटकरे, नगर विकासमंत्री असताना, त्यांनी मंदिराचा समावेश राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेत केला. त्यांच्याच प्रयत्नांतून या ठिकाणी भक्तनिवास बांधण्यात आले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ धावीर महाराजांचा रक्षक चेडा याचे स्थान आहे. गाभाºयामध्ये धावीर महाराजांच्या डाव्या बाजूस देवी काळकाई, उजव्या बाजूस धाकसूत महाराज, मागे वीर व कोपºयामध्ये वाघ बाप्पा अशी देवांची स्थाने आहेत. देवस्थानात नवरात्रोत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून मोठ्या उत्साहाने केला जातो. दहा दिवस दररोज गोंधळी लोकांकडून कीर्तन, गोंधळ, भजन आदी कार्यक्र म संपन्न होतात. दसºयाच्या दिवशी सकाळी ६ वाजता धावीर महाराजांची पालखी मिरवणूक दरवर्षी काढली जाते.
ब्रिटिशांच्या काळापासून या देवस्थानास पोलिसांची मानवंदना देण्याचा बहुमान देण्यात आला आहे. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला असता, पुलोद शासनामधील पालकमंत्री बी. ल. पाटील यांच्या विनंतीवरून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आदेशानुसार ही मानवंदना पुन्हा सुरू करण्यात आली. देवस्थानाला दिली जाणारी पोलीस वंदना हे या देवस्थानाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. मानवंदना स्वीकारल्यानंतर देवळामधून निघालेली पालखी संपूर्ण गावामधून फिरते.
रविवारी पहाटे पोलिसांनी मानवंदना दिल्यावर श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होईल. महाराजांची पालखी ग्रामस्थांना दर्शन देत दुसºया दिवशी सकाळी मंदिरात परतते. या वेळी पुन्हा महाराजांना पोलीस मानवंदना देण्यात येते आणि पालखी सोहळ्याची सांगता होते.

सोहळ्यात तलवारबाजी
पालखीचे वैशिष्ट्य असे की, मुस्लीम बांधवही मोठ्या भक्तिभावाने स्वागत करून राष्ट्रीय एकात्मतेचे स्वरूप दाखवून देतात.
धावीर महाराजांच्या पालखीच्या दिवशी सायंकाळी धावीराचे वारे कुलकर्णी यांच्या वंशजाच्या अंगात खेळते.
हाती तलवार घेऊन गावातील संकट दूर करण्याकरिता उधळणारे हे उग्र वारे पाहण्यास मोरे आळीत तुफान गर्दी लोटते.
सोहळ्यादरम्यान स्वयंसेवी संस्था, संघटनांमार्फत भक्तांना भोजन, अल्पोपाहार, थंड पेय अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.