अलिबाग : चौदा वर्षांखालील मुलांच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पनवेल तालुका क्रि केट संघाने विजेतेपद पटकावले. रायगड जिल्हा क्रिकेट असो. तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग तालुका संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम सामन्यात पनवेलने अलिबागचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. अलिबागचा मिहीर भाटकर याला स्पर्धेचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून पनवेलचा मयूर बिराजदार याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून पनवेलचा ओम जाधव याची तर पनवेलच्याच दर्शन महाडिक याची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली.
क्रि केट स्पर्धा रामशेठ ठाकूर स्पोटर््स कॉम्प्लेक्स येथे खेळवल्या गेल्या. स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अलिबाग संघाने ३९.३ षटकांमध्ये सर्व गडी गमावून १२७ धावा केल्या. मिहीर भाटकर याने सर्वाधिक ४५ धावा काढल्या. सोहम गोखले याने २१ धावा केल्या. पनवेल संघाने २९.४ षटकांमध्ये २ गड्यांच्या मोबदल्यात १२८ धावा केल्या. पनवेलच्या मयूर बिराजदारने नाबाद ४२ धावा केल्या.