पनवेलचे एसटी आगार खड्ड्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:15 PM2018-10-28T23:15:44+5:302018-10-28T23:16:08+5:30

पनवेल एसटी डेपोची दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण डेपो खड्डेमय झाला आहे, तसेच डेपोत कमालीची अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

Panvel's ST Depot | पनवेलचे एसटी आगार खड्ड्यांत

पनवेलचे एसटी आगार खड्ड्यांत

Next

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेल एसटी डेपोची दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण डेपो खड्डेमय झाला आहे, तसेच डेपोत कमालीची अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. खड्ड्यांतून बस चालविताना चालकांची कसरत होत आहे. यात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पनवेल बसस्थानकात दररोज जवळपास पाच हजार बसेस ये-जा करतात. हे बसस्थानक मध्यवर्ती ठिकाणी असल्याने कोकण, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात जाणाºया प्रवाशांची येथे मोठी गर्दी असते. या डेपोतून दादर, कुर्ला, ठाणे, अलिबाग, उरण, डोंबिवली आदीसह ग्रामीण भागासाठी बसेस सुटतात. त्यामुळे या डेपोला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सण-उत्सव काळात तर या डेपोत प्रवाशांची कमालीची गर्दी असते. या पार्श्वभूमीवर डेपोची नियमित डागडुजी करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. डागडुजीअभावी डेपोत खड्डे आहेत, की, खड्ड्यांत डेपो अशीच काहीशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी डेपोच्या काही भागात काँक्रीटीकरण करण्यात आले होते. त्यामुळे कोकणात जाणाºया बसेसना काहीसा दिलासा मिळाला होता. असे असले तरी आता हे काँक्रीटही उखडले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. बसेस खड्ड्यांत आपटल्या जात आहेत. त्यामुळे गाडीत बिघाड होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

स्वच्छतागृहाची स्वच्छता केली जात नाही. डेपोच्या आवारात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. मलनि:सारण वाहिन्या सुद्धा तुंबल्या आहेत. त्याचबरोबर जलवाहिनी तुटली आहे. याबाबत उपाययोजना होताना दिसत नाहीत. या संदर्भात आगार व्यवस्थापक विलास गावडे यांच्याशी संपर्क साधला असता या सर्व संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे मोघम उत्तर त्यांनी दिले.

पनवेल बसस्थानकाच्या नूतनीकरणाकरिता आम्ही पाठपुरावा करीत आहे. या ठिकाणी अनेक समस्या आहेत. त्या अर्जांचा ढीग पडला आहे. मात्र, महामंडळाकडून काहीही केले जात नाही. त्याचे परिणाम प्रवाशांना भोगावे लागत आहेत.
- डॉ. भक्तीकुमार दवे, अध्यक्ष प्रवासी संघ, पनवेल

Web Title: Panvel's ST Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.