माथेरान मुख्याधिकारी घोलप यांच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:09 AM2018-04-24T01:09:57+5:302018-04-24T01:09:57+5:30

२६ एप्रिलला होणार चौकशी : गैरहजर राहिल्यास कारवाई

Order of inquiry of Matheran's Chief Officer Gholap | माथेरान मुख्याधिकारी घोलप यांच्या चौकशीचे आदेश

माथेरान मुख्याधिकारी घोलप यांच्या चौकशीचे आदेश

Next

मुकुंद रांजणे ।
माथेरान : माथेरानमध्ये जून २०१६मध्ये सागर घोलप यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आजवर सभागृहातील सदस्यांनी केव्हाच कुठल्याही कामात सकारात्मकता दर्शवली नसून, त्यांच्या नेहमीच्याच आडमुठे धोरणांमुळे माथेरान हे अनेक विकासकामांपासून वंचित राहिले असल्याने आम्ही सत्तेत विराजमान झाल्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वेळप्रसंगी न्याय देऊ शकत नाही. त्यासाठी मुख्याधिकारी घोलप यांच्या मनमानी कारभारास वैतागून विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मागील वर्षापासून एकूण तीन ते चार वेळा जिल्हाधिकारी रायगड यांना लेखी निवेदने प्रत्यक्षपणे सादर केलेली आहेत. दि. १ मार्च २०१८ रोजी जिल्हाधिकारी रायगड यांना पुन्हा सदर बाबतीत तक्र ारी अर्ज सादर करून अशा अकार्यक्षम मुख्याधिकारी यांच्या कामाची चौकशी करावी, असे लेखी निवेदन दिल्याने अप्पर जिल्हाधिकारी यांनी घोलप यांना दि. २६ एप्रिल रोजी सदर तारखेच्या वेळी नगरपालिका कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.
नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे मुख्याधिकारी घोलप यांनी त्यांच्या स्वत:च्या मनमानी कारभारामुळेच मागील २० महिन्यांत नागरिकांच्या सूख-सोयीसाठी कुठल्याही प्रकारच्या निविदा काढलेल्या नाहीत. प्रत्येक विकासाची बाब माथेरान सनियंत्रण समितीवर ढकलून हात झटकत आहेत. सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे मागितली, तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देत सन्माननीय सदस्यांना अर्वाच्च भाषा वापरणे. अनेकदा स्वहिताचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणे. मुख्याधिकारी नगरपालिकेच्या निवासस्थानात न राहता, दुपारी २ नंतरच कार्यालयात येऊन रात्री उशिरापर्यंत कर्मचारीवर्गाकडून कामे करून त्यांची कुचंबणा करणे, नगरसेवकांच्या पत्राला केराची टोपली दाखवणे, आपत्कालीन वेळेस हजर न राहणे, ठेकेदारांची बिले अदा न करणे, त्यामुळे कुणीही ठेकेदार निविदेतील कामे घेण्यास धजावत नाही. तसेच प्रशासकीय कामे मार्गी लावण्यासाठी सांगितल्यावर ही कामे माझी नाहीत, असे निर्भीडपणे सांगत आहेत. सफाई कामगारांना नाहक वेठीस धरून त्यांचे पगारही वेळेत न करणे, त्यामुळे अनेकदा सफाई कामगार संपाचे हत्यार उपसतात, तेव्हाच मुख्याधिकारी जागे होत आहेत. अशा अपप्रवृतीमुळे ते नगरपालिकेचा कारभार चालविण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे अशा निष्क्रीय, कामचुकार अधिकाऱ्यांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या आशयाचे लेखी निवेदन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दिल्यानुसार घोलप यांना सखोल चौकशीसाठी दि. २६ एप्रिल रोजी हजर राहून आपले म्हणणे मांडावे आणि जर हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल, असा आदेश अप्पर जिल्हाधिकारी रायगड यांनी मुख्याधिकारी घोलप यांना पत्र देऊन दिलेला आहे. त्यामुळे घोलप हे खरोखरच चौकशीसाठी हजर राहतील की नाही? कारण मध्यंतरी खुद्द जिल्हाधिकारी यांनी घोलप यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहणेबाबत सूचित करूनदेखील ही व्यक्ती हजर राहिली नव्हती, त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश धुडकावून लावला होता. त्यामुळे निदान या वेळेस तरी घोलप हजर राहणार का? याबाबत नागरिकांमध्ये तर्क-वितर्क सुरू आहेत.

Web Title: Order of inquiry of Matheran's Chief Officer Gholap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड