रोहा उपजिल्हा रुग्णालयात केवळ एकच डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:57 AM2019-06-12T01:57:33+5:302019-06-12T01:58:11+5:30

१० दिवसांत अनेक रुग्णांना पाठविले अलिबागला : पालकमंत्र्यांची १२ जूनला पनवेलला बैठक

Only one doctor in Roha Subdivision hospital! | रोहा उपजिल्हा रुग्णालयात केवळ एकच डॉक्टर!

रोहा उपजिल्हा रुग्णालयात केवळ एकच डॉक्टर!

googlenewsNext

मिलिंद अष्टीवकर 

रोहा : तालुक्यातील सुसज्ज बांधण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरच नसल्याने उपजिल्हा दर्जाचे रुग्णालयच सलाइनवर आहे. ५० खाटांच्या रुग्णालयात केवळ एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने गेल्या १० दिवसांत अनेक रुग्णांना अलिबागला पाठवावे लागले आहे. परिणामी कुणी डॉक्टर देतोय का डॉक्टर अशी वेळ रोहेकरांवर आली आहे. गेले काही महिने रुग्णालयाची स्थिती सुधारावी यासाठी सतत पाठपुरावा करीत असलेल्या गावातील तरुणांनी युथ फोरम माध्यमातून निवेदन दिले होते. याची दखल घेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी १२ जूनला पनवेल प्रांत कार्यालयात येथे जिल्हा शल्य चिकित्सक आणि युथ फोरमची बैठक बोलावली आहे.

रोहा येथील शासकीय रुग्णालयात रोहेकरांना अनेक महिने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. उपचाराअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची औषधोपचार घेण्यासाठी येथे मोठी गर्दी असते. उपजिल्हा रुग्णालय रोहा येथील वस्तुस्थिती अशी आहे की एकूण डॉक्टरांची ८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ३ पदे भरलेली असून ५ पदे रिकामी आहेत. सद्यस्थितीत केवळ एकच डॉक्टर कार्यरत आहे. शासनाचे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व केवळ एकच डॉक्टर येथे कार्यरत आहे. २४ मार्च २०१९ रोजी नितीश ज्ञानेश्वर भातखंडे हा २८ वर्षांचा तरुण अपघातग्रस्त झाल्यानंतर केवळ रुग्णवाहिका व आवश्यक ते उपचार वेळेत न मिळाल्यामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला आहे. ही दु:खद घटना रोहे गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली होती.
शासकीय रुग्णालयाचे हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी रोह्यातील तरुणांनी पुढाकार घेत मंगळवार २६ मार्च २०१९ रोजी रोह्याच्या श्री विठ्ठल मंदिरात या समस्येवर बैठक घेतली. विविध ठिकाणी संपर्क तसेच पत्रव्यवहार केले, रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्या दालनात बैठकही झाली. तदनंतर गावातील तरुण रोशन चाफेकर, अमित कासट, हाजी कोठारी, आदित्य कोंडाळकर, विकी उमेश वैष्णव, विनीत वाकडे, मयूर धनावडे, किरण कानडे आदी सेवाभावी तरुण रुग्णालयात योग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी दररोज पाळीपाळीने तेथे जात पाठपुरावा के ला.

पालकमंत्र्यांकडे पत्राद्वारे के ली तक्रार

१गेल्या ३१ मेला होते तेही डॉक्टर सोडून गेल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले. गेल्या दहा दिवसांत अनेक रु ग्णांना अलिबागला नेण्यात आले. रुग्णालयात देखरेख करणाºया या तरुणांनी ही बाब समोर आणताच शुक्रवार ७ जून रोजी सिटीझन्स फोरमची तातडीची बैठक आप्पा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह रोहा येथे संपन्न झाली. त्यामध्ये पालकमंत्र्यांना निवेदन देऊन आठ दिवस वाट पहायची, अन्यथा श्री विठ्ठल मंदिरात बैठक बोलावून उपोषणाचा मार्ग अवलंबविण्याची सूचना राजेंद्र जाधव, नितीन परब यांनी केली. त्याप्रमाणे रोहा तालुका सिटीझन्स फोरम या संस्थेने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना लेखी तक्रार वजा विनंती अर्ज सादर केला आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय रोहे येथील तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.

२रुग्णालयामधील बहुतांश कारभार हा शिकाऊ डॉक्टरांच्या जीवावर सुरू आहे. त्यामुळे रोहेकरांचे आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे. तसेच ‘आयुष’च्या माध्यमातून नियुक्त केलेले डॉक्टर हे रोहेकरांना सेवा देण्यास असमर्थ व कुचकामी ठरल्यामुळे त्यांच्या नियुक्त्या रद्द करून त्यांच्या जागी कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी. विंचूदंश, सर्पदंश व श्वानदंश यावर आवश्यक त्या औषधांचा साठा रुग्णालयात उपलब्ध होत नाही. त्यामुळे आजपर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत. साथीच्या आजारांसाठी लागणारी प्रतिजैविके यांचाही साठा अत्यल्प असल्यामुळे अनेकदा ती औषधे खाजगी दुकानातून घ्यावी लागतात. यासह विविध समस्यांच्या निवेदनाची दखल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या बैठकीत उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांवर काय ठोस उपाय केला जातो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर नाहीत, म्हणूनच रोहा रुग्णालयात आलो असून काही उपाययोजना केल्या आहेत, पनवेल आणि अलिबाग येथून तात्पुरती डॉक्टर पाठविण्याची व्यवस्था केली आहे.
- डॉ. अजित गवळी,
जिल्हा शल्य चिकित्सक
निवेदनाद्वारे रोहा उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या गैरसोयींचा पाढा वाचून रायगडचे पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. रुग्णालयात गैरसोय व नियोजनशून्य कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांचे हाल होत असून त्यांचे आरोग्य व पर्यायाने आयुष्य अंधारमय होत आहे असे कळविण्यात आलेले आहे.
- रोशन चाफेकर, निमंत्रक
रोहा युथ फोरम
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी हे स्वत: रोहा रुग्णालयाच्या बाबतीत गंभीर नसल्याचे त्यांच्यासह बोलल्यावर जाणवले आहे. त्यांना माहीत होते की मेअखेर येथील डॉक्टर जाणार आहेत, तर त्यांनी त्याची पूर्व तजवीज करायला हवी होती. त्यांनी सांगितलेले डॉक्टरही अद्याप रुग्णालयात पोहोचलेले नाहीत.
- आप्पा देशमुख, निमंत्रक
रोहा सिटीझन्स फोरम
 

Web Title: Only one doctor in Roha Subdivision hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.