अलिबाग : गेल्या सहा दिवसांपासून रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ४४ व्या कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते शनिवारी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला.
कोकण परिक्षेत्रामधील ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई या संघात अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून नवी मुंबई पुरुष व महिला संघाने सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून नवी मुंबई पोलीस संघ सर्वोत्कृष्ट ठरला आहे. पारितोषिक वितरण समारंभास कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश पाटील, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल : पुरुष गट : हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, कुस्ती, अ‍ॅथलॅटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, जलतरण, जुदो, क्रॉस कंट्री या ११ खेळातील सांघिक प्रथम विजेतपद नवी मुंबई पोलीस संघाने पटकावले आहे तर फुटबॉलचे रत्नागिरी पोलीस, हॅन्डबॉलचे सिंधुदुर्ग पोलीस तर खो-खोचे सांघिक प्रथम विजेतेपद यजमान रायगड पोलीस संघाने पटकावले आहे.
महिला गट- व्हॉलीबॉल, बास्केटबॉल,खो-खो, कुस्ती, अ‍ॅथलॅटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, जुदो, क्रॉसकंट्री या नऊ क्रीडा प्रकारातील प्रथम क्रमांकाचे सांघिक विजेतपद देखील नवी मुंबई पोलीस संघाने पटकावले आहे तर कबड्डीमधील सांघिक विजेतेपद यजमान रायगड पोलीस संघाने पटकावले आहे.
कुस्तीपटू महिला पोसई प्रियांका बुरूंगले, माणगाव पोलीस स्टेशन (रायगड), कबड्डीपटू विवेक भोईटे नवी मुंबई, आणि कबड्डीपटू रोहित गमरे (रत्नागिरी), सचिन साळवी (रत्नागिरी), भार्गवी माने (नवी मुंबई) यांना विशेष पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.