नाडसूर ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 04:02 AM2018-07-08T04:02:48+5:302018-07-08T04:03:02+5:30

सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. या वेळी ग्रामविकास आघाडीचे सर्वेसर्वा युवा नेते संदेश शेवाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध करण्यात आली.

Nadasur Gram Panchayat Enection News | नाडसूर ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

नाडसूर ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

Next

राबगाव/पाली - सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. या वेळी ग्रामविकास आघाडीचे सर्वेसर्वा युवा नेते संदेश शेवाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध करण्यात आली. नाडसूर ग्रामपंचायतीवर गेली १५ ते २० वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत युवा नेते संदेश शेवाळे यांच्या ग्रामविकास आघाडीने बाजी मारत शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. निवडणुकीत राजकीय क्षेत्रात नवखे असणारे उद्योजक संदेश शेवाळे यांची राजकीय खेळी यशस्वी झाल्याने सरपंच उज्ज्वला भिवा पवार यांच्यासहित ९ पैकी ५ सदस्य ग्रामविकास आघाडीने निवडून आणले आहेत. उपसरपंचपदाची निवडणूक नवनिर्वाचित सरपंच उज्ज्वला पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. यात ग्रामविकास आघाडीचे संदेश शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली.

कडसुरे सरपंचपदी कांचन शिर्के बिनविरोध
नागोठणे : कडसुरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांचन कृष्णाकांत शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असून त्यांच्यातील अंतर्गत तडजोडीनुसार विद्यमान सरपंच रवींद्र शिर्के यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सरपंचपदासाठी झालेल्या विशेष सभेत कांचन शिर्के यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी अरु ण गणतांडेल यांनी कांचन शिर्के यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

चांभार्लीच्या उपसरपंचपदी दत्तात्रेय जांभळे
मोहोपाडा : चांभार्ली ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी ग्रामविकास आघाडीचे दत्तात्रेय जांभळे यांनी अर्ज दाखल केला. उपसरपंच पदासाठी जांभळे यांचा एकमेव अर्ज आल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच बाली कातकरी यांनी चांभार्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तात्रेय जांभळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक कार्यक्र माचे सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी विलास कांबळे यांनी काम पाहिले.

नांदगाव, पाच्छापूरमध्ये निवडणूक बिनविरोध
राबगाव/पाली : नांदगाव व पाच्छापूर ग्रामपंचायतीवर शेकापने वर्चस्व कायम ठेवले आहे. नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनल ठकोरे, तर उपसरपंचपदी वैशाली दिघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तसेच पाच्छापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय हुले व उपसरपंचपदी चंद्रकांत शीद यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी नांदगाव ग्रामपंचायत सदस्य व सदस्या प्राची खामकर, सरिता म्हसकर, अरविंद फणसे, गणपत भंनगे आदी सदस्य उपस्थित होते.

नांदगावच्या उपसरपंचपदी अस्लम हलडे
मुरु ड जंजिरा : नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत नांदगाव विकास आघाडीच्या अस्लम हुसेन हलडे यांनी अपक्ष उमेदवार सचिन गणपत पाटील यांचा ८ विरु द्ध ३ मतांनी पराभव करीत उपसरपंचपद मिळवले.
सरपंच वैशाली विनोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या सभेत सदर निवडणूक घेण्यात आली. ग्रामसेवक प्रदीप दिवकर यांनी सचिव म्हणून काम पाहिले. उपसरपंचपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अस्लम हलडे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विकास आघाडी स्थापन केली होती. त्यात आघाडीचे नऊ सदस्य तर दोन अपक्ष विजयी झाले होते.

शिघ्रेच्या उपसरपंचपदी महेंद्र दिवेकर बिनविरोध
आगरदांडा : मुरु ड तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सरपंच संतोष रामचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणूक पार पडली. निवडणुकीत शेकापचे महेंद्र रामचंद्र दिवेकर व अमोल काशिनाथ पाटील यांनी उपसरपंचपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यानंतर काही वेळाने शेकापचे उमेदवार अमोल काशिनाथ पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. दुपारी शेकापचे उमेदवार महेंद्र रामचंद्र दिवेकर यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी शिवसेना व शेकापच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
सरपंचपदी शिवसेनेचे संतोष रामचंद्र पाटील आणि शेकापचे महेंद्र दिवेकर उपसरपंचपदी यांची निवड झाल्यानंतर शिवसेना, शेकापच्या कार्यकर्त्यांनी दोघांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिघ्रे ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्यांची ग्रामपंचायत असल्याने या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेचा व सदस्यपदी शिवसेनेचे ३ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ सदस्य व शेकापचे ३ सदस्य या निवडणुकीत असल्याने येथे शिवसेनेने शेकापशी युती करून राष्ट्रवादी पक्षाला दूर ठेवून युतीचा उपसरपंच निवडून आणला.

Web Title: Nadasur Gram Panchayat Enection News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.