मुंबई-गोवा मार्ग खड्डेमय, महामार्ग दुरुस्तीसाठी उरले केवळ ५४ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:11 AM2018-07-15T06:11:20+5:302018-07-15T06:11:42+5:30

येत्या १३ सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यासाठी दरवर्षी जवळपास दहा लाख चाकरमानी कोकणात जातात.

Mumbai-Goa road paved, only 54 days for the highway repair | मुंबई-गोवा मार्ग खड्डेमय, महामार्ग दुरुस्तीसाठी उरले केवळ ५४ दिवस

मुंबई-गोवा मार्ग खड्डेमय, महामार्ग दुरुस्तीसाठी उरले केवळ ५४ दिवस

googlenewsNext

- जयंत धुळप 
अलिबाग : येत्या १३ सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यासाठी दरवर्षी जवळपास दहा लाख चाकरमानी कोकणात जातात. या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे (पनवेल) ते कशेडी(पोलादपूर) या टप्प्यातील खड्डे भरून त्यांची दुरुस्ती करण्याकरिता प्रशासनाच्या हाती अवघे ५४ दिवस उरले आहेत. त्यामुळे यंदातरी कोकणातील प्रवास सुखकर होणार का, असा प्रश्न गणेशभक्तांकडून विचारण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे, तर अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे महामार्ग खड्डेमय झाला असून हे खड्डे बुजवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे.
रायगड जिल्ह्यात झालेल्या संततधार अतिवृष्टीमुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावर पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर)पर्यंत सुमारे १२५ कि.मी. अंतरावर मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्ग वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. गणेशोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारी, खासगी वाहनांतून किमान दहा लाख चाकरमानी कोकणात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा खड्डेमय महामार्गाची दुरुस्ती आणि सुस्थितीकरणाचे काम ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
सध्या मुंबई ते महाड प्रवासासाठी एसटीला किमान पाच तास लागत आहेत. गोवा महामार्गावरील जिते-पेण-वडखळ या टप्प्यात महामार्गाची अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे. तर गोवा महामार्ग टाळून पूणे-मुंबईला जाायला पर्यायी मार्ग असणाऱ्या ‘वाकण- पाली- जांभूळपाडा-खोपोली’ या मार्गाची अवस्थाही गंभीर झाल्याने अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी निर्माण होत असल्याची माहिती रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखाप्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.
>वाकण-पाली-जांभूळपाडा-खोपोली महामार्गाची दैना
गोवा राष्ट्रीय महामार्गास पर्यायी मार्ग असणारा ‘वाकण-पाली-जांभूळपाडा-खोपोली’ हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा आहे. या महामार्गाचीही स्थिती गंभीर आहे. एक छोटा पूल (क्रॉसड्रेन) वाहून गेल्याने येथील वाहतूक १२ तास ठप्प झाली होती. अशाच प्रकारचे नऊ छोटे पुल (क्रॉसड्रेन) महामार्गाच्या टप्प्यात आहेत, त्यांना पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी सांगितले. महामार्गाचेही रुंदीकरणाचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू आहे.
>पर्यायी व्यवस्था करणार
गोवा-राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्याचे चौपदरीकरण दोन टप्प्यात होत आहे. त्यात पनवेल ते वडखळ दरम्यानचे काम जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी तर वडखळ ते इंदापूर दरम्यानचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करत आहे. मात्र, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अपेक्षेप्रमाणे काम करीत नसल्याने त्या ऐवजी आम्ही पर्यायी यंत्रणा उभी करत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत फेगडे यांनी दिली आहे. पनवेल ते वडखळ दरम्यानचे दुरुस्ती काम जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातून सुरू असून गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुस्थितीत करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
>खड्डे बुजवण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा
महामार्गाच्या टप्प्यातील खड्डे बुजवण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून पावसाने उघडीप दिल्यावर केवळ खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत ठेवण्याचेच काम करण्यात येत आहे. गणेशोत्सवाकरिता चाकरमान्यांना वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता नियोजन सुरू आहे.
- संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

Web Title: Mumbai-Goa road paved, only 54 days for the highway repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.