Manga's engine runs in Rayagad | रायगडात मनसेचं इंजिन आघाडीसाठी धावतंय
रायगडात मनसेचं इंजिन आघाडीसाठी धावतंय

- आविष्कार देसाई

अलिबाग : भारतीय जनता पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. लाखोंच्या संख्येने राज यांच्या सभांना होणारी गर्दी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. रायगड जिल्ह्यात मनसेची म्हणावी तशी ताकद नाही. परंतु राज यांच्या सभेतून किती मतदारांचे मत परिवर्तन होणार आणि त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होणार का ? यावरच खरे यशअपयश अवलंबून आहे.
रायगड लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास आघाडीकडून सुनील तटकरे हे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचे अनंत गीते निवडणूक रिंगणात आहेत. १९ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची महाड येथील चांदे मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता सभा पार पडणार आहे. सभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे सरकार कसे फसवे आणि खोटारडे आहे यावर त्यांचा भर राहणार असल्याचे बोलले जाते.
भाजपला मतदान करु नका असा थेट हल्ला त्यांनी आधीच्या आपल्या सभांमध्ये केला आहे. महाडमध्येही घणाघात होणार असल्याने सभेला गर्दी होणार आहे. आघाडीला मतदान करा असे ते थेट सांगत नसले तरी आघाडीसाठीच मनसेचे इंजिन धावत असल्याचे दिसून येते. शिवसेनेचे अनंत गीते यांच्यावर राज ठाकरे कसा निशाणा साधणार याचीही उत्सुकता मतदारांमध्ये आहे. आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मनसेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांच्या गाठी- भेटी, रॅली, प्र्रचार सभांना आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित राहत असल्याचे दिसून
येते.
>मनसेने लढवलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?
मनसेने रायगड लोकसभेची जागा लढलेली नाही. पेण विधानसभा मनसे लढली होती. ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद नगर पालिका निवडणुकीत मनसेचे इंजिन धडधडले होते.दक्षिण रायगडमध्ये मनसेने बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण करण्यास गेल्या काही वर्षांपासून सुरुवात केलेली आहे. पेण, रोहे, माणगाव, महाड, पोलादपूरमधील काही ग्रामपंचायतीत मनसेचे सदस्य आहेत.रायगड जिल्ह्यात मनसेकडे सुमारे २० हजारांच्या आसपास व्होट बँक आहे. रत्नागिरी-खेड नगर पालिकेमध्ये मनसेचा थेट नगराध्यक्ष निवडून गेलेला आहे. त्यामुळे मनसेचे महत्त्व वाढले आहे.


Web Title: Manga's engine runs in Rayagad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.