- विजय मांडे

कर्जत : तालुक्यातील वाढते कुपोषण लक्षात घेता त्यांच्यावर जिल्हा रु ग्णालयातील बाल चिकित्सा केंद्रात उपचार करावेत, असा प्रयत्न ३१ आॅक्टोबर रोजी केला गेला. कर्जत तालुक्यातील कुपोषित २६ आणि अन्य ४ बालकांना अलिबाग येथे चिकित्सा केंद्रात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, दुपारी १२ वाजता अलिबागला पोहोचलेली बालके सायंकाळी ७ वाजता पुन्हा कर्जतला परत आली. अलिबागचे वातावरण मानवत नसल्याने सर्व बालके आपल्या घरी पोहोचली असून, मोठ्या प्रमाणात कुपोषण असलेल्या कर्जत तालुक्यात आरोग्य विभागाने बाल चिकित्सा केंद्र सुरू करण्याच्या मागणीचा विचार प्रशासन करीत आहे.
सप्टेंबर अखेरच्या सर्व्हेनुसार कर्जत तालुक्यात २७ ‘सॅम’ श्रेणीमधील म्हणजे अतिकुपोषित आणि ७४ तीव्र कुपोषित, म्हणजे आरोग्य विभागाच्या भाषेत ‘मॅम’ श्रेणीची बालके आहेत. २० आॅक्टोबरच्या घटनेनंतर कुपोषित बालकांची जिल्हा रु ग्णालयात उभारण्यात आलेल्या बाल चिकित्सा केंद्रात तपासणी व्हावी, असा प्रयत्न जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाने केला. त्यानंतर ३१ आॅक्टोबर रोजी तालुक्यातील अतिकुपोषित अशा २६ आणि अन्य ४ अशा ३० बालकांना संबंधित कुपोषित बालकांच्या पालकांसह अलिबाग येथे नेण्यात आले. त्या त्या अंगणवाडी केंद्राच्या सेविका, एकात्मिक बालविकासच्या प्रकल्प अधिकारी निशिगंधा भवार, पर्यवेक्षिका एस. ए. तांबे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर काटे यांची टीम कुपोषित बालकांसोबत होती.
या सर्व बालकांची आरोग्य तपासणी सुरू असताना, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी बाल चिकित्सा केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. त्या वेळी आरोग्य समितीचे सभापती नरेश पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती उमा मुंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई हे सोबत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा तटकरे यांनी त्या ठिकाणी सर्वाधिक आजाराने त्रस्त नेरळ भाकरीपाडा येथील बालकाला उचलून घेत त्याची प्रकृती किती गंभीर आहे, याची माहिती करून घेतली.

या बाल चिकित्सा केंद्रात सर्व बालकांचे १५ टक्के वजन वाढल्यानंतर त्यांना केंद्रातून घरी सोडण्यात येते. मात्र, दुपारी ३ वाजता रु ग्णालयात दाखल केलेल्या सर्व ३० बालकांच्या पालकांनी अलिबाग येथे राहायचे नसून आपल्याला कर्जतला घरी जायचे असल्याचा तगादा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लावला. तपासणीत जी तीन बालके वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत, त्यांनीही घरी जाण्याची परवानगी मागितली. शेवटी त्या सर्वांकडून आपल्या मर्जीने घरी परत जात असल्याचे लिहून घेण्यात आले.

आम्ही बाल चिकित्सा केंद्रात दररोज वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेल्या बालकांवर उपचार करतो आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार मुंबईत हलवून उपचार करून त्यांना सुदृढ करतो. कर्जतमधील ती ३ कुपोषित बालके कर्जतला परत गेली असली, तरी त्यांना कर्जत येथून मुंबईत नेण्याची व्यवस्था केली जाईल.
- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक
जिल्हा परिषद कुपोषणाबद्दल अत्यंत संवेदनशील असून, कर्जत तालुक्यातील त्या बालकांना तत्काळ अलिबाग येथे आणले आहे. त्या बालकांना सुदृढ करण्यासाठी सर्व आवश्यक काळजी प्रशासन घेत आहे.
- अदिती तटकरे, अध्यक्षा रायगड जिल्हा परिषद
अलिबाग येथील समुद्राजवळील खारे वारे हे कर्जतच्या लोकांना मानवत नाहीत, त्यामुळे कर्जतचे रु ग्ण अलिबागला येत नाही. अलिबागपेक्षा मुंबई जवळ असल्याने कर्जतचे रु ग्ण तिकडे सहज पोहोचतात. मात्र, कुपोषित सारखी लहान बालके मुंबईमध्ये नेऊन उपचार घेऊ शकत नसल्याने आम्ही येथील कुपोषण लक्षात घेऊन, गेली अनेक वर्षे बाल चिकित्सा केंद्र कर्जतमध्ये सुरू व्हावे, अशी मागणी आरोग्य विभागाकडे करीत आहोत.
- सुरेश लाड, आमदार कर्जत