Lok Sabha Election 2019: तटकरे, गीतेंच्या सरळ लढतीत गटबाजीचे अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:40 PM2019-03-11T23:40:26+5:302019-03-11T23:41:00+5:30

विकासकामे, सोयीसुविधांच्या जोरावर मतांचा जोगवा

Lok Sabha Election 2019: Thackeray, Grouping of obstacles in straight fight against songs | Lok Sabha Election 2019: तटकरे, गीतेंच्या सरळ लढतीत गटबाजीचे अडथळे

Lok Sabha Election 2019: तटकरे, गीतेंच्या सरळ लढतीत गटबाजीचे अडथळे

Next

- गणेश चोडणेकर 

आगरदांडा : रायगड मतदारसंघात गटबाजीचे वारे वाहू लागले असून, आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यातून कसा मार्ग काढतात, हे येत्या दीड-दोन महिन्यात कळेल. सुनील तटकरे आणि अनंत गीते यांची सरळ लढत दुसऱ्यांदा होत आहे.

मागील निवडणुकीत तटकरेंनी अनंत गीते यांना चांगलाच घाम फोडला होता. १५ लाख १३ हजार मतदारांमधून गीतेंना अवघ्या २ हजार ११० मतांनी विजय मिळवता आला होता. आता पाच वर्षांनंतर यात अनेक बदल झाले आहेत. दोघांचेही हे पारंपरिक मतदारसंघ असले तरी अंतर्गत गटबाजीमुळे दोघांनाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. विकासकामे, मतदारसंघात केलेल्या सोयी -सुविधांच्या जोरावर मतांचा जोगवा मागण्यात दोन्ही उमेदवार यशस्वी होतात की नाही, हेही लवकरच कळेल.

तटकरेंच्या वाटेतील काटे
गुहागरचे आमदार भास्कर जाधवांच्या खासदारकीच्या हट्टाकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दुर्लक्ष करत सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली. यातून तटकरेंनी पहिला अडथळा दूर करण्यात यश मिळविले असले तरी मतदार संघातील अनेक गटा-तटांना तोंड द्यावे लागणार आहे. तटकरे कुटुंबातूनच याची सुरुवात होऊ शकते. मागील काही दिवसांपासून शांत बसलेले श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आपली कोणतीही बाजू अद्याप स्पष्ट केलेली नाही. ऐन निवडणूक कालावधीत अवधूत तटकरेंनी आपल्या भूमिकेत बदल केल्यास मोठा फटका सुनील तटकरेंना बसू शकतो. सुनील तटकरेंच्या पाठीशी सध्यातरी शेकापची मजबूत ताकद आहे. मात्र, तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा वैर सर्वश्रुत आहे. याचप्रमाणे सुनील तटकरेंना मदत करण्याबाबत शेकापचा मोठा गट नाराज आहे. याचाही परिणाम तटकरेंच्या मताधिक्यात पडू शकतो.

गीतेंच्या विजयातील अडसर
सलग सातव्यांदा लोकसभेवर जाण्याची संधी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमोर असली तरी त्यांनाही गटबाजीला सामोरे जावे लागणार आहे. कुणबी व्होट बँकेच्या आधारावर गीते सातत्याने विजयी होतात, असे म्हटले जाते; परंतु आता या व्होट बँकेचेही वलय गीतेंच्या बाजूने दिसत नाही. गीते काही पायाभूत प्रकल्प आणतील आणि रोजगार उपलब्ध होतील, अशी अपेक्षा कुणबी समाजातील मतदारांची होती. शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यातील मतभेद उघड आहे. विधानसभेच्या दापोली मतदार संघातून रामदास कदमांचा मुलगा योगेश कदम इच्छुक आहे. आधी लोकसभा निवडणूक असल्याने कदमांना गीतेंसाठी प्रचारात पुढे राहावे लागेल, तरच गीते विधानसभेसाठी परतफेड करू शकतील, अशी परिसरात चर्चा आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: Thackeray, Grouping of obstacles in straight fight against songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.