माथेरानच्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:26 AM2019-07-20T00:26:48+5:302019-07-20T00:26:50+5:30

माथेरान या पर्यटनस्थळी नेरळजवळील उल्हासनदीमधून पाणी उचलून जलवाहिनीच्या माध्यमातून नेले जाते.

Leakage of Matheran's water-drain | माथेरानच्या जलवाहिनीला गळती

माथेरानच्या जलवाहिनीला गळती

Next

कांता हाबळे 
नेरळ : माथेरान या पर्यटनस्थळी नेरळजवळील उल्हासनदीमधून पाणी उचलून जलवाहिनीच्या माध्यमातून नेले जाते. ती जलवाहिनी गेल्या १५ दिवसांपासून फुटली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे लक्ष नसल्याने कालव्यासारखे पाणी नेरळच्या हुतात्मा चौकातून वाहत आहे. या पाण्याच्या प्रवाहामुळे नेरळ येथील हुतात्मा चौकातील उद्यानाची माती देखील मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. दरम्यान, ही पाणीगळती अशीच सुरू राहिल्यास माथेरानला जाणारे पाणी कमी प्रमाणात पोहचले जाईल आणि दुसरीकडे नेरळ हुतात्मा चौकातील उद्यानाची दुरवस्था होण्याची शक्यता आहे.
माथेरानला पाणीपुरवठा करणारी अशुद्ध पाण्याची जलवाहिनी उल्हासनदी येथून कुंभे गावातून कर्जत-कल्याण रस्त्याने नेरळच्या हुतात्मा चौक येथे येते. त्यानंतर ती जलवाहिनी नेरळ-माथेरान घाटरस्त्याच्या कडेने माथेरानला जाते. या जलवाहिनीला नेरळच्या हुतात्मा चौकात मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे तेथे दिवसभर पाण्याचा प्रवाह वाहत असून ते पाणी रस्त्याच्या मधून वाहत जाऊन रस्त्याचे डांबर निघत आहे. त्यात माथेरानच्या जलवाहिनीमधून दिवसातील २४ तासातील १८ तास पाणी उचलले जाते. त्यामुळे त्या जलवाहिनीमधून सतत पाण्याचा प्रवाह सुरू असतो. तो पाण्याचा प्रवाह जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे सतत वाहत आहे. त्याचवेळी रस्त्याच्या मधूनच पाण्याचा प्रवाह वाहत जात असल्याने रस्त्यावर हिरवे शेवाळ तयार झाले असून रस्ता देखील चिकट होऊ लागला आहे. त्यात या जलवाहिनीवर ताबा असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांना पाणीगळतीबद्दल माहिती देऊन देखील कोणतीही कार्यवाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आली नाही.
या सर्व पाण्याच्या प्रवाहामुळे एकाच वेळी नेरळ-माथेरान घाटरस्त्याचा सुरुवातीचा भाग आणि कर्जत-कल्याण रस्त्यावर नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याची स्थिती नाजूक बनली आहे. कारण रस्त्यावरून पाणी कालव्यासारखे सतत जात असल्याने रस्ता खराब झाला आहे. दुसरीकडे नेरळ गावाची शान असलेल्या हुतात्मा चौकातील उद्यानामधून तो पाण्याचा प्रवाह जात असल्याने हुतात्मा चौकातील उद्यानाची अवस्था देखील नाजूक बनली आहे. हुतात्मा स्मारक समितीकडून देखील त्या पाणीगळतीबाबत माथेरान नगरपरिषदेला कळविण्यात आले आहे, परंतु त्यांच्याकडून देखील कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे माथेरानच्या प्रवेशद्वारावरील पर्यटकांना आकर्षित करणारे हुतात्मा स्मारकमधील उद्यानाला निर्माण झालेला धोका याबद्दल नेरळ ग्रामपंचायतीने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नेरळ गावाचे प्रेरणास्थान बनलेली ही वास्तू माथेरान नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेमुळे धोका निर्माण झाला आहे.
।माथेरान नळपाणी योजनेची नेरळच्या हुतात्मा चौकातील फॉरेस्ट चौकी येथील पाणीगळतीबद्दल कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे. त्याचवेळी अन्य कुठेही जलवाहिनी फुटून पाणीगळती होत असेल तर त्यावर देखील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- किरण शानबाग, शाखा अभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष यांच्याकडून माथेरान नगरपरिषदेला याबाबत कळविले आहे. हुतात्मा चौक आणि स्मारक हे नेरळ गावाचे भूषण असून ते आमच्या सर्वांचे स्फूर्तिस्थान आहे.त्यामुळे तेथील वास्तूची दुरवस्था माथेरान जलवाहिनीमुळे होणार असेल तर ते चुकीचे आहे. कल्पना देऊनदेखील कोणी लक्ष देणार नसेल तर मात्र आम्ही शांत बसणार नाही.
- अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ

Web Title: Leakage of Matheran's water-drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.