श्रमदानातून भरले कनकेश्वर फाटा-रेवस मार्गावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:22 AM2018-08-20T04:22:02+5:302018-08-20T04:22:18+5:30

कार्लेखिंड येथील तरुणांचा पुढाकार : एक किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण केले; प्रवाशांमध्ये समाधान

Khade on Kankeshwar Phata-Revas road full of labor | श्रमदानातून भरले कनकेश्वर फाटा-रेवस मार्गावरील खड्डे

श्रमदानातून भरले कनकेश्वर फाटा-रेवस मार्गावरील खड्डे

googlenewsNext

- सुनील बुरूमकर

कार्लेखिंड : कार्लेखिंड - कनकेश्वर फाटा-रेवस या मार्गावरील कार्लेखिंडपासून एक किलोमीटर अंतरावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने भरण्याचे काम तलवडे, गोठेघर, परहूर येथील नागरिकांनी एकत्र येऊन केले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी महामार्ग, राज्यमार्ग किंवा इतर मार्गावरील खड्डेमुक्त रस्ता करण्याचे आदेश देऊनसुद्धा अजूनपर्यंत खड्डे जैसे थे आहेत. गणेशोत्सवाला अवघा महिना शिल्लक असताना संबंधित विभागाला जाग येत नाही. त्यामुळे नागरिकांनी श्रमदानातून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.
कार्लेखिंड येथील डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन गावांतील तरुणांकडे खड्डे भरण्याचा विषय मांडला आणि या कामाला सर्व तरुणांनी सहकार्य केले. कार्लेखिंड-कनकेश्वरफाटा या मार्गाची गेल्या दोन-तीन वर्षांपासून खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली होती. कधी नाही तो या रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त लागला, परंतु या डांबरीकरणाचे काम मे महिन्याच्या शेवटी चालू झाले. डांबरीकरणाचे काम चालू असतानाच पाऊस आल्याने डांबरीकरणाचे काम अपूर्ण राहिले.
कार्लेखिंड या थांब्यापासून एक किलोमीटर अंतरावर एवढे खड्डे पडले होते की, चालकाला आपले वाहन चालवण्यासाठी कसरत करावी लागत होती आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी या खड्ड्यांबाबत विचारपूस केली असता हे खड्डे लवकरात लवकर भरू असे फक्त आश्वासने देत होते. अखेर एक-दीड महिना वाट पाहिल्यानंतर डॉ. म्हात्रे यांनी सर्वांना एकत्र घेऊन हे खड्डे भरण्याचे काम सुरू केले. तलवडे, गोठेघर आणि परहूर, जलपाडा या गावांतील जवळजवळ दीडशे तरुण आणि वयस्कर मंडळी जमली आणि सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे खड्डे सिमेंट काँक्रीटने भरण्यात आले.

साहित्यही मोफत
खड्डे भरण्यासाठी ४0 पोती सिमेंट डॉ. रवींद्र म्हात्रे, तसेच खडी रेती साहित्य सुनील थळे, आर.आर. पाटील, राजू राणे यांनी दिले, तर काँक्रीट मिक्सिंगसाठी बांधकाम व्यावसायिक राजू वाघमारे यांनी मिक्सर मशिन आणि स्वत:चे कामगार कामासाठी लावले. अशा प्रकारे खड्डे भरण्यासाठी १२ ते १५ ब्रास साहित्य वापरण्यात आले. काम करत असलेल्या तरुणांकडे पाहून येणाºया-जाणाºया प्रवाशांनी सर्वांना धन्यवाद दिले.

Web Title: Khade on Kankeshwar Phata-Revas road full of labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.