कर्जत आगाराला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:40 PM2019-05-22T23:40:37+5:302019-05-22T23:41:01+5:30

खासगी वाहतुकीचा फटका : उत्पन्नावर परिणाम; संरक्षण भिंत तुटल्याने भंगारवाल्यांचा त्रास

Karjat agar in worst condition | कर्जत आगाराला उतरती कळा

कर्जत आगाराला उतरती कळा

Next

संजय गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : गाव तेथे एसटी दिसणार अशी परिस्थिती एकेकाळी होती. आता खासगी वाहतूक सुरू झाल्यामुळे एसटीला उतरती कळा लागली आहे. पूर्वीपेक्षा आताच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. यामुळे कर्जत आगार तोट्यात आहे.


आगाराला संरक्षण भिंत आहे. मात्र, ती अनेक ठिकाणी तुटली आहे, त्यामुळे भंगारवाल्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे. नगरपरिषदकडून पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळजोडणी घेतल्या आहेत, त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शौचालयाची अवस्था ठीक आहे. चालक-वाहक यांच्यासाठी विश्रांतिगृह आहे, तर कार्यशाळा कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा विश्रांतिगृह आहे. आगारात जनरेटरची सोय आहे, आगारात डिझेल पंप आहे. सर्व्हिस सेंटर असल्याने रोजच्या रोज गाड्या वॉश केल्या जातात. तालुक्यात आमराई, कडाव, कशेळे, नेरळ या ठिकाणी प्रवाशांना उभे राहण्यासाठी प्रवासी थांबे आहेत. मात्र, त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे दिसत आहे. आगार व डेपोमध्ये डांबरीकरणाची आवश्यकता आहे. आगाराला रंगरंगोटी करणे आवश्यक आहे.


पूर्वीपेक्षा आताच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. आता दिवसाला १६ हजार प्रवासी संख्या आहे. आजच्या मितीला दिवसाला ४१५ फेºया होत आहेत. एका दिवसाला आगाराचे चार लाख ८५ हजार रुपये उत्पन्न आहे. आगरात ४१ बस आहेत, तर दोन मिडीबस आहेत. सध्या आगारात एक आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षक-१४, चालक-८०, वाहक-८४, चालक-वाहक -१६, यांत्रिक-४६, इतर-१६ असे २५७ कर्मचारी आहेत. चालक-वाहक प्रत्यक्ष २१४ पाहिजेत. मात्र, १८० आहेत, ३४ कमी आहेत.


प्रवाशांना अपेक्षित; परंतु नसलेल्या बस फेºया सुरू नसल्याबाबतची कारणे अनेक आहेत. रेल्वे स्थानकापासून आगार लांब आहे. प्रवाशांनी मागणी केल्यावर अनेक वेळा बस चालू करण्यात आली आहे. मात्र, त्या मार्गावर फेºयांच्या तुलनेत प्रवासी संख्या कमी असल्याने आगारास तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बस बंद झाल्या आहेत. आज आगाराला उत्पन्नाच्या दृष्टीने कर्जत-पनवेल-वाशी, कर्जत-पेण, कर्जत-अलिबाग, कर्जत-पाली, कर्जत-मुरबाड, कर्जत-खोपोली-पनवेल या ठिकाणी गाड्या चालवाव्या लागत आहेत. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान येथे कर्जत आगाराच्या मिडीबसच्या दिवसभरात पाच फेºया चालवल्या जात आहेत. सर्वसामान्यांना कर्जत-माथेरान प्रवास परवडणारा आहे. एसटीला पूर्वीसारखे चांगले दिवस आणायचे असतील, तर नागरिकांनी एसटीने प्रवास करायला पाहिजे आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आगाराचा व एसटीचा लूक बदलणे गरजेचे आहे, तरच शासनाचे ‘गाव तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्य खºया अर्थाने सत्यात उतरेल.

पूर्वी कडाव येथे राहत असल्यामुळे शाळा कॉलेजला जाण्याकरिता लालपरी अथात एसटीशिवाय पर्याय नव्हता; परंतु कालांतराने एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लालपरीचे अस्तित्वच लोप पावत चालले आहे. एकेकाळी कडाव, खांडस, कशेळे येथील ग्रामस्थांना कर्जत तालुक्याच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सहज व सुलभपणे उपलब्ध होणारी लालपरी आता खासगी प्रवासी वाहनांच्या गर्दीत अदृश्य झालेली आहे. पुढील पिढीला गोष्टीतील एसटी न होऊ देण्याकरिता एसटी महामंडळाने ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सुरळीत एसटी सेवा देण्याकरिता, एसटी सेवेत आमूलाग्र बदल करून सेवा-सुविधा पुरविण्याची व्यवस्था करावी. प्रवाशांच्या गरजेनुसार एसटी सेवा सुरू झाल्यास लालपरीस नक्कीच सुगीचे दिवस येतील.
- प्रभाकर गंगावणे, प्रवासी

खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे, त्याचा परिणाम एसटीवर झाला आहे. मात्र, प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करावा, एसटीचा प्रवास सुखरूप व सुरक्षित आहे.
- शंकर यादव, आगार व्यवस्थापक

कर्जत शहराच्या पश्चिम भागात असलेल्या आगाराचे उद्घाटन १९८० साली तत्कालीन समाजकल्याण बांधकाम राज्यमंत्री ताराबाई वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले होते. याप्रसंगी तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे उपस्थित होते. शहराच्या पश्चिम भागात रेल्वेच्या बाजूला पूर्वी एसटी स्टॅण्ड होता, त्या वेळी सर्व एसटी गाड्या कर्जत शहरातूनच जात असत. १९८० साली शहराच्या पश्चिम भागात सात एकरांमध्ये नवीन आगार उभारले. रेल्वे स्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एस टी स्टॅण्ड गेल्याने प्रवाशांनी एसटीतून प्रवास करणे सोडले. १९८० ते १९९६ पर्यंत एसटीला चांगले दिवस होते. प्रवासी भरपूर होते तरी एसटी तोट्यात होती, त्याची कारणे अनेक होती. मात्र, १९९७ पासून खासगी वाहतूक व अवैध वाहतूक सुरू झाली तेव्हापासून एसटीची परिस्थिती खालावत गेली.

Web Title: Karjat agar in worst condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.