जिल्ह्यात जय भवानी... जय शिवाजीचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 01:09 AM2019-03-24T01:09:09+5:302019-03-24T01:09:24+5:30

रायगड जिल्ह्यामध्ये तिथीनुसार शनिवारी सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 Jai Bhavani in the district ... Jay Shivaji's hail | जिल्ह्यात जय भवानी... जय शिवाजीचा जयघोष

जिल्ह्यात जय भवानी... जय शिवाजीचा जयघोष

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये तिथीनुसार शनिवारी सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयभवानी... जय शिवाजी...!चा जयघोष करीत रस्त्यारस्त्यांवर निघालेल्या रॅली, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमुळे, चौकाचौकांमध्ये उभारलेले भगवे झेंडे, कानावर पडणारी डफाची थाप यामुळे जिल्ह्यात शिवशाही उतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. किल्ले रायगडावर शनिवारी सकाळपासून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी सायंकाळी लक्षवेधी मिरवणुका निघाल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार ज्या राजधानीच्या ठिकाणावरून केला, त्या रायगड जिल्ह्यात शनिवारी शांततामय वातावरणात शिवजयंती साजरी झाली. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यात सकाळपासून शिवप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या. समुद्राला भरती असतानाही या शिवप्रेमींनी ओहटीची वाट न पाहता बोटीच्या साहाय्याने शिवघोषणा देत किल्ल्यात प्रवेश केला. त्याचप्रमाणे रायगडमधील अन्य ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर शिवप्रेमींचा दिवसभर गजबजाट होता. शिवजयंतीनिमित्त अभिवादनासह आपल्या राजाबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी तमाम शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात शिवध्वज, भगवे जॅकेट, कुर्ता भगवे फेटे बांधून युवक आणि युवती मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामध्ये आबालवृद्ध पुरुषांप्रमाणे महिलाही मागे नव्हत्या. नऊवारी, नाकात नथ, डोक्यावर भगवा फेटा, अशा पारंपरिक पेहरावात आलेल्या महिलांनी सर्वांचेच लक्ष वेधले.

महाडमध्ये शिवज्योतींचे स्वागत
महाड : महाडमध्ये तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली. यानिमित्ताने रायगड किल्ल्यावरून तालुक्यातील विविध मंडळांकडून तसेच राज्यभरातून आलेल्या शिवज्योतींचे शहरात स्वागत करण्यात आले.
सायंकाळी उशिरा शहरातील विविध मंडळांनी शिवदेखाव्यासह वाजत गाजत मिरवणूक काढली. या वेळी संपूर्ण शहरात शिवघोष करण्यात आला. शहरात भगवे झेंडे सर्वत्र फडकत होते. मिरवणुकीत सरेकरआळी मित्रमंडळ, छत्रपती शिवाजी मंडळ काजळपुरा, महाराणा प्रताप मंडळ कुंभारआळी, तांबड भुवन, काकरतळे मित्रमंडळ, गवळआळी आदी विभागातील मंडळाचे आखाडे सहभागी झाले होते.

शिवजयंती उत्साहात
कर्जत : नेरळ येथील मोहाची वाडीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. लहान मुलांसाठी सायकल स्पर्धा, धावणे, असे विविध खेळ घेण्यात आले.

स्पर्धांचे आयोजन
कर्जत : तांबस येथील शिवशाहीर ग्रुपच्या वतीने गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवकांनी प्राथमिक शाळेत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या.

रक्तदान शिबिर
मोहोपाडा : माजगाव प्रेरणा मित्रमंडळ यांच्या वतीने शनिवारी विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिवस्मारकाचे पूजन झाल्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नेरळमध्ये दुचाकी रॅली
नेरळ : शिवजयंतीनिमित्त वाहनावर भगवे झेंडे लावून शिवजयघोष करीत फिरणाऱ्या युवकांमुळे नेरळ व परिसर दुमदुमून गेला होता. श्री चेडोबा मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. या वेळी दुचाकी रॅलीचे आयोजन तर सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

श्रीवर्धनमध्ये चोख बंदोबस्त
श्रीवर्धन : श्रीवर्धन शहर हे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानले जाते. शिवजयंती ,ईद, होळी ,रमजान ,मोहरम या सारख्या सणांना श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस तुकड्यांची कुमक मागवली जाते. श्रीवर्धन शहरातील सर्व ठिकाणांचा आढावा घेण्यासाठी पोलीस दलाने श्रीवर्धन शहरात पोलीस संचलन केले.

Web Title:  Jai Bhavani in the district ... Jay Shivaji's hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.