नोटिसा बजावूनही अतिक्रमण जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:31 AM2019-06-19T00:31:19+5:302019-06-19T00:31:36+5:30

नेरळमध्ये फेरीवाल्यांची पदपथावर दुकाने; ज्येष्ठ नागरिकांनी दिला आत्मदहनाचा इशारा

It was like encroachment by the notices | नोटिसा बजावूनही अतिक्रमण जैसे थे

नोटिसा बजावूनही अतिक्रमण जैसे थे

googlenewsNext

- कांता हाबळे 

नेरळ : नेरळ - माथेरान रस्त्यालगतच्या फूटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा नेरळ ग्रामपंचायतीने उगारला आहे. मात्र, फेरीवाले जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यावर नेरळमधील ज्येष्ठ नागरिकांनी उपोषण केले होते आणि आता १ जुलै रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

नेरळ गावातील बाजारपेठेतील रस्त्यावर १९७० पासून अतिक्रमणे होती. ती अतिक्रमणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी २००८ मध्ये तोडण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्याचा ताबा न घेतल्याने पुन्हा अतिक्रमणे जैसे थे झाली. ही अतिक्रमणे २०१७ मध्ये रायगड जिल्हा परिषदेने रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम मंजूर केल्याने पोलीसबळाचा वापर करून तोडून टाकली. रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले आणि पुन्हा टपऱ्या बांधल्याने रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांविरुद्ध नेरळ संघर्ष समितीच्या ज्येष्ठ नागरिकांनी सप्टेंबर २०१८ मध्ये उपोषणाची नोटीस दिली. नेरळ ग्रामपंचायतीने पुन्हा कारवाई करीत फेरीवाल्यांना हटविल्याने उपोषण स्थगित झाले. याला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा रस्त्यावर फेरीवाले दिसू लागले आहेत. त्यामुळे नेरळमधील ज्येष्ठ नागरिकांनी १ जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

नेरळ ग्रामपंचायतीने फेरीवाल्यांना नोटिसा पाठवल्या असून ध्वनिक्षेपकच्या माध्यमातून सूचनाही दिल्या आहेत. मात्र, १ जुलै रोजी आत्मदहन करण्यावर नेरळ संघर्ष समितीचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक माधव गायकवाड आणि संतोष मोरे हे ठाम आहेत. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीवर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत आहे.

कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांनीही नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दबावामुळे कारवाई करण्यासाठी तयारी नेरळ ग्रामपंचायत करीत असून, २० जून रोजी त्या विषयावर चर्चा करण्यासाठी फेरीवाले आणि आत्मदहन करण्याचा इशारा देणारे यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने बैठक लावली आहे.

दुसरीकडे नेरळ ग्रामपंचायतीने इशारे देऊनही फेरीवाले ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाहीत. सतत तीन दिवस सूचना देऊन फेरीवाल्यांनी अतिक्रमण हटवलेले नाही. मंगळवारी कारवाई होणार या भीतीने काही टपरीधारकांनी दुकान बंद ठेवली होती. मात्र, दिवसभरात नेरळ ग्रामपंचायतीने एकही कारवाई केली नाही. त्यामुळे आत्मदहन करण्याचा इशारा नेरळ ग्रामपंचायत मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे.

कठोर कारवाईची मागणी
नेरळ ग्रामपंचायत केवळ कारवाईचा दिखाऊपणा करीत असून दरवेळी रस्त्यावर अतिक्रमणे होतातच कशी? असा प्रश्न असून रस्ता आणि पदपथ मोकळे करून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसावे लागते, हे दुर्दैव आहे. याबाबत नेरळचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुडदे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, फेरीवाल्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटविल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेरळ ग्रामपंचायत केवळ कारवाई करण्याचा दिखाऊपणा करीत आहे. पालकमंत्री यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊनही कार्यवाही करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासन करीत नाही. मागच्या वेळी उपोषण सोडताना मागण्या मान्य करून कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोवर स्वस्थ बसणार नाही.
- माधव गायकवाड, ज्येष्ठ नागरिक

नेरळ ग्रामपंचायतीकडे कामगार आहेत, गाड्या आहेत, असे असताना सर्व यंत्रणा कामाला लावून दररोज रस्त्यावर अतिक्रमणे करणाऱ्यांवर कारवाई करावी. केवळ त्यांचा माल जप्त करून चालणार नाही तर रस्त्यावर अतिक्रमण करणाºयांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करायला हवेत.
- संतोष मोरे, उपोषणकर्ते,
ज्येष्ठ नागरिक

Web Title: It was like encroachment by the notices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.