पर्यटन विभागाची निष्क्रीयता : थकीत बिलापोटी घरापुरी बेट अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:46 AM2018-01-22T02:46:47+5:302018-01-22T02:46:55+5:30

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने घारापुरी बेटावरील गावांना साडेतीन तास वीजपुरवठा करणा-या जनरेटरसाठी डिझेल पुरविणा-या ठेकेदाराचे डिसेंबर २०१६पासून आजतागायत ४० लाख रुपये थकविले आहेत.

 Initiation of tourism department: Bilkoti Ghatapuri Island in Thakit | पर्यटन विभागाची निष्क्रीयता : थकीत बिलापोटी घरापुरी बेट अंधारात

पर्यटन विभागाची निष्क्रीयता : थकीत बिलापोटी घरापुरी बेट अंधारात

Next

मधुकर ठाकूर 
उरण : महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने घारापुरी बेटावरील गावांना साडेतीन तास वीजपुरवठा करणा-या जनरेटरसाठी डिझेल पुरविणा-या ठेकेदाराचे डिसेंबर २०१६पासून आजतागायत ४० लाख रुपये थकविले आहेत. थकीत रकमेचे बिल अदा न केल्याने डिझेलचा पुरवठा बंद करण्यात आहे. ठेकेदाराच्या डिझेल पुरवठ्याअभावी आणि पर्यटन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मात्र जागतिक कीर्तीचे घारापुरी बेट शनिवारपासून पुन्हा अंधारात आहे.
जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर मागील ३० वर्षांपासून जनरेटरद्वारे साडेतीन तास वीजपुरवठा केला जात आहे. महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीखाली बेटावरील तीन गावांना वीजपुरवठ्याचे काम सुरू आहे. जनरेटरसाठी डिझेल पुरवठ्याचे काम घारापुरी बेटावारीलच मे. महेश ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुर्स या कंपनीकडे देण्यात आले आहे. डिझेलचा पुरवठा करण्याची तयारी काही सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दर्शविली असतानाही मागील ३० वर्षांपासून महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या आशीर्वादाने आणि अधिकाºयांच्या आर्थिक साटेलोट्यातून डिझेल पुरठ्याचे काम एकाच ठेकेदाराकडे आहे.
महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे घारापुरी बेटाला वीजपुरवठा करणारे जनरेटर नादुरुस्त झाले होते. त्यामुळे मागील आक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांदरम्यान सुमारे दोन महिने बेट अंधारात बुडाले होते. बेटावरील पर्यटन विभागाच्या बेपर्वाहीमुळेच घारापुरी बेटवासीयांवर अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली होती. नवनिर्वाचित सरपंच बळीराम ठाकूर आणि सदस्य व ग्रामस्थांनी थेट पर्यटन विभागाच्या महाव्यवस्थापक विजय वाघमारे यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. त्यानंतरच बेटावरील जनरेटर दुरुस्तीचे काम होऊन सोडतीन तासांचा का होईना वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत झाला होता.
आता डिझेलच्या थकीत असलेल्या ४० लाखांच्या बिलासाठी घारापुरी बेटाचा जनरेटरवरील वीजपुरवठा ठेकेदाराने बंद केला आहे. थकित बिल अदा केल्याखेरीज डिझेलचा पुरवठा करण्यास ठेकेदाराने असमर्थता दर्शविली असल्याचे लेखी पत्र पर्यटन विभागाच्या बेटावरील चालुक्य उपाहारगृहाच्या निवास व्यवस्थापकांनी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्या मुख्य लेखाधिकाºयांना दिले आहे. यामध्ये त्यांनी जनरेटरसाठी १९ जानेवारीपर्यंतच डिझेलचा साठा उपलब्ध आहे. २० जानेवारीपासून डिझेल पुरवठ्याअभावी वीजपुरवठा खंडित केल्याने तीन महिन्यांपासून घरापुरी बेट अंधारात आहे. याकडे निवास व्यवस्थापनाने लक्ष वेधले होते. मात्र, पर्यटन विभागाने याकडे दुर्लक्ष के ल्याने शनिवार, २० जानेवारीपासून वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे घरापुरी बेट अंधारात बुडाले आहे.
२७-२८ जानेवारी रोजी एलिफंटा महोत्सव
घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठ्याचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. विद्युत ट्रान्सफार्मरही चार्ज करून झाले आहेत. समुद्रातून अंडरग्राउंड टाकलेल्या वीजवाहिन्यांच्याचेही टेस्टिंगचे काम झाले आहे. त्यामुळे घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठ्याचे काम पूर्ण होण्यास फक्त काही दिवसच बाकी आहेत.
येत्या २७ आणि २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आयोजित एलिफंटा महोत्सवही साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने पर्यटन विभाग आणि घारापुरी ग्रामस्थांना वेठीस धरून डिझेलच्या थकीत रकमेची वसुली करण्याचा इरादा ठेकेदाराचा असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होऊ लागला आहे. ग्रामपंचायतीवर सेनेची सत्ता येताच ठेकेदाराकडून डिझेल पुरवठा बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title:  Initiation of tourism department: Bilkoti Ghatapuri Island in Thakit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड