Gudi Padwa 2018 : ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत, तरुणांचा जल्लोष लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:49 AM2018-03-19T02:49:13+5:302018-03-19T02:49:13+5:30

Gudi Padwa 2018: Welcome to the New Year in the Goblet-drum, the Youth Festival | Gudi Padwa 2018 : ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत, तरुणांचा जल्लोष लक्षवेधी

Gudi Padwa 2018 : ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत, तरुणांचा जल्लोष लक्षवेधी

googlenewsNext


अलिबाग : पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, आणि जय भवानी... जय शिवाजीच्या जयघोषात रविवारी जिल्ह्यातील आसमंत दुमदुमून गेला होता. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तरुणांचा सहभाग शोभायात्रांमध्ये लक्षवेधी ठरला. अलिबाग शहरातून निघालेल्या नववर्ष स्वागत यात्रेत शेकडो नागरिक सामील झाले होते. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. मुख्य चौकांमध्ये मराठी नववर्ष स्वागत यात्रा समितीने गुढ्याही उभारल्या होत्या.
गुढीपाडव्यानिमित्त अलिबाग शहरात आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेत तरु णाई आणि महिलांचा प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला. मराठमोळ्या पेहरावातील आबाल-वृद्ध आणि त्याचबरोबर महिलांचे ढोल-ताशा पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सकाळी शहरातील ब्राम्हण आळी परिसरातील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात अलिबागमधील ज्येष्ठ नागरिकांनी सपत्नीक गुढीची विधिवत पूजा केली. त्यानंतर नववर्ष स्वागत यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे घोड्यावरून या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शहरातील विविध गणेश मंडळे, नवरात्र मंडळे, विविध सामाजिक संस्था, संघटना आणि विविध युवा मंडळे तसेच सर्व पक्षातील विविध राजकीय नेते, पदाधिकारी या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.
राममंदिर, महावीर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शेतकरी भवन, ठिकरु ळ नाका, शिवलकर नाका, बाजारपेठमार्गे ही नववर्ष स्वागत यात्रा वळविण्यात आली होती. त्यानंतर काशीविश्वेश्वर मंदिराजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यावर नववर्ष स्वागत यात्रेची सांगता झाली.
नेहमीप्रमाणे या वर्षीही या स्वागत यात्रेत नागरिकांचा सहभाग ओसंडून वाहत होता. ऐतिहासिक पेहेरावातील घोडेस्वार, घोडागाड्या, मल्लखांब पथके आणि तालुक्यातील विविध बॅन्ड पथके या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले होते, हे महत्त्वाचे एक वैशिष्ट्य होते. यावेळी यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागच्या उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, पर्यटन समितीच्या सभापती सुरक्षा शाह, नगरसेविका संजना किर, वृषाली ठोसर, यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>मुरुड तालुक्यात दुचाकी रॅली
मुरु ड जंजिरा : मुरु ड तालुक्यात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सोमवारी ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. दुचाकी रॅलीबरोबरच विविध मिरवणुकांद्वारे जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे यात तरु णांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी मुरु ड शहर शिवसेनेतर्फे बाइक रॅली काढली. शेकडोंच्या संख्येत रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी हर हर महादेवचा गजर संपूर्ण शहरात केला.
कोळीवाडा परिसरातील असंख्य तरु ण मुलांनी गुढी उभारण्याच्या काठ्या समुद्र किनारी नेऊन धुतल्या व त्यांची विधिवत पूजा करून आपल्या घरी आणून गुढ्या उभारल्या. शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा करून शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. तालुक्यातील साळाव ते तळेखार परिसरात भारतीय जनता पक्षातर्फेसुद्धा नूतन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी रॅली काढण्यात आली होती.
>नागोठणेत गुढीपाडवा उत्साहात
नागोठणे : नूतन मराठी वर्ष अर्थात गुढीपाडवा सण शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अनेक नागरिकांनी आपले घरासमोर गुढी उभारली होती. नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सकाळपासून अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले असल्याने शहरातील सर्व मंदिरे भाविकांनी फुलून गेली होती.
>चौल-रेवदंड्यामध्ये गुढीपाडवा उत्साहात
रेवदंडा : चौल-रेवदंडा परिसरात गुढीपाडवा उत्साहात साजरा झाला. चौलमधील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात रेवदंडा, चौल, नागांव भारतीय जनता पक्षातर्फेशनिवारी पनवेलमधील सामगंध आयोजित संगीत रजनी हा बहारदार कार्यक्र म झाला. कार्यक्र मानंतर रात्री जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
वाड्या वस्त्यामध्ये ग्रामस्थांची गुढी उभारण्यासाठी लगबग जाणवत होती. हलवाई दुकानात गोडधोड पदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी होती.
कपड्यांची दुकाने, फर्निचरच्या दुकानात, ज्वेलर्सच्या दुकानात, मोबाइल गॅलरी आदी ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
>कर्जतमध्ये उत्साह
कर्जत : शहरातील श्री कपालेश्वर देवस्थानच्या वतीने कर्जतमध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बहुतांश गावात गुढ्या उभारून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री कपालेश्वर मंदिरातून स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत नगराध्यक्षा रजनी गायकवाड, देवस्थान समितीचे पद्माकर गांगल, कल्पना दास्ताने, नगरसेविका सुवर्णा जोशी, बिनीता घुमरे, भारती म्हसे, सुरेखा शितोळे, वैदेही पुरोहित, मीना प्रभावळकर आदींसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>शोभायात्रेमुळे दुमदुमले महाड
महाड : गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘मी महाडकर’ या संस्थेतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक वेशभूषेत महिला व पुरु ष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.
ढोल व झांज पथकांसह विविध मंडळांची लेझीम पथके यात सहभागी झाली होती. जाखमाता मंदिरापासून सुरु झालेल्या या शोभायात्रेची सांगता वीरेश्वर मंदिर येथे करण्यात आली.
>बिरवाडीत विविध कार्यक्रम : महाड तालुक्यामधील बिरवाडीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. बिरवाडी रणरागिणी कलामंच गु्रप व बिरवाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने रविवार श्रीदेव बहिरी मंदिर ते बिरवाडी विठ्ठल मंदिर अशी शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. शोभायात्रेत ढोल पथकासह पारंपरिक वेशभूषेतील महिला सर्वांचे आकर्षण ठरत होत्या.

Web Title: Gudi Padwa 2018: Welcome to the New Year in the Goblet-drum, the Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.